रासायनिक खतांमुळे पुढील २५ वर्षांत शेतजमीन नापीक

0
10

>> ‘माती वाचवा अभियाना’चे प्रणेते सद्गुरू यांच्याकडून भीती व्यक्त; गोवा सरकार व इशा फाऊंडेशन यांच्यात समझोता करार

जगभरातील शेतीसाठी आता ज्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत आहे, ते यापुढेही असेच चालू राहिले, तर जगभरातील कृषी जमिनीचे पुढील २५ ते ३० वर्षांच्या काळात वाळूत रूपांतर होणार असून, सगळी शेतजमीन नापीक बनण्याचा मोठा धोका असल्याची भीती काल आध्यात्मिक गुरू व ‘माती वाचवा अभियाना’चे प्रणेते सद्गुरू यांनी काल येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमध्ये ‘माती बचाव’ मोहिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.

सद्गुरू यांनी आपल्या ‘इशा फाऊंडेशन’ या संस्थेद्वारे ‘माती वाचवा’ मोहिम हाती घेतली असून, काल येथे आयोजित कार्यक्रमात ‘माती वाचवा धोरण’ राबवण्यासाठी गोवा सरकार व इशा फाऊंडेशन यांच्या समझोता करार झाला. यावेळी समझोता कराराच्या प्रतींची गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व इशा फाऊंडेशनचे प्रमुख सद्गुरू यांच्यात देवाणघेवाण झाली.
जगभरातील लोकांनी कृषी उत्पादन घेण्यासाठी जर यापुढेही रासायनिक खतांचा वापर करणे चालूच ठेवले, तर २०४५ सालापर्यंत जगभरातील कृषी उत्पादनात ४० टक्क्यांनी घट होण्याचा धोका आहे. तसेच त्यावेळी जगभरातील ९.५ अब्ज लोकांना अन्नाचा मोठा तुटवडा भासणार असून, त्यापैकी कित्येक लोकांवर उपासमारीची पाळी येण्याची भीती असल्याचे सद्गुरू यांनी सांगितले.

या पार्श्‍वभूमीवर आपण ‘माती वाचवा’ मोहीम हाती घेतली असून, या मोहिमेविषयी जागृती घडवून आणण्यासाठी आतापर्यंत ७४ देशांचा दौरा करत तेथील राजकीय नेते, संघटना व प्रशासनाशी याबाबत चर्चा करून त्यांना माती वाचवा मोहिमेत सहभागी करून घेतल्याचे सद्गुरू यांनी सांगितले.

जमिनीच्या वरच्या पहिल्या १२ ते १५ इंचापर्यंत पृथ्वीतलावरील ८७ टक्के एवढ्या जीवांचा अधिवास असतो; मात्र रासायनिक खतांमुळे हे जीव मृत्यूमुखी पडू लागले असून, मातीतील सुपीकता नष्ट होऊ लागली आहे. ही धोक्याची घंटा आहे, असेही ते म्हणाले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सदर मोहीम सुरू केल्याबद्दल सद्गुरू यांचे कौतुक केले. यावेळी कृषीमंत्री रवी नाईक, मंत्री नीलेश काब्राल, रोहन खंवटे, सुभाष फळदेसाई, नीळकंठ हळर्णकर, मुख्य सचिव पुनीत कुमार गोयल व केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आदी व्यासपीठावर हजर होते.

माती वाचवा मोहीम आता हातात घेतली, तर या मातीचे रासायनिक खतांमुळे जे नुकसान झालेले आहे, ते नाहीसे होऊन ही माती पुन्हा एकदा पूर्वपदावर येण्यासाठी ३० ते ४० वर्षांचा काळ लागणार आहे. मात्र, आम्ही जर आता हे काम हाती घेतले नाही व विलंब लावला तर नंतर खराब झालेली माती पूर्वपदावर येऊन ती सुपीक होण्यास तब्बल २०० वर्षांचा काळ लागू शकतो आणि ते मानवजातीसाठी परवडणारे नाही. याबाबत आपली जागतिक आरोग्य संघटनेशीही बोलणी झाली असल्याचे सद्गुरू यांनी सांगितले.