>> प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी जलमार्ग प्राधिकरणाकडून कंपनीची नियुक्ती
राज्यात वॉटर मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव असून, या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्यासाठी केंद्रीय पातळीवर भारतीय जलमार्ग प्राधिकरणाने एका कंपनीची नियुक्ती केली असून, या कंपनीचे अधिकारी राज्याला भेट देणार जल मेट्रो प्रकल्पाची व्यवहार्यता तपासणार आहेत, अशी माहिती बंदर कप्तान खात्याच्या (सीओपी) संचालक ऑक्टाव्हिया रॉड्रिग्स यांनी माहिती दिली.
16 वित्त आयोगासमोर ह्या शहरी जलवाहतूक प्रणालीचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्ताव भारतीय जलमार्ग प्राधिकरणाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत मांडून त्यावर विचारविनिमय करण्यात आला आहे. या बैठकीत देशातील विविध शहरांमध्ये शहरी जलवाहतूक प्रणाली विकासित करण्यातील व्यवहार्यतेबाबत अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात देशातील विविध शहरांबरोबर गोव्याचा सुध्दा समावेश आहे. या जलवाहतुकीचा अभ्यास करण्यासाठी कोची मेट्रो रेल्वे या कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती रॉड्रिग्स यांनी दिली.
गोव्यात विविध जलमार्गांवर फेरीबोट सेवा कार्यरत आहे. त्यामुळे वॉटर मेट्रोसाठी जलमार्गाची पाहणी यशस्वी होऊ शकते. पणजी ते जुने गोवे, हळदोणा, पणजी ते मुरगाव अशा जलमार्गावर पूर्वी जलवाहतूक केली जात होती. गोव्यातील अशा मोठ्या जलमार्गावर वॉटर मेट्रो सुरू करण्याबाबत अभ्यास केला जाणार आहे. वॉटर मेट्रो जहाजाची क्षमता 50 ते 100 प्रवासी असू शकते, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात नदी परिवहन खात्याकडून विविध जलमार्गांवर फेरीबोट सेवा उपलब्ध केली जात आहे. आता, रो-रो सेवा लवकरच उपलब्ध केली जाणार आहे. केंद्रीय पातळीवरून वॉटर मेट्रोची सुविधा उपलब्ध झाल्यास राज्यातील जलवाहतुकीत सुधारणा होण्यास मदत होऊ शकते, अशी प्रतिक्रिया नदी परिवहनमंत्री सुभाष फळदेसाई यांनी व्यक्त केली.