राज्यात उद्यापासून तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता

0
37

नागरिकांना सतर्कतेचा हवामान खात्याचा इशारा

येथील हवामान विभागाने 20 ते 22 मेपर्यंत राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून या तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, इतर दिवसांसाठी एलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान विभागाने 19 ते 24 मे दरम्यान उत्तर आणि दक्षिण गोव्यात वादळी वारे (30-60 किमी प्रतितास) आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

येत्या 21 मे च्या सुमारास कर्नाटक किनाऱ्याजवळील पूर्वमध्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याच्या प्रभावाखाली, 22 मेच्या सुमारास त्याच प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे आणि आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.

नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल झाली आहे. पुढील 2-3 दिवसांत दक्षिण अरबी समुद्राच्या काही भागात, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्रात; दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागात; मध्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात नैऋत्य मान्सूनच्या प्रगतीसाठी परिस्थिती अनुकूल आहे, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
दरम्यान, राज्यात चोवीस तासांत साखळी, मुरगाव, पणजी, सांगे, दाबोळी, धारबांदोडा, जुने गोवा, म्हापसा येथे पावसाची नोंद झाली आहे.