राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्ताने….

0
157
  • प्रा. रमेश सप्रे

विज्ञान दिवसाचा सर्वोच्च उद्देश असतो – वैज्ञानिक दृष्टी – वैज्ञानिक वृत्ती – वैज्ञानिक कृतीचा उदय. यातूनच निर्माण होते वैज्ञानिक मनोवृत्ती नि जीवनशैली (सायंटिफिक टेंपर). विशेष म्हणजे आपण शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमाची दशसूत्री पाहिली तर त्या दहा तत्त्वात एक महत्त्वाचं सूत्र आहे ही वैज्ञानिक दृष्टि नि वृत्ती.

‘सायन्सला आहेस ना? संशोधन क्षेत्रात पुढचा अभ्यास नि काम करणार आहेस ना? मग कसं सदैव सावध-चौकस-दक्ष हवं’.

रामराव, तसं पाहिलं तर इंग्रजीचे प्राध्यापक. पण साहित्यापेक्षा विज्ञान आणि वैज्ञानिक त्याहिपेक्षा वैज्ञानिक जीवनशैलीबद्दल अधिक वाचन-चिंतन करणारे. बच्चे मंडळींना खूप आवडायचे. कारण खूप छान छान गोष्टी सांगायचे. काऊ-चिऊच्या किंवा राजाराणीच्या नव्हेत, पुराणातल्या नि इतिहासातल्याही नव्हेत, तर विज्ञानाच्या, तंत्रज्ञानाच्या तसेच विविध शोधांच्या (डिस्कव्हरीज) यंत्रांच्या जन्माच्या म्हणजे निर्मितीच्या (इन्व्हेन्शन्स). त्यांच्याभोवती निवासी वसाहतीच्या बागेत नेहमी बाळगोपाळांची गर्दी असायची.

युवा मंडळींनाही ते तसे आवडायचे पण त्यांची एक गोष्ट मात्र तरुणवर्गाला खटकत असे, ती म्हणजे ते सतत प्रश्‍न विचारायचे. युवकांना वाटे आपली चारचौघात खिल्ली उडवण्यासाठी ते असं नेहमी करतात. पण रामरावांची दृष्टी निराळी असे. ते म्हणत मला त्यांना माहिती द्यायची किंवा विचारायची नसते तर त्यांचं ज्ञान-विचारशक्ती वाढवायची असते. त्यांच्या मनाची दक्षता, सावधानता, त्यांची जिज्ञासा-चौकस वृत्ती तीक्ष्ण करायची असते.

हेच पहा ना, आज समजा फेब्रुुवारीची तेवीस तारीख आहे. समोरून मेघना येतेय. तशी ती सर्व तरुणाईची प्रतिनिधी आहे. म्हणून सदैव मोबाइल-लॅपटॉप याच विश्‍वांत नि विचारात असते. याचं रामराव स्वागतच करतात. पण तिला ते सहज विचारतात, ‘मेघा, या महिन्याची तीस तारीख कोणत्या दिवशी येतेय गं?’ मेघना पटकन् उत्तर देते, ‘काका, आज शुक्रवार तेवीस म्हणजे तीस तारीख पुढच्या शुक्रवारी!’ विजयी मुद्रेनं रामरावांसमोरून जाताना ते म्हणतात, ‘दे टाळी!’ याचा अर्थ काय तर छान उत्तर दिलंस? .. त्यांच्या हसण्यातला भाव लक्षात घेऊन आपलं काहीतरी चुकलंय हे तिच्या लक्षात येतं. विचार करून म्हणते, ‘सॉरी काका, फेब्रुवारीला तीस तारीख नसतेच.’ यावर अत्यंत वत्सल भावानं रामराव म्हणतात- ‘सायन्सला आहेस ना? संशोधन क्षेत्रात पुढचा अभ्यास नि काम करणार आहेस ना? मग कसं सदैव सावध-चौकस-दक्ष हवं’.

