राज्यातील विद्यार्थ्यांचे गणित कच्चे

0
21

>> एनएएसच्या सर्वेक्षणातून बाब समोर; मुख्यमंत्र्यांकडून चिंता व्यक्त

गोव्यातील विद्यार्थ्यांचा गणिताचा दर्जा हा राष्ट्रीय स्तरावरील विद्यार्थ्यांपेक्षा कमी असल्याचे सर्वेक्षणात आढळून आले असून, शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याविषयी चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थी गणितात कच्चे असले, तरी इंग्रजी विषयात खूपच हुशार आणि त्यांचे भाषेवर प्रभुत्व आहे, असेही सर्वेक्षणातून समोर आले आहे.

राष्ट्रीय शिक्षण मंत्रालयाने एनसीईआरटी व एससीईआरटी यांच्यातर्फे संयुक्तपणे देशातील विद्यार्थ्यांच्या मागील दोन वर्षांतील अभ्यासावर राष्ट्रीय उपलब्धी सर्वेक्षण (एनएएस) केले असता त्या सर्वेक्षणात गोव्यातील विद्यार्थी हे राष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थ्यांपेक्षा गणित या जटील समजल्या जाणार्‍या विषयात ‘ढ’ असल्याचे आढळून आले आहे.

गोमंतकीय मुलांची गणितातील कामगिरी ही राष्ट्रीय स्तरावरील सरासरीपेक्षा कमी असली तरी ती केवळ २ टक्क्यांनी कमी आहे. राष्ट्रीय सरासरी ही ३२ टक्के आहे, तर गोव्याची सरासरी ही ३० टक्के एवढी आहे. या पार्श्‍वभूमीवर शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोव्याची मुले ही गणितात मागे पडत आहेत, ही चिंता करण्यासारखी बाब असल्याचे मत व्यक्त केले.

गोव्याची मुले इंग्रजी
भाषेत खूपच हुशार

राज्यातील मुले गणित विषयात कमी पडत असली तरी त्यातल्या त्यात आनंदाची बाब म्हणजे गोव्यातील विद्यार्थी हे इंग्रजी भाषेत खूपच हुशार असल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले आहे. इंग्रजीत दहावीच्या मुलांची राष्ट्रीय सरासरी ही केवळ ४३ टक्के एवढी आहे, तर गोव्यातील दहावीच्या मुलांची इंग्रजीची सरासरी ही ६४ टक्के एवढी आहे, असेही सर्वेक्षणात आढळून आले आहे.