रेजिनाल्ड यांचे मन वळवण्यात पक्षश्रेष्ठींना यश

0
35

>> चोडणकर, कामत यांच्याकडून मनधरणी; तूर्त कॉंग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय

कॉंग्रेसचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स हे आम आदमी पार्टीत प्रवेश करून त्या पक्षाच्या उमेदवारीवर निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्या होत्या. मात्र, रेजिनाल्ड यांच्या वाढदिनी काल कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी त्यांची भेट घेत मनधरणी केली. त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्याबरोबरच निवडणूक काळात महत्त्वाची जबाबदारी आणि सत्ता आल्यास मोठे पद देण्याचे आश्‍वासन चोडणकर यांनी त्यांना दिले. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेजिनाल्ड यांनी आपण कॉंग्रेस पक्षातच आहे व यापुढेही कॉंग्रेस पक्षातच राहणार असून, त्या पक्षाच्या उमेदवारीवरच निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट केले.

गिरीश चोडणकर व दिगंबर कामत यांनी काल रेजिनाल्ड यांच्या कुडतरी येथील निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.

यावेळी गिरीश चोडणकर म्हणाले की, रेजिनाल्ड यांच्या पक्षाविषयी काहीही तक्रारी नव्हत्या. त्यांनी स्वतःसाठी पक्षाकडे कोणतीही मागणी केली नव्हती. त्यांच्या ज्या तक्रारी होत्या, त्या त्यांच्या मतदारसंघाविषयीच्या होत्या.

आता निवडणुकीच्या काळात रेजिनाल्ड यांच्याकडे महत्त्वाची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीनंतर जेव्हा राज्यात कॉंग्रेस पक्षाचे सरकार सत्तेवर येईल, तेव्हाही रेजिनाल्ड यांना मोठे पद मिळणार असल्याचे चोडणकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
लोकहितविरोधी भाजपचे सरकार पाडण्यासाठी कॉंग्रेस संघटित राहण्याची गरज आहे. त्यासाठी आम्ही सर्वांनी रेजिनाल्ड यांच्याशी चर्चा केली. त्यांनी आपल्या मतदारसंघातील प्रश्‍न, समस्या, गोव्यातील समस्यांबाबत सविस्तर चर्चा केली. तसेच आम्ही सर्वांनी अध्यक्ष राहुल गांधी व गोवा प्रभारींशी चर्चा केली. त्यांनी मांडलेल्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. त्यानंतर रेजिनाल्ड यांनी कॉंग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय पक्का केला, असे चोडणकर यांनी सांगितले.

गेले काही दिवस काही राजकीय पक्षांनी आपणाशी संपर्क साधला होता; आपण एका पक्षाशी चर्चाही केल्याचे रेजिनाल्ड यांनी मान्य केले. मात्र, आपले जे काही म्हणणे होते, ते आता कॉंग्रेसने ऐकून घेतलेले असून, आपण कॉंग्रेसचा त्याग करणार नसल्याचे रेजिनाल्ड यांनी काल स्पष्ट केले.

आपण आपला मतदारसंघ व गोव्याच्या हितासाठी नेहमी प्रयत्नशील होतो; पण पाठिंबा मिळत नव्हता. अशा मनस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी, पी. चिदंबरम्, दिनेश गुंडू राव, वेणुगोपाल व गोव्यातील पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या पाठिब्यांने समाधान झाले, असेही रेजिनाल्ड यांनी सांगितले.

रेजिनाल्ड हे कॉंग्रेस पक्षाचा त्याग करणार नाहीत, असा पक्का विश्‍वास आपणाला होता. मात्र लोकांच्या मनातील संशय दूर करण्यासाठी आज ही पत्रकार परिषद घेतली. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते असून, त्यांचा गोव्याच्या विकासात सिंहाचा वाटा आहे. आम्ही सर्व एकत्र राहून कार्य करणार आहोत.

  • दिगंबर कामत,
    विरोधी पक्षनेते.

..म्हणून कॉंग्रेसमध्येच राहण्याचा घेतला निर्णय
अनेक पक्ष, संघटनांनी आपणाशी संपर्क करून पक्षात येण्याची मागणी केली होती; पण आपण कोणताच निर्णय न घेता आपले कार्यकर्ते व मतदारांशी चर्चा केली. त्यांनीच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींकडे आपल्या मागण्यांबद्दल व समस्यावर चर्चा करावी, असे सांगितले. पक्षश्रेष्ठी समस्या सोडविण्यासाठी तयार असतील, तर पक्षातच राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. त्यामुळे कॉंग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला, असे आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी सांगितले.

डिलायला लोबो शिवोलीतून अपक्ष निवडणूक लढणार

आमदार मायकल लोबो यांच्याकडून स्पष्ट

आपली पत्नी डिलायला लोबो ही भाजपच्या उमेदवारीची मागणी करीत नसून, ती शिवोली मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे काल मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.
आपण आगामी विधानसभा निवडणूक ही भाजपच्याच उमेदवारीवर लढवणार असून, आपली पत्नी ही अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे ही घराणेशाही होऊ शकत नाही, असा यक्तिवाद देखील त्यांनी केला. आम्हा दोघांनाही जर भाजपने उमेदवारी दिली असती, तर त्याला घराणेशाही म्हणता आले असते, असेही ते म्हणाले.
आपली पत्नी डिलायला लोबो ही गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात असून, २०१७ साली झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता; पण त्यावेळी मनोहर पर्रीकर यांनी त्यांना निवडणूक न लढवण्याची सूचना केली होती. तुम्ही जरा कळ सोसा. ही निवडणूक लढवू नका, अशी विनंती पर्रीकर यांनी केल्यानेच आपली पत्नी निवडणुकीपासून दूर राहिली होती, असा खुलासा देखील मायकल लोबो यांनी केला.

आपली पत्नी ही एक स्वतंत्र व्यक्ती असून, प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. स्थानिक सरपंच, पंच तसेच शिवोली मतदारसंघातील लोकांची त्यांनी विधानसभा निवडणूक लढवावी, अशी इच्छा आहे. आणि त्यांच्या इच्छेला मान देऊन त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे मायकल लोबो यांनी स्पष्ट केले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपणाला नवी दिल्लीत बोलावून घेतले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींविषयी आपणाशी चर्चा केली; मात्र त्यावेळी झालेल्या चर्चेत आपल्या पत्नीच्या उमेदवारीचा विषय आला नव्हता, असेही मायकल लोबो यांनी सांगितले.