प्रसंग साधाच वाटेल पण तसा तो नाहीये. कारण फक्त माहितीचे डोंगर जमवून मूलभूत संशोधन करता येत नाही. एखादा नारायण मूर्ती (इन्फोसिसचे संस्थापक) जेव्हा स्वतःलाच प्रकट चिंतनातून (लाऊड थिंकिंग) प्रश्‍न विचारतो- ‘आपण भारतीयांनी – विशेषतः शास्त्रज्ञांनी नि तंत्रज्ञांनी विचार केला पाहिजे की आपला दैनंदिन वापरात असलेल्या कोणत्या वस्तूची किंवा गोष्टीची मूळ संकल्पना किंवा त्यावर आधारित वैज्ञानिक दृष्टी आपण जगाला दिली?’
विज्ञानदिनाच्या निमित्ताने असे प्रश्‍न आपणही सतत स्वतःला विचारत राहिलं पाहिजे. त्यांची प्रत्यक्ष उत्तरं मिळाली नाहीत तरी चिंतन-निरीक्षण-प्रयोग-संशोधन करत जगलं पाहिजे. केवळ जगणं-तगणं (सर्व्हायव्हल) हे विज्ञानाचं उद्दिष्ट कधीही नसतं. नसावं, तर मानवी जीवन, पृथ्वीवरील एकूणच वातावरण-पर्यावरण अधिकाधिक आनंददायी-कल्याणकारी कसं होईल याचा विचार केला पाहिजे. विज्ञान असा विचार करतच प्रगत होत असतं.

या संदर्भात विप्रो या अशाच बहुराष्ट्रीय संस्थेचे सर्वेसर्वा प्रेमजी अझीज हे युवकांना सांगतात ती बोधकथा मार्मिक आहे. एका व्यापार्‍याचं माल वाहून नेणारं गाढव अनेक वर्षे काम केल्यानंतर म्हातारं झालं होतं. आता ते काम करू शकत नव्हतं. मग त्याला उगीच खायला कशाला घालायचं, हा स्वार्थी विचार तो व्यापारी करत असल्यानं ते गाढव अगदी मरायला टेकलं होतं. पण मरत मात्र नव्हतं. एक दिवस ते जवळच्या खड्‌ड्यात पडतं. त्याला वर येता येत नाही म्हणून ते जिवाच्या आकांतानं ओरडू लागतं. व्यापारी सर्वांच्या मदतीने तो खड्डा माती टाकून बुजवायला सुरुवात करतो. हेतू हा की खड्डाही भरून निघावा नि गाढवालाही जिवंतपणे मूठमाती द्यावी. आपण आता निश्‍चित मरणार या भयानं गाढव विचार करू लागलं. त्याला एक युक्ती सुचली. अंगावर पडलेली माती झटकून टाकायची (शेक ऑफ) आणि खाली पडलेल्या मातीच्या थरावर उभं रहायचं (स्टेप अप)! जसजसा खड्डा भरत जातो तसंतसं गाढव मातीत पुरलं जाण्याऐवजी वरवर येत राहतं. पुरेसं वर आल्यावर खड्‌ड्यातून उडी मारून वर येतं आणि स्वतःची सुटका करून घेतं. या शहाण्या गाढवाची गोष्ट युवा तंत्रज्ञांना सांगून प्रेमजी म्हणत- लक्षात ठेवा – कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी निराश-हताश न होता प्रयत्न नि प्रयोग करत राहायचं. ‘शेक ऑफ अँड स्टेप अप्… शेक ऑफ अँड स्टेप अप्…’ खरं सांगायचं तर हेच वैज्ञानिक प्रगतीचं मूळ सूत्र आहे. सार्‍या मानवजातीला सुखी बनवणारी यंत्र-साधनं अशा वृत्तीतूनच साकारली जातात.

