रोहन कॉंग्रेसच्या वाटेवर

0
40

पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे कॉंग्रेसच्या आसर्‍याला जाणार ही बाब आता जवळजवळ स्पष्ट झाली आहे. जिल्हा पंचायत आणि पंचायत सदस्यांसह त्यांच्या समर्थकांनी काल कॉंग्रेसमध्ये रीतसर प्रवेश केला. त्यामुळे स्वतः खंवटे अपक्ष म्हणून आपला आमदारकीचा कार्यकाळ संपताना कॉंग्रेसमध्ये प्रवेश करतील असे दिसते. येत्या निवडणुकीसाठी गोव्याच्या राजकीय क्षितिजावर विविध राजकीय पक्षांदरम्यान सुरू झालेली हमरीतुमरी लक्षात घेता अपक्ष उमेदवारांचा निभाव ह्या निवडणुकीच्या धुमश्चक्रीत लागणे अशक्य आहे याची जाणीव तिन्ही विद्यमान अपक्ष आमदारांना झालेली आहे. त्यामुळे सांगेचे आमदार प्रसाद गावकर यांनी तृणमूल कॉंग्रेसची वाट धरली आहे, तर गोविंद गावडे भाजपवासी होणे योग्य ठरेल की नाही ह्याची चाचपणी करीत आहेत. रोहन खंवटे यांनी आता कॉंग्रेसला जवळ केले आहे. वार्‍याची दिशा पाहून सूप धरण्याचे कसब राजकारणात अतिशय महत्त्वाचे असते. वार्‍याची बदलती दिशा जर आजमावता आली नाही, तर कोठल्या कोठे भिरकावले जाण्याची अधिक शक्यता असते. त्यामुळे आपले राजकीय अस्तित्व टिकवायचे असेल तर योग्य निर्णय योग्यवेळी घेणे अत्यावश्यक असते. रोहन यांची डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या सरकारमधून ज्या अपमानास्पद रीतीने हकालपट्टी केली आणि त्यांची पर्वरीची जागा हिसकावून घेण्यासाठी ज्या प्रकारे भाजप सध्या जंग जंग पछाडत आहे, ते पाहिल्यास त्यांच्यापुढे एखाद्या भक्कम विरोधी पक्षाला जवळ करण्यावाचून पर्याय उरलेला नव्हता. तृणमूल आणि आम आदमी पक्षांसारख्या आजवर न आजमावल्या गेलेल्या नवख्या पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेस हा राज्यात आजवर बर्‍यापैकी राजकीय अस्तित्व असलेला पक्ष असल्याने रोहन यांना तो अधिक सुरक्षित वाटत असावा.
नवा पर्वरी विधानसभा मतदारसंघ निर्माण झाल्यानंतर रोहन खंवटे यांनी आकस्मिकरीत्या राजकीय क्षितिजावर उडी घेऊन आपले बस्तान बसवले. २०१२ च्या निवडणुकीत त्यांनी भाजपच्या गोविंद पर्वतकरांवर अवघ्या नऊशे मतांनी मात करून आमदारकी पटकावली होती. रोहन यांचा तो विजय मोठा होता, कारण भाजप – मगोची युती त्या निवडणुकीत होती. शिवाय फर्मिना खंवटे नामसाधर्म्याचा फायदा उठवत रोहन यांची मते कापण्यासाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर रिंगणात उतरल्या होत्या, परंतु त्यांना जेमतेम हजार बाराशे मतेच मिळवता आली आणि रोहन यांनी आमदारकी पटकावण्यात यश मिळवले.
२०१७ च्या निवडणुकीत भाजप आणि मगो वेगवेगळे लढले. मगोने राजेश आमोणकर यांना रिंगणात उतरवले, तर भाजपने ‘तुका नाका – म्हाका नाका’ करीत शेवटी गुरुप्रसाद पावसकर यांच्यावर पैज लावली. आम आदमी पक्षही नावापुरता रिंगणात उतरला होता, परंतु खरी लढत रोहन आणि गुरुप्रसाद यांच्यात झाली आणि रोहननी तब्बल चार हजारांवर मतांची आघाडी घेऊन भाजप उमेदवार पावसकर यांना पराभूत केले.
ज्या रोहनना २०१२ च्या निवडणुकीत आठ हजारांच्या आसपास मते मिळाली होती, त्यांना २०१७ मध्ये आपली मतसंख्या अकरा हजारांवर नेता आली, त्यामागे त्यांचे मतदारसंघातील व्यापक कार्य आणि त्याहून अधिक त्यांचा व्यापक जनसंपर्क कारणीभूत होता. त्यामुळेच मोदी लाट देशामध्ये असताना देखील पर्वरीचा आपला बालेकिल्ला रोहन केवळ राखूच शकले असे नव्हे, तर आपले मताधिक्यही बर्‍याच प्रमाणात वाढवू शकले. जवळजवळ ५७ टक्के मते रोहन यांना २०१७ च्या निवडणुकीत मिळाली होती, तर भाजप उमेदवाराची मते २०१२ मधील ७१ टक्क्यांवरून २०१७ मध्ये ३६ टक्क्यांपर्यंत घटली. मात्र, निवडून येताच एका रात्रीत रोहन यांनी कोलांटउडी मारत भाजपचे सरकार घडवण्यात मदत केली आणि मंत्रिपद पटकावले. पर्रीकरांनंतरच्या राजकीय घडामोडींमध्ये रोहन यांना सावंतांनी त्यांची जागा दाखवली आणि सरकारमधून बाहेर काढले. त्यांच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्याचा जोरदार प्रयत्नही झाला. सूडाचे राजकारण एवढ्या थराला जाऊन पोहोचले की विधानसभेचे अधिवेशन सुरू असताना अपरात्री रोहन यांना अटक करण्याचा आततायीपणा भाजप सरकारने केला. मात्र, त्यातून मतदारसंघाची सहानुभूती रोहन यांच्या बाजूने वळेल ह्याचे भानही भाजप नेत्यांना उरले नाही. रोहन यांच्या कॉंग्रेसला जवळ करण्याच्या प्रयत्नांना ही सगळी पार्श्वभूमी आहे. भाजपचा पर्वरीचा उमेदवार अजूनही ठरलेला नाही. मतदारसंघामध्ये सक्षम सर्वमान्य असे नेतृत्व पक्षाला निर्माण करताच आलेले नाही. भाजपमधील इच्छुकांच्या भाऊगर्दीत रोहन यांचे पारडे मात्र बळकट बनत चालले आहे. आगामी निवडणुकीत त्यांची घोडदौड रोखण्यासाठी आता भाजप काय पाऊल उचलते पाहूया.