लडाखमध्ये २० भारतीय सैनिक शहीद

0
152

>> चिनी सैन्यासोबत चकमक, चीनचे ४३ जवान ठार

लडाखच्या गलवान खोर्‍यात चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत भारताचे कमीत कमी २० सैनिक हुतात्मा झाले आहेत. दरम्यान, या चकमकीत चीनचे ४३ सैनिक मारले गेले असून अनेक सैनिक जखमी झाल्याचे वृत्त आहे. मात्र याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. प्रत्यक्ष सीमारेषेवर दोन महिन्यांपासून असणारा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही बाजूंकडून माघार घेतली जात असतानाच ही घटना घडली आहे.

पूर्व लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये भारतीय लष्कर आणि चीनच्या सैनिकांमध्ये सोमवारी रात्री ही झटापट घडून आली. चीनकडून भारताने सीमा ओलांडल्याचा दावा करण्यात आला.

भारत आणि चीन यांच्यामध्ये असलेल्या ४८८ किलोमीटर लांबीच्या सीमारेषेत बहुतेक सीमा ही वादग्रस्त आहे. त्यावर चर्चा सुरू आहे. गलवान खोर्‍यासह पूर्व लडाखमधील पॅन्गॉंग सरोवर, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे महिन्याच्या सुरुवातीपासून दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने आहेत. या भागामध्ये भारताकडून रस्त्यांची ६६ कामे सुरू असून, काही धावपट्‌ट्याही विकसित करण्यात येत आहे. यामुळे पॅन्गॉंग सरोवर आणि परिसरात भारतीय लष्कराला वेगवान हालचाली करणे शक्य आहे. या कारणामुळे चीनकडून वारंवार या कामात अडथळे सुरू असून घुसखोरीही केली जात आहे. लष्करी अधिकार्‍यांच्या वरिष्ठ स्तरावरील चर्चेनंतर तणाव कमी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यातच, सोमवारी रात्री ही घटना घडली. रात्री ११.३० नंतर गलवान खोर्‍यामध्ये चीनचे सैनिक ट्रकमधून आले. त्यांना भारतीय सैनिकांनी अडविल्यानंतर ते माघारी जाण्यास तयार नव्हते आणि त्यातूनही घटना घडली. सुमारे दोन ते तीस तास ही चकमक सुरू होती. यानंतर मंगळवारी सकाळी दोन्ही बाजूंच्या लष्करी अधिकार्‍यांमध्ये घटनास्थळी चर्चा झाली.

दोन्ही सैन्यामध्ये १९७५ मध्ये अरुणाचल प्रदेशातील तुलुंग ला येथे चकमक झाली होती, त्यात भारताचे चार सैनिक हुतात्मा झाले होते. त्यानंतर प्रथमच दोन्ही देशांच्या सैन्यात चकमक होऊन त्यात जीवितहानी झाली.

संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची माहिती दिली. तसेच पूर्व लडाखच्या परिस्थितीचा आढावा घेतानाच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांबरोबर बैठक घेतली. लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनीही आपला पठाणकोटचा नियोजित दौरा रद्द केला आहे. चीनच्या लष्कराने तत्काळ या भागातून माघार घ्यावी, यासाठी भारतीय लष्कराकडून सातत्याने आवाहन करण्यात येत आहे तर, भारतीय लष्कराने १५ जूनपासून दोन वेळा सीमा ओलांडल्याचा खोटा आरोप चीनकडून करण्यात येत आहे.
सीमा परिसरात शांतता नांदली पाहिजे आणि चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढला पाहिजे या भूमिकेवर आम्ही अद्यापही ठाम आहोत. पण याचवेळी भारताचे सार्वभौमत्व आणि प्रादेशिक अखंडता सुनिश्चित करण्यासाठी कटीबद्ध असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. तसेच चीनकडूनही आम्ही तशीच अपेक्षा करत आहोत असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.