रोजंदारीवरील कामगारांच्या किमान वेतनात वाढ करणार ः मोन्सेर्रात

0
26

राज्यातील रोजंदारीवरील कामगारांच्या वेतनात लवकरच वाढ करण्यात येणार असल्याचे काल कामगार आणि रोजगार मंत्री बाबूश मोन्सेर्रात यांनी जाहीर केले. गेल्या ६ वर्षांपासून ह्या कामगारांच्या वेतनात वाढ करण्यात आली नसल्याचे ते म्हणाले. दिल्ली व केरळ येथील रोजंदावरील कामगारांना गोव्यातील कामगारांपेक्षा जास्त वेतन मिळत असल्याचे बाबूश यांनी सांगितले.

या कामगारांना कल्याणकारी योजनांचा लाभ मिळावा यासाठी त्यांना कार्डे वितरित करण्यात येणार असल्याचे सांगून मोन्सेर्रात यांनी, त्यांना एकदा ही कार्डे वितरीत करण्यात आली की त्यांना एकूण १७ कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल. ही कार्डे तयार करण्याची जबाबदारी जीईएलकडे सोपवण्यात येणार असल्याचे सांगितले.

कामगार आणि रोजगार मंडळाची पुनर्रचना करण्यात येणार असल्याची माहितीही मोन्सेर्रात यांनी यावेळी दिली. गेल्या कित्येक वर्षांपासून या मंडळावर काही लोक आहेत. आणि त्यापैकी काही जणांच्या आता स्वत:च्या कंपन्यांही नसल्याचे ते म्हणाले. राज्यातील खासगी कंपन्यांनी सरकारी खात्यांप्रमाणेच आपल्या कंपन्यांत असलेल्या रिक्त पदांची जाहिरात द्यावी असे ह्या कंपन्यांना कळवावे, अशी सूचना करणारे एक पत्र आपण कामगार आयुक्तांना लिहिले असल्याचे मोन्सेर्रात म्हणाले. खासगी कंपन्यांत रिक्त असलेला पदांची नोकर्‍यांच्या शोधात असलेल्या गोमंतकीयांना माहिती मिळायला हवी. ती त्यांना मिळत नसल्याने ते खासगी कंपन्यांतील नोकर्‍यांपासून वंचित राहत असल्याचे मोन्सेर्रात म्हणाले.

सरकार ज्याप्रमाणे नोकर भरतीच्या वेळी पदांची जाहिरात देते त्याप्रमाणे खासगी कंपन्यांनी जाहिरात द्यावी, असे सांगून गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड करणे हा त्यांचा अधिकार असेल, असे मोन्सेर्रात यांनी सांगितले.