>> क्रीडामंत्री गावडे यांची घोषणा, प्रशिक्षकांनाही रोख बक्षिसे
गोव्यात सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्यासाठी सुवर्ण पदक जिंकणाऱ्या खेळाडूला 3 लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात येणार असल्याची घोषणा काल क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी केली. सरकार दरबारी खेळाडूंसाठी बक्षीस योजना नसल्याची टीका वारंवार झाल्यानंतर सरकारकडून अखेर खेळाडू आणि प्रशिक्षकांसाठी बक्षिसाची घोषणा केली आहे. राज्यासाठी पदक जिंकणाऱ्या खेळाडू आणि प्रशिक्षकांना रोख रक्कम बक्षीस म्हणून दिली जाणार असल्याचे क्रीडामंत्री गावडे यांनी घोषित केले आहे.
सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला तीन लाख रुपयांचे तर, प्रशिक्षकाला तीस हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले जाणार आहे.
स्पर्धेत रौप्य पदक विजेत्या खेळाडूला दोन लाख रुपये आणि प्रशिक्षकाला वीस हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येणार असून कांस्य पदक विजेत्या खेळाडूला एक लाख रुपयांचे बक्षीस आणि प्रशिक्षकाला दहा हजार रुपये रोख रक्कमेचे बक्षीस दिले जाणार असल्याचे मंत्री गावडे यांनी जाहीर केले. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गोव्याने यंदा उत्तम कामगिरी करताना एकूण 35 पदकांची कमाई केलेली आहे. या 35 पदकांमध्ये 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 26 कांस्य पदकांचा समावेश आहे.