राज्यातील दोन्ही जागांवर कमळच फुलणार : मुख्यमंत्री

0
21

>> फोंड्यातील एनडीएच्या प्रचारसभेत विश्वास व्यक्त

जनतेची साथ मिळाली, तर दोन्ही जागांवर कमळ फुलवणे कठीण होणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हल्लीच दक्षिण गोव्यात घेतलेल्या सभेत गोव्याच्या विकासाची हमी दिली आहे. त्यामुळे जनतेनेही दोन्ही जागांवर भाजपचेच उमेदवार निवडून येतील, याची हमी दिली पाहिजे. भारतीय संविधानाचा अपमान करणाऱ्याला फोंडावासीय माफ करणार नाहीत. काँग्रेसचे गोव्यातीलच नव्हे, तर देशातील दुकानही बंद होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे राज्यातील लोकसभेच्या दोन्ही जागांवर कमळच फुलेल, असा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल फोंड्यातील एनडीएच्या प्रचारसभेत व्यक्त केला.

यावेळी दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपो, खासदार तथा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, मगोचे नेते व वीजमंत्री सुदिन ढवळीकर, कृषीमंत्री रवी नाईक, कला-संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी खासदार विनय तेंडुलकर, दीपक ढवळीकर, नगराध्यक्ष रितेश नाईक, डॉ. दया शंकर, भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वनाथ दळवी, केतन भाटीकर, जिल्हा पंचायत सदस्य गणपत नाईक, दामोदर नाईक, दीपक नाईक बोरकर व मान्यवर उपास्थित होते.
या सभेत केंद्र सरकारने राज्यात केलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. तसेच सर्वसामान्यांसाठी केंद्राने कोणत्या योजना सुरू केल्या त्याची माहिती देखील दिली. विकासाच्या जोरावर भारतीय जनता पक्ष आज जनतेकडे मत मागायला आला आहे. पल्लवी धेंपो यांना मिळणारे मत हे फक्त त्यांना नाही, तर मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सहाय्य ठरणार आहे. फोंडावासीयांचा नेहमीच भाजपला पाठिंबा मिळाला आहे आणि यापुढेही तो मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्षाने कधीच जनतेच्या सोयीसाठी योजना सुरू केल्या नाहीत; पण भाजपच्या डबल इंजिन सरकारने अनेक योजना सुरू करून शेवटच्या घटकापर्यंत त्या योजनांचा लाभ मिळवून दिला, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
काँग्रेसने जाती-धर्माच्या आधारावर देशाची विभागणी आणि राजकारण केले; मात्र मोदी सरकारने कोणताही भेदभाव न करता सर्वांसाठी योजना लागू केल्या. ज्यांना आपला पक्ष सांभाळता येत नाही, ते देश सांभाळू शकत नाही. त्यामुळे आजच्या घडीला नरेंद्र मोदींसारख्या कणखर नेतृत्वाची गरज आहे. त्यासाठी भाजपच्या दोन्ही उमेदवारांना गोमंतकीयांचा पाठिंबा मिळेल, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.

एसटींना 2027 मध्ये राजकीय आरक्षण देणारच
अनुसूचित जमातीच्या (एसटी) लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न फक्त भाजप सरकारने केला आहे. गोव्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांना येत्या 2027 पर्यंत राजकीय आरक्षण भाजप सरकार मिळवून देणार असल्याचा पुनरुच्चार देखील मुख्यमंत्र्यांनी केला.