रेस्टॉरंटस् व मद्यालये ५०% आसन क्षमतेसह खुली ठेवण्यास मान्यता

0
115

>> जिल्हाधिकार्‍यांचा संचारबंदी वाढीचा आदेश जारी

राज्यातील संचारबंदी १२ जुलैपर्यंत वाढवण्यासंदर्भाचा आदेश काल उत्तर व दक्षिण जिल्हाधिकार्‍यांनी जारी केला. त्यानुसार गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मद्यालये व रेस्टॉरंट्‌स ५० टक्के क्षमतेसह सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची मद्यालये व रेस्टॉरंटस् संघटनेने भेट घेऊन याबाबत निवेदन दिले होते.

पालिका, पंचायत क्षेत्रातील बाजार, शॉपिंग मॉल्स, घरी घेऊन जाण्यासाठी खाद्यपदार्थांची पार्सल सेवा देणारी दुकाने यांना सरकारने आता सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता दिली आहे. यापूर्वी त्यांना दुपारी ३ पर्यंत ही दुकाने खुली ठेवण्यास परवानगी होती.

राज्यातील कॅसिनो मात्र पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी काल स्पष्ट केले. राज्यात गेल्या ९ मेपासून संचारबंदी लागू करण्यात आल्यापासून मांडवी नदीतील कॅसिनो बंद आहेत. राजकीय व सामाजिक मेळावे, क्रीडा मेळावे, शैक्षणिक व सांस्कृतिक मेळावे, लग्न सोहळे आदींना १०० जणांना किंवा ज्या स्थळी ते होणार आहेत तेथील आसन क्षमतेच्या ५० टक्के उपस्थितीत आयोजित करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

क्रीडा प्रकल्प, ऑडिटोरियम, समाज सभागृहे, जलक्रीडा, वॉटर पार्कस्, जीम्स, स्पा, मसाज पार्लर्स, सिनेमा थिएटर्स, आदी खुली करण्यास सरकारने अद्याप परवानगी दिलेली नाही.