राष्ट्रीय कार्यकारिणीतून भूषण, यादवांची हकालपट्टी

0
149

आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय मंडळाच्या काल झालेल्या बैठकीत एका ठरावाद्वारे या पक्षाचे संस्थापक सदस्य नामवंत वकील प्रशांत भूषण व योगेंद्र यादव तसेच आनंद कुमार व अजित झा या चौघाजणांना राष्ट्रीय कार्यकारिणीमधून बडतर्फ करण्यात आले. त्यांच्यावर पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले.अभूतपूर्व गोंधळ व नाट्यपूर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर मंडळाच्या बैठकीत वरील ठराव मांडण्यात आला. या ठरावाला फक्त १० जणांनी विरोध केला. तर ५४ जणांनी मतदानात भाग घेतला नाही अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस पंकज गुप्ता यांनी दिली. या अनुषंगाने एका घटनेत ‘आप’चे अंतर्गत लोकपाल रामदास यांना संघर्षाची स्थिती टाळण्यासाठी या बैठकीस उपस्थित न राहण्याचे निर्देश देण्यात आले होते व या कृतीबद्दल बंडखोर नेते प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनी टीका केली होती.
बडतर्फीचा ठराव केजरीवालांच्या अनुपस्थितीत संमत
वरील चौघांना पक्षातून बडतर्फ करण्याविषयीचा ठराव मनिष सिसोदिया यांनी मांडण्याआधीच पक्षप्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भावनिक भाषण केले व ते बैठकीतून निघून गेले. केजरीवाल यांच्या अनुपस्थितीत हा ठराव वाहतूकमंत्री गोपाळ राय यांच्या अध्यक्षतेखाली मांडण्यात आला.
हा लोकशाहीचा खून -यादव
बैठकीनंतर बाहेर येऊन योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी गुंडांचा वापर करण्यासह बैठकीत गैर प्रकारांचा वापर करण्यात आल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर केला. ‘तो लोकशाहीचा खून होता. सर्व काही पूर्वनियोजितरीत्या करण्यात आले आणि घालून दिलेल्या प्रक्रियांच्या पूर्ततेविना ठराव मांडून काही मिनिटातच संमत करण्यात आला. हा निव्वळ देखावा होता’ अशी प्रतिक्रिया यादव यांनी व्यक्त केली.

सर्व पूर्वतयारीनेच : भूषण
प्रशांत भूषण यांनी आरोप केला की केजरीवाल आम्हाला पक्षातून हाकलून लावण्याच्या तयारीनेच आले होते आणि आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या कार्यकारिणी सदस्यांना मारहाण करून जखमी करण्यात आले. बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही, कोणतेही मतदान झाले नाही, असेही भूषण यांनी सांगितले.
यादव अफवा पसरवितात : आशुतोष
अरविंद केजरीवाल यांचे एकनिष्ठ सहकारी आशुतोष यांनी सांगितले की राष्ट्रीय कार्यकारिणीच्या सदस्यांना बैठकीत मारहाण झाल्याचा अफवा योगेंद्र यादव यांनी पसरविल्या आहेत. बैठकीत धक्काबुक्की किंवा मारहाणीचा प्रकार झालेला नसुन सहानुभूती मिळवण्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचे आशुतोष म्हणाले.
आपचे अंतर्गत लोकपल रामदास यांना बैठकीस उपस्थित राहण्यापासून वंचित ठेवण्यात आल्याच्या प्रकारावरही भूषण यांनी हरकत घेतली. काल केजरीवाल व त्यांच्या समर्थकांनी जे केले ते सर्व पूर्वनियोजित केले. त्यांनी सर्व मर्यादांचे उल्लंघन केले. हे सर्व काही केजरीवाल व त्यांच्या कंपूच्या मानसिकतेवर प्रकाशझोत टाकणारे आहे असे ते म्हणाले. कालच्या बैठकीआधी यादव यांनी पक्षाचे अंतर्गत लोकपाल रामदास (माजी नौदल प्रमुख) यांनी पाठविलेले पत्र जाहीर केले. या पत्रात रामदास यांनी पक्षाने आपल्याला बैठकीस उपस्थित न राहण्याची सूचना केल्याबद्दल आश्‍चर्य केले आहे याकडे योगेंद्र यांनी लक्ष वेधले.
मेधा पाटकरांचा ‘आप’ला रामराम
योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांच्यावरील कारवाईचा निषेध करीत नामवंत समाज कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आम आदमी पक्षाचा राजीनामा दिला. येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत पाटकर यांनी आम आदमी पक्षाच्या नेतृत्वावर कठोर टीका केली. ‘आप’च्या बैठकीत जे घडले आहे त्याचा आपण निषेध करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या पक्षात तत्त्वांचे उल्लंघन होत असून भूषण व यादव यांच्यावरील आरोप तथ्यहीन असल्याचेही त्या म्हणाल्या.