चुकातून शिकू या (ट्रायल अँड एरर), प्रयत्न-प्रयोग (ट्रायल अँड टेस्ट) करत राहू या असा संदेश देण्यासाठी, दरवर्षी तो घासून-पुसून स्वच्छ चकचकीत करण्यासाठी आपण साजरा करतो ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ दरवर्षी २८ फेब्रुवारी या दिवशी. याच दिवशी का? – याचं उत्तर एका विज्ञान क्षेत्रातील ऐतिहासिक घटनेत आहे. चंद्रशेखर वेंकट (सी.व्ही.)रामन या वैज्ञानिक तपस्व्यानं प्रकाशावर-प्रकाश शक्तीवर संशोधन करताना एक महत्त्वाची गोष्ट शोधून काढली जिला ‘रामन इफेक्ट’म्हणून जगभर मान्यता मिळाली. तो दिवस होता २८ फेब्रुवारी १९२८. त्यासाठी त्यांना नोबेल पारितोषिकही मिळालं.

सी.व्ही रामन या महान संशोधकाचं कृतज्ञ स्मरण करण्याचं कर्मकांडं (रिच्युअल) करणं एवढाच उद्देश विज्ञानदिन साजरा करण्यामागचा नाही. घोषणा-भाषणांपेक्षा संकल्प आणि सिद्धी यासाठी निर्धार करण्याचा दिवस असतो हा विज्ञान दिवस. यासाठी या दिवसापासून सुरू होणार्‍या वर्षासाठी एक नवीन ‘संकल्प विषय (थीम)’ असतो. यावर्षीचा म्हणजे २०१८ सालचा संकल्पविषय आहे – ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान – सुरक्षित भवितव्यासाठी (सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल फ्युचर)’
हा विषय केवळ भारत किंवा भारतीयांच्या कल्याणासाठी नाही तर मानवजातीच्या सुखरूप भावी काळासाठी आहे. कारण विज्ञान-तंत्रज्ञान हे स्थानिक (लोकल) कधीही नसतं तर वैश्‍विक (ग्लोबल) असतं. प्रयोग स्थानिक पातळीवर केले गेले तरी त्याचे निष्कर्ष नि लाभ सार्‍या जगताला मिळणार असतात. या दृष्टीला स्थानिक-वैश्‍विक म्हणजे ‘ग्लोकल व्हिजन’ म्हणतात. अन् हे योग्यच आहे. किंबहुना हेच योग्य आहे.

विज्ञानाकडे मंत्र असतो तर तंज्ञज्ञानाकडे असतं तंत्र. या मंत्र नि तंत्राच्या संयोगातून निर्माण होतात विविध यंत्रं. सारी यंत्र अर्थातच मानवाच्या सोयीसुविधेसाठी, संपन्नता-समृद्धीसाठीच असतात.
एका दृष्टीनं ज्ञानदेवांसारख्या संतांचं ‘भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे’ किंवा ‘हे विश्‍वचि माझे घर’ असं स्वप्न साकार होण्यासाठी विज्ञान व तत्त्वज्ञान तसेच तंत्रज्ञान नि आत्मज्ञान यांचा संयोग-संगम होण्याचीच आवश्यकता असते.

तत्त्वज्ञान-आत्मज्ञान पाया रचतात तर विज्ञान-तंत्रज्ञान त्यावर इमारत उभारून तिचा वापर अवघ्या मानवतेसाठी करतात. स्वामी विवेकानंदांसारख्या आधुनिक काळातील महामानवांचा हाच संदेश असतो. आजच्या काळासाठी तो विशेष उपयुक्त असतो. हल्ली हाताच्या अंगठ्याशेजारच्या दोन बोटांचा इंग्रजी ‘व्ही’सारखा आकार करून आपण विजयी होणार किंवा झालो असा संदेश दिला जातो. या करपल्लवीचा ‘हाताच्या खुणेचा’ अतिरेक नि दुरूपयोेेग हल्ली होऊ लागलाय. एखादा अट्टल बदमाश-गुन्हेगार जामिनावर सुटून तुरुंगातून बाहेर येताना विजयी मुद्रेनं (खरं तर निर्ढावलेल्या निर्लज्जतेनं ) बोटांची ‘व्ही’ करून जमावासमोर, प्रसार माध्यमांच्या कॅमेर्‍यासमोर सर्वांना सामोरं येतो तेव्हा हा अनुभव आपल्याला येतो.

