राज्यात आज आणि उद्या मुसळधार

0
102

>> हवामान खात्याचा अंदाज, ऑरेंज अलर्ट जारी

>> ७९.४८ पावसाची नोंद

राज्याला जोरदार पावसाने पुन्हा एकदा काल झोडपून काढल्याने जनजीवनावर विपरित परिणाम झाला. राज्यात आज शुक्रवार दि. २३ व उद्या शनिवार दि. २४ जुलै रोजी जोरदार पावसाची शक्यता वर्तविली असून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यात गेल्या कित्येक दिवसापासून जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाचे प्रमाण कधी कमी होईल याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. राज्यात आत्तापर्यत ७९.४८ इंच पावसाची नोंद झाली आहे. पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा २२ टक्के जास्त आहे.

डिचोली तालुक्यात मुसळधार
डिचोली तालुक्याला काल मुसळधार पावसाने झोडपले. डिचोलीतील नद्यांच्या पातळीत वाढ झाली असून साळ गावाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यात अनेक गावांत पडझड झाली असून शेती पाण्याखाली गेली आहे. अंजुणे धरणाची पाण्याची पातळी ८८.४६ मीटरच्या वर गेल्याने आता अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे. साळ गावात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तिलारी नदीच्या पाण्यामुळे गावाला पुराचा धोका आहे.

शापोरा, तेरेखोल नद्यांना पूर
मागच्या सलग १४ दिवसांपासून पेडणे तालुक्याला वादळी वारा व पाऊस झोडपून काढत आहे. त्यामुळे अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे. तालुक्यातील तेरेखोल आणि शापोरा नदीला पूर आला असून भात शेती पाण्याखाली गेली आहे. बागायतींचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.

तिळारी नदीने ओलांडली
धोक्याची पातळी

दोडामार्ग तालुक्यात गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने तालुक्यात हाहाकार माजला. अनेक गावांत जनजीवन विस्कळीत झाले. तिलारी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकिनारी भागातील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. तालुक्यातील जवळपास पंधरापेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे.

चिपळूणला महापुराचा वेढा
कोकणातील चिपळूण, खेड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. रात्रभर कोसळलेल्या पावसामुळे चिपळूणमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. विशिष्ठी आणि शिव नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे चिपळूणला महापुराचा वेढा पडला आहे. हजारो नागरिक पाण्यात अडकले आहेत. या नागरिकांना बचावासाठी एनडीआरएफचे पथक चिपळूणमध्ये पोहोचले असून रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. त्यामध्ये ४५ जवान असून पाच बोटी आहेत.