>> बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांची माहिती
राज्यातील राष्ट्रीय महामार्ग एनएच ६६ वरील खड्डे येत्या १५ मे २०२२ पर्यत बुजविण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सार्वजनिक बांधकाम खाते आणि कंत्राटदाराला दिला आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाची कार्यवाही करण्यास प्राधान्य दिले जाणार आहे. राष्ट्रीय महामार्गाबरोबर राज्यातील मुख्य रस्त्यांवरील खड्ड्यांची दुरुस्ती केली जाणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.
पत्रादेवी ते मडगावपर्यंतच्या एनएच ६६ या राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन ठेकेदारांकडून केले जात आहे. या रस्त्याच्या कामात सुधारणा होत आहे. या रस्त्यावर खड्डे आढळून येणार नाहीत याकडे लक्ष दिले जाणार आहे. या दोन्ही ठेकेदारांकडून रस्त्यावरील खड्डे बुजवून घेण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, असे मंत्री काब्राल यांनी सांगितले.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाकडून रस्ता दुरुस्ती, डांबरीकरणासंबंधी तयार करण्यात येणार्या प्रस्तावांची छाननी करण्यासाठी चार सदस्यांचा समावेश असलेली एका खास समितीची निवड केली जाणार आहे. रस्ता विभागाकडून रस्ता डांबरीकरणासंबंधी येणार्या सर्व प्रस्तावांची खास समितीकडून छाननी करून गरजेच्या रस्त्याच्या दुरुस्तीला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. खात्याच्या काही फाईल्स मंजुरीसाठी अर्थ खात्याकडे प्रलंबित आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याशी चर्चा करून यावर तोडगा काढला जाणार आहे. रस्त्याच्या डांबरीकरण कामाचीसुद्धा आकस्मिक पाहणी केली जाऊ शकते. कंत्राटदारांच्या बिलांचीही तपासणी केली जाणार आहे, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले. मलनिस्सारण विभागाची बरीच कामे विविध कारणांमुळे प्रलंबित आहेत, असेही मंत्री काब्राल यांनी सांगितले.