लग्न ः मानवी जीवनातील महत्त्वाचा विधी

0
24
  • पौर्णिमा केरकर

आज काळ झपाट्याने बदलत आहे. लग्नपरंपरा, विधी, रीतीरिवाज यांतही आमूलाग्र बदल जाणवतो आहे. हा बदल एका समाजापुरताच मर्यादित आहे असे नाही तर तो सार्वत्रिक आहे. सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक स्तरावरील परंपरेने चालत आलेल्या सर्वच मूल्यांना छेद देणारे वातावरण अवतीभोवती दिसत असतानाही निसर्ग आणि माणूस यांचे नाते अधोरेखित करत, माती आणि मानवी नात्यांशी इमान राखीत हे सोहळे पार पडत आहेत.

सध्या लग्नाचा मौसम ऐन भरात आला आहे. वाढत्या गरमीबरोबर लोकांची लग्नघाईही सुरू आहे. तरीही हे सोहळे आनंदाने साजरे होत आहेत. मानवी जीवनातील हा महत्त्वाचा विधी. दोन मनांच्या मीलनाबरोबरीने दोन कुटुंबांचेही ऋणानुबंध जुळले जातात ते याच नात्यामुळे. मुलगी-मुलगा लग्नायोग्य झाला की मग कुटुंबालाच त्यांच्या लग्नाची घाई होते. त्यातही मुलीचे लग्न वेळेतच व्हायला हवे याकडे विशेष कटाक्ष असतो. पूर्वी मुलींनी शिकावे, नोकरी-करियर करून स्वावलंबी बनावे ही विचारधारा रूढ नव्हतीच. त्यामुळे एकदा मुलीचे लग्न करून दिले की आईवडील तसेच घरची सगळीच सुटकेचा निःश्वास सोडत असत.

आज काळ झपाट्याने बदलत आहे. लग्नपरंपरा, विधी, रीतीरिवाज यातही आमूलाग्र बदल जाणवतो. हा बदल एका समाजापुरताच मर्यादित आहे असे नाही तर तो सार्वत्रिक आहे. सांस्कृतिक, सामाजिक, कौटुंबिक स्तरावरील परंपरेने चालत आलेल्या सर्वच मूल्यांना छेद देणारे वातावरण अवतीभोवती दिसत असताना, आपल्या पूर्वीच्या पारंपरिक लग्नसोहळ्यांचे वेगळेपण जाणून घेताना, त्यातील विविधता, निसर्ग आणि माणूस यांचे नाते अधोरेखित करत तसेच माती आणि मानवी नात्यांशी इमान राखीत लग्नसोहळा कसा एक आनंदसोहळाच असायचा… त्यातही समूहाने मिळून आनंदाचे धनी व्हायचे. ही महत्त्वपूर्ण संकल्पना होती. समाज कोणताही असो; एखाद्या कुटुंबातील मुलाचे किंवा मुलीचे लग्न फक्त एका कुटुंबापुरतेच मर्यादित राहात नसे, ते वाड्यावाड्यांवरील सर्वांचेच व्हायचे. त्यामुळे लग्नघरातील सगळी कामे सर्वजण मिळूनच करायचे. लग्न जुळले की घाई घाई व्हायची. समाजबांधव इथे महत्त्वाचे. मानपान, रीतीरिवाज, विधीची परिपूर्णता यांकडे विशेष लक्ष दिले जायचे. लग्न तर दोन मनाचे मीलन, असे असतानाही त्याकाळी वधू-वराची पसंती मोठी माणसे गृहित धरायची. मुलींसाठी वर शोधणे तर अधिकच मुश्कील व्हायचे. सर्वच समाजमनाची धारणा मुलींच्या बाबतीत अशीच होती. सर्वसाधारणपणे घरात धान्याची पोती आणि गोठ्यात जनावरे असली की तीच श्रीमंती होती; आणि असे स्थळ मुलीला चालून येणे म्हणजे मुलगी भाग्यवान असा समज.

