सांगे तालुक्यातील रिवण येथील सुमारे 11 लाख चौरस मीटर जमीन आयआयटी गोवाच्या संकुलासाठी ताब्यात घेण्याबाबतची सूचना दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी जारी केली.
सांगे मतदारसंघात आयआयटी संकुल स्थापन करण्यासाठी समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई प्रयत्नशील आहेत. आयआयटी संकुलासाठी नवीन जागा ताब्यात घेण्यात येत आहे, असे फळदेसाई यांनी काही दिवसांपूर्वी म्हटले होते. आयआयटी प्रकल्पासाठी रिवण-सांगे येथील सर्व्हे क्रमांक 168/1 मधील 6,27,703 चौरस मीटर, सर्व्हे क्रमांक 169/1 मधील 3,79,500 चौरस मीटर, सर्व्हे क्रमांक 169/2 मधील 11,315 चौरस मीटर, तसेच रिवणमधील सर्व्हे क्रमांक 169/3 मधील 33,100 चौरस मीटर जमीन ताब्यात घेणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही जमीन नियोजित आयआयटी प्रकल्प तसेच इतर पायाभूत सुविधांसाठी संपादित करण्यात येण्याची शक्यता असल्याचेही या सूचनेत म्हटले आहे.