राज्यात आठवडाभर मध्यम ते मुसळधार पाऊस

0
16

>> हवामान खात्याने व्यक्त केला अंदाज

राज्यभरात आज सोमवारपासून आठवडाभर म्हणजेच येत्या 3 ऑगस्टपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. 3 ऑगस्टपर्यंत राज्याला निळ्या रंगाचा इशारा दिला आहे. वरील काळात राज्यातील बहुतेक भागात मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. परवा शनिवारी पावसाने उसंत घेतली होती. बऱ्याच काळानंतर गोमंतकीयांना सूर्यदर्शनही झाले होते. मात्र, काल रविवारी पुन्हा एकदा पावसाने हजरे लावली. तसेच पुढील आठवडाभर राज्यात पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे.

वरील काळात राज्यात ताशी 35 ते 45 कि.मी. एवढ्या वेगाने वारे वाहणार असून मच्छिमारांनी परवा 31 जुलैपर्यंत समुद्रात जाऊ नये असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.

दरम्यान, गेल्या 24 तासांत वाळपई येथे सर्वाधिक म्हणजेच 3493 मी.मी. एवढा पाऊस झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्या पाठोपाठ सर्वाधिक पाऊस सांगे येथे 3271.4 मी.मी. एवढा तर साखळी येथे 3162.5 मी.मी., फोंडा येथे 2931.6 मी.मी., केपे येथे 2913.6 मी.मी., पेडणे येथे 2863.3 मी.मी., म्हापसा येथे 2702.8, पणजी 2759.4, दाबोळी 2220.6, मडगाव 2663.5, मुरगाव 2516.8, केपे 2913.6 असा पाऊस कोसळला.

उत्तर प्रदेशातील 350 गावे पाण्याखाली

दिल्लीत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. लखीमपूर खेरीला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील 5 तालुक्यांतील 350 गावे पाण्याखाली गेली आहेत. येथील ललितपूरमध्ये पावसामुळे गोविंदसागर धरणाचे आणखी 4 दरवाजे उघडावे लागले असून आधीच 16 दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे आजूबाजूचा परिसर जलमय झाला आहे. उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे चार जणांचा मृत्यू झाला. उत्तराखंडच्या नई तेहरीमध्ये भूस्खलनात आई आणि मुलीचा मृत्यू झाला, तर उत्तर प्रदेशातील जालौन जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला.
मुंबई, पुण्यातही मुसळधार पाऊस पडत आहे. बुधवारपासून पुण्यात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. नवी मुंबईत शनिवारी इमारत कोसळून तीन जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.

मुसळधार पावसाचा इशारा
हवामान खात्याने आज 22 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यात महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, या राज्यांचा समावेश असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.

हिमाचलप्रदेशमध्ये आजपर्यंत 56 मृत्यू

हिमाचलमध्ये मान्सूनच्या सुरुवातीपासून 56 जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये 56 जणांचा मृत्यू झाला असून राज्याचे आतापर्यंत 410 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. उंचीवरून पडल्यामुळे 21, बुडून 18, साप चावल्यामुळे 8, विजेचा धक्का लागून 8 आणि पुरात वाहून गेल्याने एक जण मरण पावला.

दिल्लीत तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू

दिल्लीतील मुसळधार पावसामुळे जुने राजेंद्रनगर येथील राऊस आयएएस स्टडी सर्कलच्या तळघरात पाणी साचले. यामध्ये तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सायंकाळी पाणी साचल्यानंतर तळघरात बांधलेल्या ग्रंथालयात अनेक विद्यार्थी अडकल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि एनडीआरएफला पाचारण करण्यात आले. रात्री उशिरा ते सकाळ दरम्यान दोन विद्यार्थिनी आणि एका मुलाचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. यावेळी 14 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. अंतिम फेरीचा शोध सुरू आहे.
अपघातानंतर विद्यार्थ्यांनी रात्री उशिरापासून एमसीडीविरोधात निदर्शने केली. सकाळी एका आंदोलक विद्यार्थ्याने 8-10 जणांना जीव गमवावा लागल्याचा दावा केला.