राज्य निवडणूक आयोग अकार्यक्षम

0
120

>> गोवा फॉरवर्ड व आपचा पत्रपरिषदेत आरोप

गोवा फॉरवर्ड आणि आम आदमी पक्ष गोवा यांनी बुधवारी घेतलेल्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदांतून राज्य निवडणूक आयुक्तांवर अकार्यक्षमतेचा आरोप केला आहे.

राज्य निवडणूक आयोग आणि आयुक्त केवळ नाममात्र बनले आहेत. भाजप सरकारच्या सूचनांनुसार राज्य निवडणूक आयोगाचा कारभार चालविला जात आहे, असा आरोप गोवा फॉरवर्डचे सरचिटणीस मोहनदास लोलयेकर यांनी पत्रकार परिषदेत केला.

राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील आगामी जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख व इतर निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची गरज होती. परंतु, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख जाहीर केली आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीला केवळ एक महिन्याचा कालावधी शिल्लक असल्याने प्रभाग राखीवता लवकर जाहीर करण्याची गरज होती. परंतु, राज्य सरकारने निवडणुकीला केवळ एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला तरी प्रभाग राखीवतेची माहिती जाहीर केलेली नाही.

भाजपच्या उमेदवारांच्या सोयीसाठी प्रभाग राखीवता जाहीर करण्यात जाणीवपूर्वक उशीर केला जात आहे. राज्य निवडणूक आयुक्त गोव्यात सुट्टीवर असल्यासारखे वागत आहेत, अशी टीका लोलयेकर यांनी केली.
राज्य निवडणूक आयोग स्वायत्तता गमावून बसला आहे. निवडणूक पारदर्शक ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाला स्वायत्तता देण्यात आलेली आहे. परंतु, राज्य निवडणूक आयोगाच्या जिल्हा पंचायत निवडणूक कार्यक्रमात पारदर्शकता दिसून येत नाही. राज्य निवडणूक आयुक्त जिल्हा पंचायत निवडणुकीला न्याय देण्याची शक्यता कमीच आहे, अशी टीका उपाध्यक्ष दुर्गादास कामत यांनी केली.

आयोगाच्या अस्तित्वाचा प्रश्‍न ः आम आदमी पक्ष
राज्य निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. परंतु, भाजपच्या राजवटीत या आयोगाच्या अस्तित्वाबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कारभारात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत आहे. जिल्हा पंचायत निवडणुकीची तारीख जाहीर केली. परंतु, प्रभाग राखिवता जाहीर करण्यात आलेली नाही, अशी टीका आपचे राज्य निमंत्रक एल्वीस गोम्स यांनी पत्रकार परिषदेत काल केली. गोवा सरकारची कार्यपद्धतीबाबत योग्य नसल्याची दिसून येत आहे. सरकारला जाहीर केलेले तीन निर्णय मागे घ्यावे लागले आहेत. आता, मद्यावरील शुल्कात कपात केली जाण्याची शक्यता आहे, असेही गोम्स यांनी सांगितले.