राजेश पाटणेकर यांनाही कोरोना

0
30

प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, पक्षाचे सचिव सतीश धोंड यांच्यापाठोपाठ काल सभापती राजेश पाटणेकर यांनाही कोरोनाचा संसर्ग झाला. गेल्या आठ दिवसांच्या काळात कोरोनाचा संसर्ग झालेले पाटणेकर हे तिसरे भाजपचे नेते ठरले आहेत.
कोविडची लक्षणे दिसू लागल्यानंतर सभापती पाटणेकर यांनी बुधवारी सकाळी गोवा वैद्यकीय इस्पितळ महाविद्यालयात जाऊन कोरोनासाठीची तपासणी करून घेतली. त्या चाचणीत त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांना उपचारासाठी गोमेकॉत दाखल कऱण्यात आले आहे. गुरूवारी सकाळी डॉक्टर शेखर साळकर यांनी गोमेकॉत जाऊन पाटणेकर यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपचे नेते लोकांच्या संपर्कात येऊ लागल्याने आता कोरोनाचा संसर्ग होऊ लागला असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.

वाढदिवसाचे निमित्त?
सभापती राजेश पाटणेकर यांच्या गेल्या गुरूवार दि. २३ रोजी डिचोलीत आयोजित करण्यात आलेल्या वाढदिवसाला प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे व सचिव सतीश धोंड हे उपस्थित राहिले होते. तानावडे, धोंड आणि आता पाटणेकर या तिन्ही नेत्यांना कोरोनाची बाधा झाली असल्यामुळे पाटणेकरांच्या वाढदिवसाला उपस्थित असलेल्या चाहत्यांत भीती निर्माण झाली असून त्यांची आता कोरोना चाचणीसाठी धावपळ सुरू आहे.