युवा वर्ग ‘व्ही फॉर व्हॅलेंटाइन डे’ ज्या फेब्रुवारीत दिमाखात म्हणतो त्याच फेब्रुवारीत ‘व्ही फॉर विज्ञान दिवस’ हेही विसरता कामा नये. आजच्या नि उद्याच्या जगासाठी तारक किंवा मारक शक्ती कोणती असेल तर विज्ञान-तंत्रज्ञानच. याच विज्ञानशक्तीचा उपयोग करून वैज्ञानिक सार्‍या जगाला ‘आनंदवनभुवन’बनवण्याचा प्रयास करत असताना एखादा माथेफिरू राजकीय नेता किम् योंगसारखा (उत्तर कोरियाचा सर्वेसर्वा) याच शक्तीचा दुरूपयोग करून सार्‍या जगाला महायुद्धाच्या छायेत ढकलण्यासाठी सिद्ध असतो.

विज्ञान दिवसाचा सर्वोच्च उद्देश असतो – वैज्ञानिक दृष्टी – वैज्ञानिक वृत्ती – वैज्ञानिक कृतीचा उदय. यातूनच निर्माण होते वैज्ञानिक मनोवृत्ती नि जीवनशैली (सायंटिफिक टेंपर). विशेष म्हणजे आपण शिक्षणाच्या प्राथमिक स्तरावरच्या अभ्यासक्रमाची दशसूत्री पाहिली तर त्या दहा तत्त्वात एक महत्त्वाचं सूत्र आहे ही वैज्ञानिक दृष्टि नि वृत्ती. प्रत्यक्ष शिक्षणात या उद्दिष्टाची प्राप्ती किती होते हाच खरा संशोधनाचा विषय आहे. प्रा. यशपाल यांच्यासारख्या वैज्ञानिकाला याविषयी चिंतन करताना खूप नैराश्य येतं. एकूण शिक्षणपद्धतीचं वास्तव विज्ञान-तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं भयानक असंच आहे.

घर्‍ी पालकवर्ग अंधश्रद्धा म्हणता येईल अशी अनेक कृत्यं देव-धर्माच्या, कुळाचार-परंपरांच्या नावे करीत असतो. संवेदनक्षम युवामनांना सध्याच्या विषमता, भेदाभेद, अन्याय-अपराध-हिंसा यानं भरलेल्या जगाचं संचालन देव किंवा दैवी शक्ती करते हे पॉत नाही कारण निरनिराळ्या वारी त्या त्या देवांच्या मंदिरासमोरची गर्दी किंवा रांगा पाहिल्यावर तर त्यांना देवाचं नि जीवनाचं खरं स्वरुप कळतच नाही. नकळत तेही त्या जमावाचा भाग बनून जातात.
देव ही अमूर्त शक्ती आहे. मूर्तीत बद्ध किंवा साकार झालेली ‘व्यक्ती’ नव्हे. ही खरी श्रद्धा आहे. अशा श्रद्धेला गुरुत्वाकर्षणासारखी (ग्रॅव्हिटेशन) वैज्ञानिक तत्त्वं सुसंगत वाटतात.

