राज्यात आतापर्यंत ६४ इंच पाऊस

0
108

राज्यात मागील आठ – दहा दिवसांत पडलेल्या जोरदार पावसामुळे मोसमी पावसाची तूट भरून निघाली असून आत्तापर्यंत ६३.९४ इंच पावसाची नोंद झाली आहे. सांगे तालुक्यात सर्वाधिक ७१.८३ इंच पावसाची नोंद झाली आहे. वाळपई येथे जोरदार पावसाची नोंद झाली आहे. परंतु, तेथील पावसाची माहिती गेल्या कित्येक दिवसांपासून उपलब्ध होत नाही.

राज्यात यावर्षी मोसमी पावसाचे पंधरा दिवस उशिराने आगमन झाले होते. यंदा सुरूवातीला मोसमी पाऊस समाधानकारक न झाल्याने पावसाची तूट ५० टक्क्यांवर पोहोचली होती. तथापि, मागील आठ ते दहा दिवसांत पडलेल्या जोरदार पावसामुळे तूट भरून निघाली आहे. जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पडझड होऊन कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे.

सांगे पाठोपाठ केपे येथे ६८.५९ इंच पावसाची नोंद झाली आहे. ओल्ड गोवा येथे ६७,१७ इंच, पणजी ६५.४० इंच, दाबोली ६४.८९ इंच, साखळी ६३.६६ इंच, मडगाव ६१.३१ इंच, पेडणे ५८.३० इंच, मुरगाव ५७.१९ इंच, काणकोण ५५.८९ इंच पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान, येत्या २५ जुलैपर्यंत राज्यातील काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता पणजी वेधशाळेने वर्तविली आहे.