राज्यात सरकारी पातळीवरील शिमगोत्सव तीन ठिकाणी

0
203

>> पणजी, फोंडा व म्हापशात आयोजन

राज्यात कोविड महामारीच्या पार्श्‍वभूमीवर पणजी, फोंडा आणि म्हापसा या तीन ठिकाणी सरकारी पातळीवरील शिमगोत्सव साजरा करण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे.
पाटो पणजी येथील पर्यटन भवनात उपमुख्यमंत्री मनोहर आजगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या एका बैठकीत सरकारी पातळीवरील शिमगोत्सव आयोजनावर विचारविनिमय करण्यात आला. त्यानुसार पणजी येेथे ३ एप्रिल २०२१, म्हापसा येथे ४ एप्रिल २०२१ रोजी सरकारी पातळीवरील शिमगोत्सव घेण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे. तर, फोंडा येथील शिमगोत्सवाची तारीख दोन दिवसात निश्‍चित केली जाणार आहे.
सरकारी पातळीवरील शिमगोत्सवानिमित्त चित्ररथ, रोमटामेळ, लोकनृत्य स्पर्धा घेण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ आणि कनिष्ठ अशा दोन गटातून वेशभूषा स्पर्धा घेतली जाणार आहे.

राज्यात कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सरकारी पातळीवरील कार्निव्हल पणजी आणि मडगाव या दोन ठिकाणी आयोजित करण्यात आला. त्याच धर्तीवर सरकारी पातळीवर फोंडा आणि म्हापसा येथे शिमगोत्सव साजरा करण्याचा प्रथम निर्णय घेण्यात आला होता.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी पणजी शहरात सरकारी पातळीवरील शिमगोत्सव आयोजित करण्याची विनंती केली. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी पणजी शहरात शिमगोत्सव आयोजित करण्याची सूचना केली, अशी माहिती पणजीचे महापौर उदय मडकईकर यांनी दिली.