राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा आज समारोप

0
11

>> समारोप समारंभात देशातील 12 विरोधी पक्षांचे नेते सहभागी होण्याची शक्यता

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अगदी अंतिम टप्प्यात आली आहे. सोमवारी या यात्रेचा श्रीनगरमध्ये समारोप होईल. समविचारसरणी असलेले 12 विरोधी पक्ष सोमवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात सहभागी होणार आहेत. या समारंभासाठी 21 राजकीय पक्षांना आमंत्रित केले होते; परंतु त्यापैकी काही राजकीय पक्ष सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. त्यामध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीडीपीसह इतर काही पक्षांचा समावेश आहे, अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

7 सप्टेंबरला कन्याकुमारी येथून सुरू झालेली यात्रा आता श्रीनगरमध्ये पोहोचली आहे. राहुल गांधींनी जवळपास 150 दिवसांत 3500 किलोमीटर अंतर कापत काश्मीर गाठले आहे.
काल दुपारी राहुल गांधी यांनी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवला. लाल चौकात तिरंगा फडकवणारे राहुल गांधी हे आतापर्यंतचे पंडित जवाहरलाल नेहरु यांनंतरचे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत काल सकाळी काही किलोमीटर चालल्यानंतर दुपारी 12 वाजता लाल चौकात पोहोचले. यावेळी राहुल यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर काँग्रेस नेते देखील उपस्थित होते.

यात्रेच्या समारोप सोहळ्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (एनसीपी), एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके), तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय जनता दल (आरजेडी), नितीशकुमार यांचा जनता दल (युनायटेड), सीपीआय(एम), विदुथलाई चिरुथायगल काची (व्हीसीके), केरळ काँग्रेस, फारुख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील नॅशनल कॉन्फरन्स, मेहबूबा मुफ्ती यांची पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) आणि शिबू सोरेन यांचा झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) हे पक्ष श्रीनगरमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होतील.