राज्यातील संचारबंदीत १९ जुलैपर्यंत वाढ

0
96

>> जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश जारी

>> धार्मिक स्थळे १५ जणांच्या क्षमतेने खुली करण्यास मान्यता

राज्यातील संचारबंदीत येत्या १९ जुलै २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ करणारा आदेश जिल्हाधिकार्‍यांनी काल जारी केला. राज्यातील संचारबंदी १२ जुलै २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कायम होती. तीत आणखी आठ दिवसांची वाढ करण्यात आली आहे.

वाढवलेल्या संचारबंदीत आणखी शिथिलता देण्यात आली आहे. व्यायामशाळा ५० टक्के क्षमतेने, क्रीडा संकुले प्रेक्षकांविना, धार्मिक स्थळे १५ लोकांच्या क्षमतेने खुली करण्यास मुभा, कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने किंवा १०० लोकांच्या उपस्थितीसाठी जिल्हाधिकार्‍यांची मान्यता आवश्यक करण्यात आली आहे. राज्यातील संचारबंदी १२ जुलै २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत कायम होती. दर आठ दिवसांनी राज्यातील संचारबंदीमध्ये वाढ केली जात आहे. कोरोना नियंत्रणासाठी संचारबंदीमध्ये सातत्याने वाढ केली जात आहे. राज्यात मे महिन्यापासून संचारबंदी सुरू आहे.

राज्यातील संचारबंदीत वाढ केली जात असली तरी काही ठिकाणी शिथिलता दिली जात आहे. कित्येक महिन्यांनंतर धार्मिक स्थळे खुली करण्यास मान्यता देण्यात आली आहे. धार्मिक स्थळांमध्ये १५ लोकांना उपस्थित राहण्यास मान्यता दिली आहे. व्यावसायिक आस्थापने सुरू करण्यास मान्यता दिली जात आहे. व्यायामशाळा सुरू करण्यास मान्यता देण्याची मागणी केली जात होती. ५० टक्के क्षमतेने व्यायामशाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. क्रीडा संकुले सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. तथापि, क्रीडा संकुलात प्रेक्षकांच्या उपस्थितीला मर्यादा घालण्यात आली आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात संचारबंदी वाढवण्यात आली तरी गेल्या काही महिन्यांपासून बंद असलेली राज्यातील मद्यालये व रेस्टॉरंट्‌स ५० टक्के क्षमतेसह सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली होती. तसेच पालिका, पंचायत क्षेत्रातील बाजार, शॉपिंग मॉल्स, घरी घेऊन जाण्यासाठी खाद्यपदार्थांची पार्सल सेवा देणारी दुकाने यांना सरकारने आता सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मान्यता दिली आहे. राज्यातील कॅसिनो मात्र पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार आहेत. राज्यात गेल्या ९ मेपासून संचारबंदी लागू करण्यात आल्यापासून मांडवी नदीतील कॅसिनो बंद आहेत.

चोवीस तासांत २ बळींसह राज्यात १३१ कोरोनाबाधित

राज्यात चोवीस तासांत नवे १३१ रुग्ण आढळून आले असून आणखी २ कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १८४८ एवढी झाली आहे. तर, कोरोना बळींची एकूण संख्या ३०९७ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत राज्यात आणखी २ रुग्णांचा बळी गेला आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या बळींमध्ये चढउतार सुरू आहे.
राज्यात नवीन रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३.१२ टक्के टक्के एवढे आहे. इस्पितळातून १९ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६८ हजार ७१६ एवढी झाली आहे.

चोवीस तासांत ४१९७ स्वॅबच्या नमुुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातील १३१ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले.
कुठ्ठाळी येथे सर्वाधिक १२८ रुग्ण आहेत. फोेंडा येथे १०२ रुग्ण, मडगाव येथे १०७ रुग्ण आहेत. राज्यातील इतर भागांतील रुग्णसंख्या शंभरपेक्षा कमी आहे. नवीन ३२ रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

नवीन ९९ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे.
राज्यातील आणखी २४१ रुग्ण बरे झाले आहेत. राज्यातील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ लाख ६३ हजार ७७१ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०७ टक्के एवढे आहे.