देशातील १६ व्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी आज दि. १८ जुलै रोजी मतदान होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून द्रौपदी मुर्मू या उमेदवार आहेत. तर संयुक्त पुरोगामी आघाडीतर्फे यशवंत सिन्हा हे निवडणूक रिंगणात आहेत. दरम्यान, उपराष्ट्रपतीपदासाठी काल विरोधी पक्षांकडून मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाले असून भाजप आघाडीतर्फे जगदीप धनकड यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
पतीपदाच्या निवडणुकीसाठी आमदारांना मतदानासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या निवडणूक मतदान प्रक्रियेला सकाळी १० वाजता प्रारंभ होणार आहे. राष्ट्रपती निवडणुकीत गोवा विधानसभेचे ४० आमदार मतदान करणार आहेत.
राज्यात लोकसभेचे दोन आणि राज्यसभेचा एक खासदार आहे. त्यांना नवी दिल्ली येथे मतदान करावे लागणार आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत साहाय्यक निवडणूक अधिकारी नोरोन्हा यांनी आमदारांना मार्गदर्शन केले आहे. राज्यात सत्ताधारी भाजपकडे एकूण २५ आमदार आहेत. तर विरोधी पक्षात १५ आमदार आहेत. भाजपने एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना २५ पेक्षा जास्त मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. कॉंग्रेस पक्षातील काही आमदारांकडून एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान केले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधकांकडून
मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी
आज राष्ट्रपतीपदासाठी मतदान होत असून आता उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत राजकीय घडामोडींची सुरू झाल्या आहेत. काल दिल्लीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीमध्ये विरोधी पक्षांच्या उपराष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. यासंदर्भात बैठकीनंतर या पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवारांनी माहिती दिली आहे. या बैठकीला एकूण १७ पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी सर्वांनी एकमताने मार्गारेट अल्वा यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं शरद पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्या मंगळवारी अर्थात १९ जुलै रोजी मार्गारेट अल्वा यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी विरोधी पक्ष जाणार असल्याचे शरद पवारांनी यावेळी सांगितले. रालोआकडून उपराष्ट्रपतीपदासाठी जगदीप धनकड यांना उमेदवारी दिली आहे.
शिवसेनेचा रालोआला पाठिंबा
शिवसेनेच्या खासदारांनी उद्धव ठाकरेंवर रालोआच्या उदेवाराला पाठिंबा देण्यासाठी दबाव टाकला असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंवा देत असल्याचे जाहीर केले. त्या आदिवासी उमेदवार असल्याने त्यांना समर्थन देत असल्याचेही त्यांनी सांगितलं. मात्र उपराष्ट्रपतीपदासाठी मात्र शिवसेनेने यूपीएला पाठिंबा दिला आहे. आठवडाभराच्या अंतराने होत असलेल्या दोन निवडणुकांमधील शिवसेनेने दोन वेगवेगळ्या भूमिका जाहीर केल्या आहेत.
आमदार स्वेच्छेने चेन्नईला ः राव
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी वाढत्या दबावामुळे कॉंग्रेसचे पाच आमदार स्वेच्छेने चेन्नईला गेले आहेत, असा दावा कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी केला आहे.
कॉंग्रेसने चेन्नईला हलवलेले
पाचपैकी ४ आमदार गोव्यात
कॉंग्रेस पक्षाचे चेन्नई येथे हालविण्यात आलेल्या पाचपैकी चार आमदार काल संध्याकाळी गोव्यात दाखल झाले आहेत. त्यात संकल्प आमोणकर, युरी आलेमाव, रूडाल्फ फर्नांडिस, ऑल्टन डिकॉस्टा यांचा समावेश आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे आमदार चेन्नई येथे वैयक्तिक पातळीवर गेले होते, असा दावा गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
राष्ट्रपती निवडणुकीत कॉंग्रेसची मते फोडली जाण्याची शक्यता असल्याने कॉंग्रेसच्या पाच आमदारांना चेन्नई येथे शुक्रवारी हालविण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. कॉंग्रेसचे सर्व ११ आमदार एकसंघ आहेत, असे आमदार युरी आलेमाव यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत राज्यातील विरोधी पक्षाची सर्व मते युपीएचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. गोवा फॉरवर्ड, आरजी, आपच्या आमदारांशी संपर्क साधून यशवंत सिन्हा यांना मतदान करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पाटकर यांनी सांगितले.
कायम निमंत्रित यादीतून दिगंबर कामत यांना वगळले
अखिल भारतीय कॉंग्रेस कार्यकारी समितीच्या कायम निमंत्रित यादीतून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, माजी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांना वगळण्यात आले आहे. राज्यातील कॉंग्रेसच्या आमदारांच्या भाजप प्रवेशाच्या पार्श्वभूमीवरील राजकीय पातळीवरील हालचालीनंतर कॉंग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी गोव्यातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कामत यांना वगळण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीचा आदेश कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी जारी केला आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाचे अकरा आमदार निवडून आले आहेत. कॉंग्रेस पक्षाने विरोधी पक्षनेतेपदी मायकल लोबो यांच्या नावाची घोषणा करताना ज्येष्ठ नेते दिगंबर कामत यांची अखिल भारतीय कॉंग्रेस कार्यकारी समितीचे कायम निमंत्रित म्हणून नियुक्ती केली होती. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसच्या आठ आमदारांना भाजपमध्ये प्रवेश देण्यासाठी जोरदार राजकीय हालचाली झाल्या. भाजप प्रवेशासाठी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारांचा दोन तृतीयांश गट न झाल्याने भाजपमध्ये प्रवेशाचा प्रयत्न तूर्त फसला आहे.
कॉंग्रेस पक्षातील राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी ज्येष्ठ आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने गोवा विधानसभेच्या सभापतीकडे आमदार दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांना अपात्र करण्यासाठी अर्ज केला आहे.
गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने विरोधी पक्षनेते पदावरून मायकल लोबो यांना हटविण्यासाठी सभापतींकडे अर्ज केला आहे. तथापि, विरोधी पक्षनेतेपदी मायकल लोबो अजूनपर्यंत कायम आहेत. सभापतींनी काही तांत्रिक कारणास्तव मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेतेपदावरून हटविले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.
कॉंग्रेस पक्षाला नवीन विरोधी पक्षनेत्याची निवड करण्यात अजूनपर्यंत यश प्राप्त झाले नाही. कॉंग्रेसचे निरीक्षक मुकुल वासनिक यांनी कॉंग्रेसच्या आमदारांची बैठक घेऊन विरोधी पक्षनेतेपदाबाबत चर्चा केली.
या बैठकीला दिगंबर कामत वगळता दहा आमदारांची उपस्थिती होती. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी नवी दिल्ली येथे जाऊन वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली आहे. परंतु, विरोधी पक्षनेतेपदासाठी नावाची घोषणा करण्यात आलेली नाही.