राज्य सरकारची ठरावी लोकांवरच वक्रदृष्टी : पाटकर

0
26

राज्य सरकारने ठरावीक लोकांना ‘लक्ष्य’ करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात अंगणवाडी कर्मचार्‍याच्या आंदोलनात हजारो अंगणवाडी सेविकांना सहभाग घेतला; मात्र केवळ सात अंगणवाडी सेविकांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. तसेच राज्यात अनेक ठिकाणी जमिनींबाबत गैरप्रकार सुरू आहेत; परंतु ठरावीक लोकांवरच गुन्हे दाखल केले जात आहेत, असा आरोप गोवा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काल केला.

अमित पाटकर यांनी आझाद मैदानावर धरणे आंदोलन करणार्‍या सात अंगणवाडी सेविकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पाटकर म्हणाले की, सात अंगणवाडी सेविकांवर सूड भावनेतून बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्यासमवेत आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन अंगणवाडी सेविकांवरील अन्याय दूर करण्याची विनंती केलेली आहे.

राज्यातील महिला व बालकल्याण खात्याच्या महिला अधिकार्‍यांकडून सात महिलांवर अन्याय केला जात आहे. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात गंभीरपणे लक्ष घालून अंगणवाडी सेविकांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी पाटकर यांनी केली.

समाजकल्याणच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचे मानधन रखडले आहे. महिला व बालकल्याण खात्याच्या योजनांचे अर्ज निधीअभावी प्रलंबित आहेत. सरकारकडून कर्ज घेऊन कारभार चालविला जात आहे. राज्यासमोर अशा प्रकारचे आर्थिक संकट असताना ४० कोटी रुपये खर्चून नवीन राजभवन उभारण्याचा घाट घातला जात आहे, अशी टीका पाटकर यांनी केली.