‘रोड शो’ मध्ये राडा

0
126

कोलकात्यात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या निवडणूक ‘रोड शो’ च्या दरम्यान मंगळवारी रात्री राडा झाला. मंगळवारच्याच अंकात ममता – मोदी संघर्ष या अग्रलेखात आम्ही पश्‍चिम बंगालातील भाजप आणि तृणमूल कॉंग्रेस यांच्यातील सध्याच्या रक्तरंजित संघर्षाची कारणमीमांसा केली होती. या संघर्षाची तीव्रता लक्षात घेता परिस्थिती अधिक बिघडू शकते याची अटकळ होतीच. अमित शहा यांच्या रोड शो दरम्यान ती बिघडली वा हेतुपुरस्सर बिघडवण्यात आली. दंगा कोणी सुरू केला, कुरापत कोणी काढली, जाळपोळ, मोडतोड, नासधूस कोणी सुरू केली याबाबतचे आरोप – प्रत्यारोप दोन्ही पक्षांदरम्यान आता सुरू झाले आहेत, परंतु पश्‍चिम बंगालमधील यावेळची निवडणूक कोणत्या थराला गेलेली आहे हे मात्र यातून जगाला दिसले आहे. अर्थात पश्‍चिम बंगालला असली राडेबाजी काही नवी नाही. पूर्वी डाव्यांशी तृणमूलचा संघर्ष झडायचा. आज या निवडणुकीत तरी डावे जवळजवळ नेस्तनाबूत झालेले दिसत आहेत. डाव्यांचा गड त्रिपुरा भाजपाने गेल्या वेळी हिसकावून घेतला. आता केरळ आणि पश्‍चिम बंगालमध्येही डाव्यांच्या बुडाखाली भाजपाने सुरूंग पेरले आहेत. अनेक डावी मंडळी तृणमूलला धडा शिकवायला भाजपाच्या आसर्‍याला चालली आहेत. डाव्यांकडून सहसा अशा प्रकारचे पक्षांतर होत नसते, परंतु मालडाचा डावा आमदार भाजपामध्ये गेला आणि तेथून तो या निवडणुकीला भाजपतर्फे उभा आहे. पश्‍चिम बंगालात ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने चाललेल्या भाजपच्या आक्रमणाने सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस हादरलेली आहे आणि त्यातूनच पराकोटीच्या संघर्षाला तोंड फुटले आहे. पश्‍चिम बंगालमधील लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा एकही टप्पा हिंसाचाराविना गेलेला नाही आणि आता शेवटच्या टप्प्यामध्ये १९ तारखेलाही हिंसाचार झाल्याविना राहील असे वाटत नाही. पश्‍चिम बंगालमध्ये जम्मू काश्मीरपेक्षाही अधिक अशांतता आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल म्हणाले ते काही खोटे नाही. फरक इतकाच, की काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी आतंक मांडला आहे, तर पश्‍चिम बंगालमध्ये लोकशाहीच्या नावाखाली हा आतंक चालला आहे. आपल्या रोड शोच्या दरम्यान जी दगडफेक, जाळपोळ, नासधूस झाली, ती पाहाता सीआरपीएफचे जवान नसते तर आपण जिवंत बाहेर पडू शकलो नसतो असे स्वतः अमित शहा म्हणाले. पश्‍चिम बंगाल पोलिसांनी नुसती बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोपही त्यांनी केला. खरे म्हणजे या रोड शोतून वातावरण अधिक तापावे असाच प्रयत्न भाजपानेही चालवला होता. ममता बॅनर्जींच्या वाहनांच्या ताफ्यापुढे ‘जय श्रीराम’ अशी घोषणाबाजी करणार्‍या भाजपच्या काही कार्यकर्त्यांना काही दिवसांपूर्वी ममतांच्या आदेशावरून पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे आपण कोलकत्यात येऊन ‘जय श्रीराम’ म्हणून दाखवू असे आव्हान शहांनी दिलेले होते. त्यांच्या रोड शोला दिले गेलेले भगवे स्वरूप, राम आणि हनुमानाच्या वेशात सामील झालेले कार्यकर्ते, जय श्रीरामच्या वारंवार दिल्या जाणार्‍या घोषणा यातून तृणमूलला जणू खडे आव्हान दिले गेले होते. शहाही काही शांतीदूत बनून कोलकात्याला गेेलेेले नव्हते. कोलकाता विद्यापीठाजवळ काही विद्यार्थी निषेध फलक आणि काळे झेंडे घेऊन उभे राहिले आणि संघर्षाला तोंड फुटले. जवळच्या महाविद्यालयातील ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची नासधूस यावेळी झाली. ईश्वरचंद्र विद्यासागर हे बंगाली अस्मितेचे एक प्रतीक. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये त्यांचे महान कार्य आहे. विधवा विवाह शास्त्रसंमत आहे हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी जिवाचे रान केले होते. स्वतःच्या मुलाचा विवाह त्यांनी एका विधवेशी लावून दिला होता. अशा कर्त्या सुधारकाचा पुतळा तोडणे ही साधी गोष्ट नव्हे. बंगालमध्ये त्याचे पडसाद उमटणे स्वाभाविक आहे. हा पुतळा भाजपावाल्यांनी तोडल्याचे सांगत तृणमूल आता बंगाली अस्मितेवर हा भाजपचा घाला असल्याचे कानीकपाळी ओरडून सांगेल. भाजपाला हे तृणमूलचेच सहानुभूती मिळवण्यासाठी केलेले पूर्वनियोजित कृत्य वाटते. दोन्ही बाजूंनी छायाचित्रे आणि व्हिडिओंचे पुरावे पुढे आणलेले आहेत. पुतळ्याची नासधूस कोणीही केलेली असो, त्यातून पश्‍चिम बंगालमध्ये या निवडणुकीत निर्माण झालेली दरीच दृगोच्चर होते आहे. निवडणुकांचे निकाल आल्यावर काय होईल हे वेगळे सांगण्याची गरज नाही. भाजपा पश्‍चिम बंगालमधील किमान अर्ध्या जागा जिंकण्याचा आत्मविश्वास व्यक्त करीत आला आहे. खरोखरच त्यांना त्या मिळवता आल्या, तर तृणमूलच्या सत्तासनाला सुरूंग लागल्याविना राहणार नाही, कारण चाळीस आमदार आमच्या संपर्कात आहेत असे स्वतः मोदींनी काही काळापूर्वी सांगितलेले आहे. भाजपचा वारू पश्‍चिम बंगालने रोखला तर मात्र मोदींची दिल्लीची वाट दुष्कर होईल, कारण पश्‍चिम बंगालमध्ये लोकसभेच्या तिसर्‍या सर्वाधिक जागा आहेत. म्हणूनच पश्‍चिम बंगालचा सामना अटीतटीचा आहे आणि औत्सुक्याचाही! फक्त तो शांततेत पार पडावा एवढीच देशाची अपेक्षा आहे.