सार्‍या जगाची म्हणून एक सुनियंत्रित व्यवस्था आहे. निसर्गाचे कायदेकानून आहेत. सृष्टी कधीही लहरी अतिरेक करत नाही. अव्यवस्थेला किंवा दुर्व्यवस्थेला जबाबदार असते मानवाची जीवनसरणी. इतर प्राणिसृष्टी – सजीव सृष्टी – आपल्या निसर्गनियमाप्रमाणेच वागत जगत असते. मानवच असंतुलन, असमतोल, विषमता नि सर्वांगीण प्रदूषण निर्माण करतो. दुर्दैवानं यासाठी तो बुद्धी (इन्टेलिजन्स)वापरतो- मिळवलेलं ज्ञान (नॉलेज) उपयोगात आणतो पण विवेकानं (विज्डम) वागत नाही. असं जे म्हटलं जातं – ज्ञान येतं पण विवेक येत नाही. (नॉलेज कम्स बट विज्डम् लिंगर्स.) याची जाणीव होऊन विवेकबुद्धी जागृत करण्याची शपथ विज्ञानदिवसानिमित्तानं घ्यायची असते नि त्यानुसार सार्‍या कृती करायच्या असतात.
यासाठी बालवयापासूनच घरात नि शाळेत एकत्रित प्रयत्न केले गेले पाहिजेत. वैज्ञानिक वृत्तीच्या पैलूंचा विकास करण्यासाठी काही उपक्रम राबविले पाहिजेत.
* बुद्धी (इंटेलिजन्स) ः- पृथ्वीवरचा बुद्धी असलेला एकमेव प्राणी मानव. इतर प्राण्यांची बुद्धी मानवी बुद्धीच्या मानानं क्षुद्र आहे. अगदी गोरिला-चिंपांझी यांसारख्या शेपूट नसलेल्या माकडांची बुद्धीही मानवाच्या लहान मुलाच्या बुद्धीशी तुलना केली तर काहीच नाही.

बुद्धीच्या विकास वाचन-निरीक्षण-चर्चा-चिंतन यातून होतो. त्यासाठी विशेष योजना शिक्षणव्यवस्तेत हवी. नसली तरी पालकांनी व शिक्षकांनी एकत्र येऊन असे प्रयोग-उपक्रम मुलांसाठी केले पाहिजेत. हल्ली काही ठिकाणी याची सुरवातही झालीय. मुलांना घरीच दहावी-बारावीपर्यंतचं शिक्षण देणं त्यात विज्ञान-प्रयोग, निरीक्षण -वृत्ती, वैज्ञानिक छंद (अवकाश निरीक्षण, पक्षी निरीक्षण इ.) अशा उपक्रमांवर विशेष भर दिला जातोय. दुर्दैवानं चांगल्या म्हणवल्या जाणार्‍या विद्यालयातून आजकाल असे उपक्रम राबवले जात नाहीत.

*़ कल्पनाशक्ती (इमॅजिनेशन) ः- ज्यूल व्हर्न नावाच्या एका अतिसामान्य पार्श्‍वभूमी असलेल्या मुलानं आपल्या कल्पनाशक्तीच्या जोरावर – मानवाचा चंद्रप्रवास, जगाची अगदी कमी वेळात प्रदक्षिणा, पृथ्वीचा मध्य – सागराचा तळ यांचा शोध घेणारी कल्पनाशक्तीवर आधारित पुस्तकं लिहिली. त्यापासून प्रेरणा घेऊन यापैकी अनेक गोष्टी मानवानं नंतरच्या काळात करूनही दाखवल्या. कल्पनाशक्तीला प्रेरणा-मार्गदर्शन-वळण लावून ती नवं संशोधन-प्रयोग-चिंतन-लेखन याकडे वापरायला शिकवलं पाहिजे. मुलांची-युवावर्गाची कल्पनाशक्ती खूप तरल व सशक्त असते. संधी हवी – साधनं पुरवायला हवीत – साधना शिकवायला हवी. अर्थातच वडील मंडळींनी.

* प्रयोगशील – जिज्ञासू वृत्ती (क्युरिऑसिटी) ः- लहान मुलांचे प्रश्‍न टाळणं, त्यांना निरुत्साही बनवणं अत्यंत अयोग्य आहे. आणलेली खेळणी मोडणं नि जोडणं, प्रयोग-निरीक्षण करून त्यांच्या नोंदी ठेवून त्यातून सामाान्य नियम शोधून काढायला शिकवलं पाहिजे. स्वतः शिक्षकांनी कोणताही विषय शिकवताना याचं भाान ठेवलं पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे.

* शोध नि संशोधनाची वृत्ती (सर्च अँड रिसर्च) ः- आजूबाजूला दिसणार्‍या वस्तूंमध्ये; घडणार्‍या घटनांमध्ये काहीतरी कार्य-कारण भाव (कॉज अँड इफेक्ट रिलेशनशिप) असतो. त्यावर विचार करून, प्रश्‍न विचारून तो शोधून काढण्यासाठी उत्तेजन व मार्गदर्शन दिलं पाहिजे. हा कार्यकारण भाव हे सार्‍या विज्ञानाचा-विज्ञानपद्धतीचा प्राण नव्हे आत्मा आहे.

