राज्यात ५४५ पाणथळ विभाग : काब्राल

0
161

राज्याच्या पाणथळ विभाग मंडळाने राज्यभरात केलेल्या पाहणीत गोव्यात ५४५ पाणथळ विभाग असल्याचे आढळून आले आहेत. त्यापैकी तीन विभाग यापूर्वीच पाणथळ विभाग जाहीर करण्यात आले असल्याची माहिती काल पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी पर्वरी येथे मंत्रालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. शेल्डे येथील तलाव, केपे येथील नंदा तळे व रेवोडा येथील ताशी तलाव पाणथळ विभाग जाहीर करण्यात आले असल्याचे काब्राल यांनी सांगितले.

राज्यभरात एकूण ५४५ पाणथळ विभाग असल्याचे पाणथळ विभाग मंडळाला दिसून आलेले असून आणखी अभ्यासानंतर ही संख्या वाढण्याची शक्यताही काब्राल यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.
पाणथळ विभाग मंडळाची नुकतीच बैठक झाल्याचे सांगून पुढील बैठकीपर्यंत राज्याच्या सर्व पाणथळ विभागांची यादी तयार करण्यात येणार असल्याचे काब्राल यांनी यावेळी स्पष्ट केले. सालदोडा, आंबावली, खोर्ली, पाडी येथील तलावांसह कित्येक तलावांचा पाणथळ विभागांच्या यादीत समावेश असल्याचे सांगून त्यात आणखीही काही विभागांची भर पडू शकते, असे काब्राल यांनी स्पष्ट केले.