राज्यात आजपासून सोमवारपर्यंत लॉकडाऊन

0
146

>> राज्याच्या सीमा बंद करणार नाही ः मुख्यमंत्री

राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची साखळी मोडून काढण्यासाठी चालू आठवड्याच्या अखेरीस आज गुरुवार दि. २९ एप्रिल रोजी रात्री ९ ते सोमवार ३ मे २०२१ सकाळी ६ वाजेपर्यंत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, औद्योगिक आस्थापने सुरूच राहणार आहेत. सार्वजनिक प्रवासी वाहतूक, कॅसिनो, पर्यटन बंद ठेवण्यात येणार आहेत. हॉटेल, रेस्टॉरंटमधून केवळ पार्सल सेवा सुरू राहणार आहे. राज्याच्या सीमा बंद करण्यात येणार नाहीत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत काल दिली.

कोरोनाबाधित रुग्णांची जास्त संख्या असलेले भाग कंटेनमेंट विभाग म्हणून जाहीर केले जाणार असून या विभागात निर्बंधांची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. राज्यातील इस्पितळांत प्राणवायू, औषधांची टंचाई नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.

कोविड उपचार दीनदयाळ योजनेखाली
राज्यातील खासगी इस्पितळात उपचार घेणार्‍या कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी कोविड उपचार आरोग्य खात्याच्या दीनदयाळ आरोग्य सुरक्षा योजनेखाली (डीडीएसएसवाय) आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दीनदयाळ आरोग्य सेवा योजनेचे ओळखपत्र असलेल्या नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे. खासगी इस्पितळातील ७० ते ८० टक्के खर्च डीडीएसएसवाय कार्डाच्या माध्यमातून केला जाऊ शकतो, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

लसीकरण केंद्रे सरकारी इमारतीत
राज्यातील आरोग्य खात्याच्या इमारतीमध्ये कार्यरत असलेली कोरोना लसीकरण केंद्रे जवळच्या सरकारी विद्यालये किंवा अन्य सरकारी इमारतींमध्ये हलविण्यात येणार आहेत. लसीकरणासाठी पूर्वनोंदणी आवश्यक आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

चोवीस तासांत चाचणीचा निकाल
स्वॅबच्या चाचण्यांमध्ये वाढ करून प्रलंबित असलेल्या स्वॅबच्या चाचण्या पूर्ण केल्या जात आहेत. गुरुवारपासून चोवीस तासांत स्वॅब चाचणीचा निकाल देण्यास सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

राज्यातील औद्योगिक वसाहतीतील कंपन्या, आस्थापने सुरू राहतील. औद्योगिक वसाहतीतील कामगारांच्या वाहतुकीची व्यवस्था संबंधित व्यवस्थापनाने करावी असे मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यात लग्न समारंभांना ५० नागरिकांच्या उपस्थितीस मान्यता असून मंदिर व इतर धार्मिक स्थळांतील कार्यक्रम एसओपीचे पालन करून केले जाऊ शकतात, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

कोरोना उपचार मार्गदर्शिका
आरोग्य खात्याने नवी कोरोना उपचार मार्गदर्शिका जाहीर केली आहे. नागरिकांनी कोविड स्वॅबच्या चाचणीचा अहवाल मिळण्यापूर्वीच नवीन एसओपीनुसार उपचार सुरू करावेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधे मोफत उपलब्ध केली जाणार आहेत. यामुळे इस्पितळात दाखल होणार्‍या रुग्णांच्या संख्येत घट होऊ शकते, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले.

सरपंच, पंचसदस्यांशी संवाद
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यावर कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन करण्यासाठी दबाव वाढल्याने अखेर तीन दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घ्यावा लागला. आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दोन दिवसापूर्वी कोरोना नियंत्रणासाठी लॉकडाऊन आवश्यक असल्याचे विधान केले होते. त्यानंतर, बंदर कप्तानमंत्री मायकल लोबो व कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लॉकडाऊनची मागणी केली होती. तर लॉकडाऊनचा निर्णय घेतला जात नसल्याने मुख्यमंत्र्यांवर टीका केली जात होती. दरम्यान, सावंत यांनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर करण्यापूर्वी राज्यातील पंचायतीचे सरपंच, पंचसदस्य यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधला.

बाजारपेठेत नागरिकांची झुंबड
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केल्यानंतर राज्यभरातील बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाली. पणजीत सहकार भांडार, पणजी मार्केटमध्ये लोकांची गर्दी होती.

कदंब बससेवा सुरू
लॉकडाऊनमध्ये ५० टक्के क्षमतेसह कदंब बससेवा सुरू ठेवली जाणार आहे. तर, आंतरराज्य प्रवासी बससेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी काल सांगितले.

जिल्हाधिकार्‍यांकडून लॉकडाऊनचा आदेश जारी

हे असेल बंद….
कॅसिनो, मद्यालये, क्रीडा संकुले, सभागृहे, मनोरंजन पार्क, रिव्हरक्रुझ, वॉटर पार्क, स्पा, मसाज पार्लर, सलून, सिनेमागृहे, थिएटर, शॉपिंग मॉलमधील मनोरंजन विभाग, जलतरण तलाव, विद्यालये, महाविद्यालये, शैक्षणिक आणि प्रशिक्षण संस्था, (महाविद्यालय परीक्षा वगळून), धार्मिक स्थळे दैनंदिन धार्मिक विधींसाठी सुरू मात्र नागरिकांसाठी बंद, साप्ताहिक बाजार.

हे राहील सुरू…
दुकाने आणि आस्थापने सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत. औद्योगिक आस्थापने, सरकारी कार्यालये, पेट्रोल पंप, एलपीजी गॅस सिलिंडर सेवा, बँक, एटीएम, विमा, वैद्यकीय, शेतीशी संबंधी कामकाज. रेस्टॉरंट सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेसह.. रेस्टॉरंटमधील पार्सल सेवेला वेळेचे बंधन नाही. मासळी मार्केट, नगरपालिका, पंचायत क्षेत्रातील मार्केट एसओपीचे पालन करून सुरू.

कळंगुट, कांदोळी येथे
१० दिवस कडक निर्बंध

कळंगुट, कांदोळी, हडफडे-नागवा पंचायत क्षेत्रात आजपासून १० दिवस निर्बंधाची कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारी अधिकारी आणि पंचायत मंडळाच्या बैठकीत काल घेण्यात आला आहे. या परिसरातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन १० दिवस कंटेनमेंट झोन जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या भागात कामावर जाणारे कर्मचारी आणि हॉटेलमध्ये असलेल्या पर्यटकांना सूट दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवा सकाळी ६ ते दुपारी १ वाजेपर्यंत सुरू ठेवली जाणार आहे.

नवी एसओपी
खासगी आस्थापनांनी कामगारांना घरातून काम करण्याची सूचना करावी. दुकाने, आस्थापने, कंपनीमध्ये गरज असलेल्या कामगारांना बोलवावे. थंडी, खोकला, ताप, श्वास घेण्यास त्रास होणार्‍या कामगारांनी घरी राहावे, वैद्यकीय सल्ला घ्यावा. लिफ्ट, स्टेअरकेस, कॉरिडोअर, पार्किंग जागा याठिकाणी गर्दी करू नये. दिव्यांग आणि मुलांची खास काळजी घ्यावी लागणार्‍या पालकांनी घरातून कामकाज करावे.