श्रीमंतांचे घरी कन्या उपजली
धाकली दिवली काय तप करी
तप करी गा तपिया, तप जालें सुब्रान
बाप सोदिता कुळीवंत, माता सोदिता शिरिमंत
कन्या सोदिता रुपवंत काय भरतार
ही अशी मनोधारणा होती. घराची साफसफाई, रंगरंगोटी, मानाच्या सोयऱ्या-धायऱ्यांना बोलावणे, गावातील मानकऱ्यांचा मानपान अशा कामांची यादी वाढत जाते. प्रत्यक्षात लग्न काही दिवसांच्या अंतरावर आले की मग मांडव घालण्यापासून ते जेवणावळीसाठीची तयारी करताना समूहाची मोठी गरज भासायची. या सर्व कामांसाठी देवाचे- त्यातही ग्रामदैवतांचे- अधिष्ठान महत्त्वाचे मानले गेले होते. लग्नाची होवळीक गावाला, नातेवाईक, मित्रमंडळींना तर होतीच, त्याशिवाय देवदेवतांच्या आगमनाची प्रतीक्षा होती. त्यासाठी मग त्यांना निमंत्रण दिले जायचे ते मांडवात पाच जाती मांडून… त्यावर दळण दळीत मग ग्रामदैवतांना आपोवणे असायचे.
सोन्याचे खाणये गे रुप्याचे दाते
जातासा मांडीला गे सातेरे माये
सातेरे माये गे जाव नको लांब
म्हनी घेवन बस कार्यालागी
अशी सर्व देवतांची नावे गुंफून देवतांचा सन्मान केला जातो. बहुजन समाजातील लग्ने तर सलग पाच दिवस चालायची. त्यात हळद हा विधी, त्याला जोडून लग्नगीते, माटवात दिवेलावण्याचा विधी, लग्न, केळवण, पाच परतवण, नवरा-नवरीचे विविध खेळ, काकणे सोडविणे, धवे मेळे अशा अनेक रीतीरिवाजांची रेलचेल होती. आनंदाला उधाण यायचे. कच्चा फणसाची भाजी, ताज्या कैऱ्यांचे लोणचे, गरमागरम उकडा भात, सोजी, चण्याचा रोस असा अस्सल पारंपरिक बेत.
राबणारे हात जसे खूप होते तसेच मायेने वाढलेही जायचे. त्या जेवणात तृप्तता होती. लग्नात रंगीबेरंगी पेपरात गुंडाळून दिलेले लाडू आणि खास रंगीत पेपरांची फुले असायची. नैसर्गिक सजावट लक्षवेधक होती. सर्वच समाजांतील लग्नात प्रत्येक विधीचे गीत केले गेले. पूर्वी गावडा, कुणबी, धनगरी समाजांतील लग्ने सामूहिक व्हायची. ख्रिश्चन, गावडा समाजांत साधारण इंत्रुजाच्या पहिल्या रविवारी चर्चचे फेस्त आणि त्यानंतरच्या सोमवारी इंत्रुजाची सुरुवात व्हायची. तिथं मग माटव रचून मंगळवारी लग्ने लावली जायची. व्होराला आणण्यासाठी गावची मंडळी गावातील चर्च किंवा सीमेलगत जायची. त्यांचे स्वागत करताना महिला दोन्ही बाजूंनी उभ्या राहात व गाणी गात.

फुला भीतर फुल
फुल पेरपेताचे
फुल पेरपेताचे
आयज तुका व्हकल
मेळल्या ती न्हवऱ्या
भुरगे रेस्पेताचे
गोव्यात पोर्तुगिजांनी छळवाद मांडला. त्या संस्कृतीचा प्रभाव इथल्या सांस्कृतिक, सामाजिक जीवनावर प्रकर्षाने जाणवतो.
गोव्यात लग्नासाठी नोंदणी आवश्यक आहे. ख्रिश्चन समाजातसुद्धा ही नोंदणी करणे अपरिहार्य असून, हिंदू विवाह पद्धतीप्रमाणेच विविध विधी, रीतीरिवाज पार पाडले जातात- चुडो भरणे, साड्या काढणे वगैरे. लग्न हे एक मंगलकार्य, मग तिथे गोडधोडाचे प्रकार केले जातात. त्यात चण्याच्या डाळीपासून केलेली कापे (दोश) हमखास असतात. पूर्वी लग्नात जेवणासाठी लागणारे तांदूळ, पीठ वगैरे घरच्या घरी केले जायचे. घरात तांदूळ असले तरीही लग्नासाठी खास भात उकडले जायचे तेसुद्धा विधीपूर्वक केले जायचे. दळण दळणे, पितरांना संतुष्ट ठेवणे, हळद लावण्याच्या विधीप्रमाणेच नारळाचा रोस लावणे या विधी केल्या जातात त्यावेळी गीते गायिली जातात. या विधीला ‘येर्स’ असे म्हणतात. हिंदू धर्मात मुलीला जशा विविध संसारपयोगी वस्तू देण्याचा प्रघात आहे तसाच तो ख्रिश्चन धर्मातही दिसतो. त्याला ‘दोत’ असे संबोधले जाते. ‘रेस्पेर’ हा महत्त्वाचा विधी. या विधीमुळेच वर-वधू धार्मिक विधीच्या माध्यमातून पती-पत्नीच्या नात्यात बांधली जातात.
बहुजन समाजात लग्न ठरल्यापासूनच्या प्रत्येक विधीला लोकमानसांनी गीतात गुंफलेले आहे. अशीच गीते इतर समाजांतही दिसतात. शब्द, उच्चारण, ग्रामदैवतांची नावे यात फरक आढळतो, मात्र त्यामागील भावना समान असते. मुहूर्तावर गळ्यात माळ पडताना..
तळीये भोवती फुलली शेवती
राम खुटी कळिया, सीता भरी झोळीया
उठ गे सीते, गुथगे माळा
लगनाच्यो जाल्यो येळा…
सीता बसे घोड्यावरी
राम चढे हत्तीवरी
सीतेची माळ गे पडे काय रामावरी…
पूर्वी धनगर समाजातील लग्ने ही वडाच्या झाडाखाली सामूहिक व्हायची. या समाजाला लग्न करण्यासाठी मुहूर्ताची गरज भासत नाही. लग्नासाठी एखादा दिवस घरातील जाणती माणसे स्वतःच्या सोयीनुसार ठरवतात. लग्न ज्यावेळी केले जाते तेव्हा पाच नाचण्याच्या भाकऱ्या, ज्या एका विशिष्ट पद्धतीने केल्या जातात- त्याला ‘दुरटीच्या भाकऱ्या’ असे म्हटले जाते- त्यांना एकावर एक ठेवून त्यावर वधू-वर हाताचे तळवे ठेवतात. पाच सुवासिनी नवऱ्याचे नाव उखाण्यात घेत एकेक भाकरी घेत तिथून बाजूला होते. असे सहज साधेपणाने हे लग्न पूर्वी संपन्न व्हायचे. लग्न जरी साधेपणी होत असायचे तरीही लग्नगीतांची श्रीमंती या सोहळ्याला वेढून असायची.
हळदाळी कुटु हो बारीक बारीक हो
नवऱ्याचा भावा भयणीनु
अशा म्होरश्या सरा हो
अंगांनी रुतलु, डोळ्यांनी कुपलू हो
हळदाळी कुटु हो बारीक बारीक हो
असे गात गात सर्व आप्तेष्टांची नावे त्यात गुंफली जातात.

