राज्यात ७ जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता

0
65

>> गोवा हवामान विभागाचा अंदाज; केरळात मान्सून सरी कोसळल्या

केरळमध्ये मान्सूनचे गुरुवारी आगमन झाले असून, केरळच्या दक्षिणेकडील भागात मान्सून सरी कोसळल्याची माहिती भारतीय हवामान खात्याचे महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी दिली. दोन दिवस उशिराने केरळात मान्सून दाखल झाल्याने गोव्यात मान्सूनचा पाऊस नियोजित ५ जूनला दाखल होण्याची शक्यता कमी आहे. राज्यात ७ जूनच्या आसपास मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती गोवा हवामान विभागाने काल दिली.

केरळमध्ये दरवर्षी १ जूनला मान्सून दाखल होतो. त्यानंतर साधारण चार दिवसांनी म्हणजेच ५ जूनला गोव्यात मान्सून दाखल होतो. यावर्षी केरळात मान्सून दाखल होण्यास दोन दिवसांचा विलंब झाला आहे. त्यामुळे गोव्यातील मान्सूनचे आगमन लांबणार आहे.

मोसमी पाऊस दक्षिण अरबी समुद्राचा काही भाग, लक्षद्वीप, दक्षिण केरळ, दक्षिण तामिळनाडू, मालदीव आदी भागात दाखल झाला आहे. मोसमी पावसाची गती पाहता गोव्यात दोन ते तीन दिवस विलंबाने पाऊस दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
केरळमध्ये सामान्यत: १ जून रोजी मान्सून दाखल होतो; परंतु यंदा दोन दिवस उशिराने वरुणराजाने हजेरी लावली. याआधी हवामान खात्याने यंदा मान्सून केरळमध्ये ३१ मेला दाखल होईल, असा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर केरळमध्ये अद्याप मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले नसल्याने तो उशिरा दाखल होईल, असे ३० मे रोजी हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले होते.

हवामान विभीगाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेशमधील काही भागांमध्ये १० जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. कोकणात सरासरीहून पाऊस कमी असू शकेल. पावसाळ्याच्या सुरुवातीला आणि सप्टेंबरमध्ये देशातून माघार घेत असताना संपूर्ण देशात चांगला पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

…तर राज्यात मान्सूनचे आगमन लांबणीवर
पाऊस आणि वार्‍यांची दिशा योग्य न राहिल्यास राज्यातील मान्सूनचे आगमन लांबण्याची शक्यता आहे. मान्सून २ ते ३ दिवस उशिराने दाखल होऊ शकतो, असे गोवा हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. तसेच राज्यातील काही भागात दि. ४ व दि. ५ जूनला पावसाच्या जोरदार सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून, मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, अशी सूचना करण्यात आली आहे.

जूनच्या मध्यापर्यंत निम्मा देश व्यापेल
जूनच्या मध्यापर्यंत मान्सूनच्या प्रगतीमुळे संपूर्ण महाराष्ट्र, दक्षिण गुजरात, मध्य आणि दक्षिण मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड आणि दक्षिण ओडिशाचा काही भाग व्यापला जाईल. इतकेच नाहीतर पश्चिम बंगालमध्येही मान्सूनचा पाऊस पडेल. जुलैच्या मध्यापर्यंत मान्सून संपूर्ण देशात हजेरी लावेल.