राज्यात चोवीस तासांत कोरोनाने तिघांचा मृत्यू

0
30

गेले दोन दिवस कोरोनाने एकही मृत्यू झाला नव्हता मात्र काल राज्यात कोविडमुळे तिघांचा मृत्यू झाला. तसेच गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेले नवे ४३ रुग्ण सापडले आहेत. तसेच गेल्या चोवीस तासांत ८४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ३३२० आहे. राज्यातील सध्या सक्रीय कोविड रुग्णांची संख्या ७२९ झाली आहे. काल राज्यात गेल्या चोवीस तासांत ३६४९ स्वॅब चाचण्या करण्यात आल्या. राज्यात कोविड पॉझिटिव्हिटी दर हा १.१७ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.७१ टक्के झाले आहे. गेल्या २४ तासांत इस्पितळांतून डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या १० एवढी आहे. तर गेल्या २४ तासांत इस्पितळांत भरती करण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १५ एवढी आहे.

मडगावातील रुग्णसंख्येत घट
या घडीला राज्यात सर्वात जास्त रुग्ण मडगाव येथे असले तरी ती संख्या १०० पेक्षा खाली आहे. सध्या मडगावात कोरोनाची रुग्णसंख्या ८६ एवढी आहे. त्या खालोखाल फोंडा ५२, कांदोळी ४४, पणजी ४३, पर्वरी ३२, कुडतरी ३०, कुठ्ठाळी, काणकोण व शिवोलीत प्रत्येकी २८, वास्को २७, चिबल २५, डिचोली २४, म्हापसा २३ अशी रुग्णसंख्या आहे.

राज्यात सध्या कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या १,७२,६३२ एवढी झाली आहे. तर एकूण कोरोना रुग्णसंख्या १,७६,६८१ एवढी झाली आहे. राज्यात आतापर्यंत १३,६९,३७१ एवढ्या स्वॅब चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत घरी विलगीकरणात राहिलेल्यांची संख्या १,२३,५८१ एवढी असून इस्पितळात आतापर्यंत भरती झालेल्यांची संख्या २९,५८१ एवढी आहे, अशी माहिती आरोग्य खात्याने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिली आहे.