राज्यात चोवीस तासांत ३ मृत्यू

0
169

>> एकूण बळी ४३
>> नवीन २१५ पॉझिटिव्ह
>> सध्याची रुग्णसंख्या १६५७

राज्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे निधन होण्याचे प्रकार सुरू असून बुधवारी चार जणांच्या मृत्यूनंतर गुरूवारी आणखी ३ जणांचे मडगाव येथील कोविड इस्पितळात निधन झाले असून कोविड मृतांची संख्या ४३ झाली आहे. तसेच, नवीन २१५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. सध्याच्या रुग्णांची संख्या १६५७ झाली असून राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ५७०४ एवढी झाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह २२१ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्यांची संख्या ४००५ एवढी झाली आहे.

मडगाव येथील ७१ वर्षीय रुग्णाचे आणि म्हापसा येथील ६२ वर्षीय रुग्णाचे आणि वास्को येथील एका ५० वर्षीय रुग्णाचे मडगाव येथील कोविड इस्पितळात काल निधन झाले. दोघांनाही कोरोनाबरोबरच इतर आजार होते, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

४८३२ नमुने तपासणीच्या प्रतिक्षेत
राज्यात सुमारे ४८३२ स्वॅबचे नमुने तपासणीच्या प्रतिक्षेत आहेत. गुरूवारी प्रयोगशाळेत १७७९ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. आरोग्य खात्याने नवीन १४३० नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. राज्यात स्वॅब नमुन्यांच्या तपासणीचे प्रमाण कमी असल्याने तपासणीच्या प्रलंबित राहणार्‍या स्वॅबच्या नमुन्यांची संख्या वाढत असल्याने प्रयोगशाळेत स्वॅबचे नमुने कमी प्रमाणात पाठविण्यात येत आहेत.

पणजीत नवे १५ रुग्ण
पणजी महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्ण वाढत आहेत. काल नवीन १५ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या ७६ झाली आहे. मळा येथील एका कुटुंबातील सात व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. या कुटुंबातील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली होती. या व्यक्तीच्या कुटुंबातील इतर व्यक्तींच्या स्वॅबच्या तपासणीचे अहवाल सात दिवसांनंतर जाहीर करण्यात आले. रायबंदर, मासळी मार्केट बिल्डिंग, सांतइनेज बांध, चिंचोळे येथे प्रत्येकी नवीन १ रुग्ण आढळून आला.

म्हापसा, वाळपईत नवीन रुग्ण
म्हापसा येथे नवीन ३ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ४३ झाली आहे. वाळपई येथे नवीन ३ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ९ झाली आहे. पेडणे येथे नवीन १ रुग्ण आढळला आहे.

कोलवाळ, पर्वरीत नवीन रुग्ण
कोलवाळ येथे नवीन ७ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ५४ झाली आहे. पर्वरी येथे नवीन १ रुग्ण आढळून आला आहे. पर्वरी येथील एका ८० वर्षाच्या रुग्णाचे बुधवारी निधन झाले होते.

चिंबल, खोर्लीत नवे रुग्ण
चिंबल येथे नवे २ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ६६ झाली आहे. खोर्ली ओल्ड गोवा येथे नवीन ३ रुग्ण आढळून आल्याने रुग्णसंख्या १५ झाली आहे.

फोंड्यात नवे २२ रुग्ण
फोंड्यात नवीन २२ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ९४ झाली आहे. मडकई येथे नवीन ९ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या १८ झाली आहे.

बाळ्ळी, कासावलीत नवे रुग्ण
बाळ्ळी येथे नवीन ३ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या ३८ झाली आहे. कासावली येथे नवीन ४ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या१८ झाली आहे.

कुठ्ठाळी, लोटलीत नवीन रुग्ण
कुठ्ठाळी येथे नवीन २ रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या ३४३ झाली आहे. लोटलीमध्ये नवीन १ रुग्ण आढळून आला असून रुग्णसंख्या ४० झाली आहे.

नावेली, कुडचडेत नवे रुग्ण
नावेली येथे नवे २ रुग्ण आढळून आले असून रुग्णसंख्या २७ झाली आहे. कुडचडे येेथे नवीन १ रुग्ण आढळून आला आहे.

माहिती खात्यातील
अधिकारी पॉझिटिव्ह
येथील आझाद मैदानाजवळील माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. एसओपीनुसार या खात्याचे कार्यालय ४८ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, असे कळविण्यात आले आहे.