राज्यातील ५० टक्के पात्र नागरिकांनी घेतले दोन्ही डोस

0
32

>> मुख्यमंत्री कार्यालयाची माहिती; लसीकरणाला वेग

राज्यात सध्या लसीकरण मोहिमेला वेग आला असून, कोविड प्रतिबंधक लसीचे डोस घेण्यासाठी पात्र असलेल्या राज्यातील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती काल मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली. राज्यातील ५० टक्के नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असून, १०० टक्के लसीकरणाच्या दिशेने राज्याची वाटचाल सुरू आहे.

राज्यातील सर्व पात्र नागरिकांचे लसीकरण ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करण्याचे ध्येय राज्य सरकारने ठेवले आहे. लसीकरणासाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांनी यापूर्वीच लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यानंतर आता राज्यातील ५० टक्के नागरिकांनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे, असे मुख्यमंत्री कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले आहे. राज्यातील कोविड प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या ५.६५ लाख एवढी आहे, तर दोन्ही डोस घेऊन लसीकरण पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या ६.२५ लाख एवढी आहे.

मुख्यमंत्र्यांकडून जनतेचे आभार
राज्यातील ५० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्याबद्दल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आनंद व्यक्त केला असून, लसीकरणासाठी सहकार्य करणार्‍या गोमंतकीयांचे त्यांनी आभार मानले आहेत. तसेच राज्य लवकरच १०० टक्के लसीकरणाचे ध्येय साध्य करेल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.