* यंत्र-वस्तू-निर्माण करण्याची वृत्ती (मेकिंग ऑफ स्मॉल मशिन्स ऑर सिंपल डिव्हायसेस) ः- अगदी लहान मुलंसुद्धा ठोकळे, सुटे भाग यातून नवनव्या रचना घडवू शकतात. त्यांच्या विविध वस्तू-गोष्टींबद्दल विशिष्ट कल्पना-विचार असतात. त्यांना हवी असतात ती साधने ती देऊन मार्गदर्शन केलं तर काहीतरी नवीन करून दाखवतीलच. प्रेरणा मात्र द्यायला हवी.

अशाप्रकारे अनेक वृत्तींचा मुला-युवांच्यात विकास हा विज्ञानदिनाचा मुख्य उद्देश असतो. या दिवशी खास वृत्तपत्र-दूरदर्शन-इतर समाज माध्यमं यातून योग्य वातावरण निर्माण केलं जातं. काही स्पर्धा आयोजित केल्या जातात. हे सर्व चांगलं व अपेक्षित आहे. आत अधिक सुसूत्रता आणून त्या प्रयत्नात अधिक सातत्य आणून केवळ विज्ञानदिनापुरतं नव्हे तर सर्वकाळ विज्ञानाचं चैतन्य व प्रभाव (स्पिरिट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी) टिकवला पाहिजे. हे बिलकुल अवघड नाहीये. पालक-शिक्षक-चालक (शिक्षणसंस्था चालवणारे – शिक्षणाधिकारी व अनुभवी मंडळी) एकत्र आली तर काहीही वेळ लागणार नाहीये. हवी ती या सर्वांची जिद्द नि इच्छाशक्ती!

संधी आहे. सर्वांत मुख्य म्हणजे वैज्ञानिक जीवनशैली स्विकारण्यासाठी पुनः सतर्क होण्याची, समर्पित बनण्याची प्रतिज्ञा करण्याचा राष्ट्रव्यापी दिवस आहे.
हा साजरा करण्यासाठी नि अत्यंत तळमळीनं (पॅशनेटली) विज्ञानदृष्टी समाजाला देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी ज्या संस्थांनी पुढाकार घेतलाय त्यात आहेत- उटी(कर्नाटक) येथील रेडियो अंतरीक्ष विज्ञान केंद्र; खोडद-पुणे (महाराष्ट्र) येथील जगप्रसिद्ध जायंट मीटर वेव्ह रेडियो टेलिस्कोप प्रकल्प; मूलभूत विज्ञान शाखांत संशोधन करणारी टाटा इन्स्टि ट्यूट तसेच पुणे येथील आयुका ही संस्था.
यावरून एक गोष्ट ध्यानात येईल- विश्‍व-अंतरीक्ष-हवामान (क्लायमेट) या क्षेत्रातली संस्था मानवतेच्या सुखी भविष्यासाठी कार्यरत आहेत. आज प्रदूषणापेक्षाही मानवजातीला अधिक तापदायक होताहेत ते निसर्गातील-हवामानातील परिवर्तन नि अनियमितता (क्लायमेट चेंज).

आपणही स्वतः नि आपल्या मुलांकडून-युवावर्गाकडून संकल्पपूर्वक प्रतिज्ञा करून घेतली पाहिजे. वैज्ञानिक अभिवृत्तीच्या (सायंटिफिक अटिट्यूड) स्वतःमधील विकासासाठी नि त्याच्या जीवनातील कार्यवाहीसाठी हे विज्ञानदिवशी आपलं आद्य कर्तव्य आहे नि सी.व्ही.रमण तसेच अनेक वैज्ञानिकांना दिलेली योग्य श्रद्धांजलीआहे. कृतज्ञतेनं ती आपण द्यायलाच हवी. द्यायला हवीच.