राज्यातील टॅक्सीवाल्यांच्या प्रश्‍नांवर येत्या चतुर्थीपर्यंत तोडगा : मुख्यमंत्री

0
42

राज्यातील टॅक्सीवाल्यांच्या प्रश्‍नावर राज्य सरकार गणेश चतुर्थीपर्यंत योग्य तोडगा काढणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. त्यांच्या प्रश्‍नावर आम्ही योग्य तो तोडगा काढू व त्यांना कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागणार नाही याकडे लक्ष देऊ, असे मुख्यमंत्री सावंत यांनी काल शिवोली मतदारसंघाच्या दौर्‍याच्या वेळी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. सगळे टॅक्सीवाले हे आमचे गोमंतकीय बांधव असून त्यांच्या प्रश्‍नांची सरकारला चांगली जाणीव असल्याचे ते म्हणाले. हा कायदेशीर तंटा असून प्रकरण उच्च न्यायालयापर्यंत गेल्याच्या पार्श्‍वभूमीवर याप्रकरणी तोडगा कसा काढावा याबाबत सरकार राज्याचे ऍडव्होकेट जनरल तसेच वाहतूक खात्याचे संचालक आदींशी चर्चा करीत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सर्व टॅक्सीचालकांना विश्‍वासात घेऊन योग्य तो तोडगा काढू असे सावंत यांनी स्पष्ट केले.

राज्यातील टॅक्सीवाल्यांनी ऍपधारीत टॅक्सीसेवा सुरू करण्यास तयारी दाखवलेली आहे. मात्र, त्यांचा टॅक्सी मीटरला विरोध आहे. उच्च न्यायालयाने टॅक्सी मीटरची सक्ती केलेली असून मीटर न बसवलेल्या कित्येक टॅक्सीवाल्यांचे परवाने रद्द केलेले आहेत.