राज्यातील कोविड निर्बंधांत १० मेपर्यंत वाढ

0
122

>> मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

>> निर्बंधांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई

राज्यातील नागरिकांनी साडेतीन दिवसांच्या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद दिला. राज्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येची साखळी मोडून काढण्यासाठी कोरोना निर्बंध येत्या सोमवार १० मे २०२१ रोजी सकाळी ७ वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहेत. यापुढचे लॉकडाऊन असे संबोधिले जाणार नाही तर त्याला कोरोना निर्बंध असे संबोधले जाणार आहे. निर्बंधांची कडक कार्यवाही केली जाणार आहे. निर्बंधाचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई केली जाणार आहे, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात काल दिला. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या रोखण्यासाठी जनतेच्या सहकार्याची गरज आहे. कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये. बाजारात नाहक गर्दी करू नये. राज्यातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, नगरपालिका, पंचायत मार्केट सकाळी ७ ते संध्याकाळी ७ यावेळेत खुली राहतील, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. लग्न समारंभासाठी उपजिल्हाधिकार्‍यांकडून परवानगी बंधनकारक करण्यात आली आहे. लग्न समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत केला जाऊ शकतो. अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत केला जाऊ शकतो. त्यासाठी परवानगी घेण्याची गरज नाही. राज्यातील सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद ठेवली जाणार आहेत. धार्मिक स्थळांतील दैनंदिन विधींना बंधन नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. डॉ. सावंत यांनी सांगितले. दोन्ही जिल्हाधिकार्‍यांनी त्यासंबंधीचा आदेश जारी केला आहे.

हे राहील बंद
सार्वजनिक प्रवासी वाहतूक, कॅसिनो, मद्यालये, साप्ताहिक बाजार, क्रीडा संकुले, ऑडिटोरियम, सामुदायिक सभागृहे, रिव्हर क्रुझ, वॉटर पार्क, मनोरंजन पार्क, व्यायामशाळा, मसाज पार्लर, सलून, चित्रपटगृहे, थिएटर, मल्टीप्लेक्स, मॉल्समधील मनोरंजन झोन, स्विमिंग पूल, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, सामाजिक राजकीय, क्रीडा, मनोरंजनात्मक कार्यक्रम बंद राहतील.

हे राहील सुरू
सरकारी , खासगी अत्यावश्यक सेवा, कदंब प्रवासी वाहतूक (५० टक्के (क्षमता), जीवनावश्यक वस्तू व इतर दुकाने सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यत, औद्योगिक कंपन्या, बँक, विमान, एटीएम, पेट्रोल पंप, गॅस सिलिंडर वितरण, कृषी संबंधित आस्थापने, कोविड लसीकरण.