राम मंदिर परिसरात सुरक्षारक्षकाचा गोळी लागून संशयास्पदरित्या मृत्यू

0
8

अयोध्येतील राम मंदिर परिसरात तैनात असलेल्या एका सुरक्षा रक्षकाचा गोळी लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या सुरक्षारक्षकाचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. मंदिरासमोर उभारण्यात येत असलेल्या व्हीआयपी गेटजवळ हा सुरक्षारक्षक तैनात होता; मात्र बुधवारी पहाटे सुरक्षा रक्षकाच्या डोक्यात अचानक गोळी लागली. त्यात सुरक्षारक्षकाचा मृत्यू झाला.

या सुरक्षारक्षकाला गोळी लागल्यानंतर त्या ठिकाणी तैनात असलेल्या दुसऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले; मात्र रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. ही घटना घडलेल्या ठिकाणापासून राम मंदिर फक्त 150 मीटर अंतरावर आहे.

शत्रुघ्न विश्वकर्मा असे गोळी लागून मृत्यू झालेल्या या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. तो उत्तर प्रदेश येथील आंबेडकर नगरमधील रहिवासी होता. या सुरक्षा रक्षकाला ही गोळी कशी लागली? नेमके काय घडले? या संदर्भात पोलिसांकडून तपास करण्यात यत आहे. राम मंदिराच्या सुरक्षेसाठी एसएसएफचे जवान तैनात करण्यात येतात. त्यामध्ये हा सुरक्षारक्षक सामील होता. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.