पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांना अटक प्रकरणी विधानसभेत न्यायासाठी आवाज उठविणार्या विरोधी गटातील १० आमदारांनी अखेर राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेऊन आमदार अटक प्रकरणात हस्तक्षेप करून न्याय देण्याची मागणी काल केली. दरम्यान, या प्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन राज्यपालांनी आमदारांना दिले आहे.
विधानसभेत सभापतींकडे विरोधी गटातील आमदारांनी या अटकप्रकरणी योग्य न्याय देण्याची मागणी केली. परंतु, विरोधी आमदारांच्या मागणीची योग्य दखल घेतली जात नसल्याने राज्यपाल मलिक यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर कैफियत मांडली आहे. राज्यपाल मलिक यांना विरोधी दहा आमदारांनी एक निवेदन सादर केले आहे. त्यात आमदार खंवटे अटक प्रकरणी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
भाजप सरकारने राज्यात नवनवीन इतिहास घडविण्याचे कार्य केले जात आहे. विरोधी पक्षाच्या अनुपस्थितीत वार्षिक अर्थसंकल्पाचे सादरीकरण केले. अर्थसंकल्प विरोधकांच्या अनुपस्थितीत सादर करण्याची गोव्याच्या इतिहासातील पहिलीच घटना आहे. चार माजी मुख्यमंत्र्यांना सभागृहातून मार्शलद्वारे बाहेर काढण्यात आले, असे विरोधी पक्षनेते कामत यांनी सांगितले.
आमदाराच्या घरात रात्रीच्या वेळी घुसून अटक करणे अन्यायकारक आहे. सभापतींनी कारणे दाखवा नोटीस पाठवून याप्रकरणी चौकशी करायला हवी होती असे प्रतापसिंह राणे यांनी सांगितले.