लग्न हे अपरिहार्यच आहे. लग्न न करता जी व्यक्ती राहते त्याला समाजमनात तेवढा सन्मान दिला जात नसे. लग्न न होता मृत्यू आला तर त्याला ‘निमो’ समजण्यात येई. आदिवासी वेळीप समाजात लग्न न करता राहिलेल्या व्यक्तीला ‘दिंडो’ असे म्हटले जाते. जन्म घेतला आहे तर लग्न करून दिंडेपण घालवायलाच हवे असा नियमच होता. लहान वयात लग्न- तेही ‘रायबारी’च्या म्हणजे मध्यस्थ आणि घरातील बुजूर्गांच्या साथीने ठरविण्यात आलेला विवाह- शास्त्रसंमत मानला जायचा. लग्न ठरले की तोंड गोड करण्यासाठी गोड कातलीची परंपरा पार पाडली जाते, जेणेकरून मुलाच्या घरचे लोक मुलीच्या घरी जाऊन गूळ-कातली खातात. एकूणच गोडधोडाचे पदार्थ या अर्थाने हा रिवाज पार पाडला जातो. गुढी पाडव्याच्या दिवशी दिंड्या जत्रा संपन्न होते. या जत्रेत दिंड्या मुलांनी सहभागी व्हायचे असते. जोपर्यंत दिंडे मुलगे या जत्रेचे व्रत करून जत्रेत सहभागी होत नाहीत तोपर्यंत त्यांना लग्न करता येत नाही, अशी ही परंपरा या समाजात दिसते. मुस्लीम धर्मात तर गीत-नृत्याला मोठे महत्त्व. हळदी, येर्स या विधीशी साम्य असलेली मेहंदीची परंपरा अभूतपूर्व आनंदाची अशीच आहे.
विविध धर्म, जाती-जमातीत लग्नविधीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रत्येकाच्या परंपरा, विधी, रिवाज यात वैविध्य आहे. तरीही त्यातून प्राप्त होणारी आनंदाची अनुभूती यात साम्य आहे. लग्न हा एक धार्मिक तसेच पवित्र संस्कार मानला गेला आहे. जीवनमानाशी सुसंगत अशीच संरचना त्या-त्या समाज, धर्मातील होती. वेळीप समाजातील वडीलधारी मुलीला वर शोधताना घरात धान्याच्या किती ‘मुडी’ साठवून ठेवलेल्या आहेत यावरून घरची श्रीमंती ठरवीत. तसेच बहुजन समाजातही गुरावासरांनी भरलेला गोठा वैभवशाली मानला जायचा. वडाच्या झाडाखाली सामूहिक लग्ने करण्याची परंपरा धनगर समाजाची खासियत होती. लग्नाच्या तयारीपासून ते सारे विधी, परंपरा यांत नैसर्गिकता अधोरेखित व्हायची. सजावटीसाठी केळीचे गबे, भेरली माड, चुडते, आंब्याची पाने, मुडी, बांबूच्या बेळापासून तयार केलेल्या दाळी, येरवण, इतर आवते (वस्तू), मौसमी फळभाज्या, धान्य यांचा जेवणातील वापर असे सगळेच मातीशी नाळ जोडलेले… सांस्कृतिक संचिताचा वैभवशाली वारसा सांगणारे होते. जीवनशैलीतील प्रचंड उलथापालथीमुळे लग्नविधीतही आमूलाग्र बदल झालेला आहे. बदल साचलेपणा नाहीसा करतो हे जरी खरे असले, तरीही सजावट नैसर्गिक दृष्टी बाळगून केली. जेवणावळीच्या पंगतीची, त्यातील अन्नपदार्थांची पारंपरिकता जतन करण्यासाठीची सकारात्मकता बाळगली. यामुळे साधेपणातील सौंदर्याचा आस्वाद घेत आनंद द्विगुणित करता येतो.