रामायणावर आधारित टपाल तिकिटाचे ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत अनावरण

0
151

पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत होणार्‍या राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचे प्रातिनिधिक चित्र असणारे आणि रामायणावर आधारित पोस्टाचे तिकीट प्रकाशित केले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने राम भक्तांना पाच ऑगस्ट रोजी अयोध्येत येऊन गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, यावेळी प्रकाशित करण्यात येणार्‍या पोस्टाचे तिकिटापैकी एक तिकीट हे राम मंदिराची प्रातिनिधिक प्रतिकृती असेल. तर दुसर्‍यावर इतर देशांमध्ये रामाचे महत्व सांगणार्‍या गोष्टी असतील.
अयोध्या रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून रामलीलेसंदर्भातील काही विशेष पोस्टर आणि कटआऊट्स बनवले जात आहेत. जगभरामध्ये प्रभू रामाचा वेगवगेळ्या संस्कृतींमध्ये असणारा प्रभाव या पोस्टर आणि कटआऊट्समध्ये दाखवण्यात येणार असून राम मंदिराकडे जाणार्‍या मार्गावर हे हे पोस्टर आणि कटआऊट्स ठेवले जाणार आहेत. अयोध्येमधील भिंती आणि खांबांवर प्रभू राम आणि रामायणातील प्रसंगांची चित्रे काढली आहेत.
दरम्यान, अयोध्येमध्ये येण्याऐवजी घरुनच दूरदर्शनवर या कार्यक्रमाचे लाइव्ह प्रसारण पाहून संध्याकाळी आपल्या राहत्या घरामध्ये दीपोत्सव करून आनंद साजरा करा असे आवाहन ट्रस्टने केले आहे.

दहशतवादी हल्ल्याची शक्यता
दरम्यान, पाकिस्तान पुरस्कृत काही दहशतवादी भारतात हल्ला करण्याच्या तयारी असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. यात अयोध्येतील राम मंदिरही दहशतवाद्यांच्या निशाण्यावर असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानुसार अयोध्या, दिल्ली, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

हरवळे परिसरातील माती पाठवणार ः मुख्यमंत्री

अयोध्या – उत्तर प्रदेश येथील श्रीराम मंदिराच्या पायाभरणीसाठी हरवळे साखळी येथील श्री रूद्रेश्वर मंदिराच्या प्राकारातील पवित्र माती पाठविली जाणार आहे आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल दिली. पंतप्रधानांच्या हस्ते श्रीराम मंदिराची पायाभरणी केली जाणार आहे. अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर बांधणे हे भक्त, भाविकांचे स्वप्न आता साकारणार आहे. मंदिराच्या बांधकामासाठी विश्‍व हिंदू परिषदेने रूद्रेश्वर मंदिर प्राकारातील माती दिली आहे. ही माती अयोध्येत पाठविली जाणार आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.