रस्त्याचे काम अडवल्याने सुकूरमध्ये तणाव

0
142

>> पर्वरी पोलीस स्थानकावर ग्रामस्थांचा हल्लाबोल

सुकूर येथे पंचायतीतर्फे करण्यात येणारे रस्ता रुंदीकरणाचे काम अडवून यंत्रसामग्रीची नासधूस करून कंत्राटदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी परिसरातील सरपंच, पंचायत सदस्य व ग्रामस्थांनी संशयिताच्या अटकेची मागणी करीत पर्वरी पोलीस स्थानकावर हल्लाबोल केल्याने गावात तणावाचे वातावरण होते. दरम्यान, सुकूर सरपंच संदीप वझरकर यांनी या प्रकरणी विल्बर टिकलो व अन्य काही जणांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१५ सालच्या एका ग्रामसभेत संशयित आरोपी विल्बर टिकलो याने रस्ता रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडला होता. त्याला शेख उस्मान यांनी सहमती दिली होती. काल सुकूर पंचायतीने सर्व सोपस्कार पूर्ण करून प्रभाग क्र. १, २ आणि १० मधील रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू केले. त्यावेळी विल्बर टिकलो अन्य काही साथीदारांसह त्या ठिकाणी आले आणि त्यांनी काम अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच सुपरवायझर जॉन आणि ड्र!यव्हर राजेश बनसोड यांना धक्काबुक्की करून वाहनावर दगडफेक करून नुकसान केले.

या प्रकारामुळे सुकूर गावातील वातावरण तंग बनले. तक्रार नोंदविण्यासाठी सरपंच संदीप वझरकर, कंत्राटदार मुस्ताक महंमद तसेच चालक राजेश पोलीस स्थानकात दाखल झाले. यावेळी पोलीस स्थानकात सुकूर, साल्वादोर दु मुंद आणि पेन्ह द फ्रान्स या तिन्ही पंचायतींचे सरपंच, पंच सदस्य आणि ग्रामस्थांनी स्थानकात येऊन संशयितांना अटक करण्याची मागणी केली. यावेळी उपअधीक्षक किरण पौडवाल, निरीक्षक परेश नाईक या प्रकाराची गंभीर दखल घेत संशयित टिकलो याला अटक करण्यासाठी त्यांच्या घरी गेले असता तेथे तो पोलिसांना सापडू शकला नाही.
पोलीस स्थानकावर सुकूरचे सरपंच संदीप वझरकर यांच्यासह उपसरपंच माया केणी, साल्वादोर दु मुंदचे सरपंच संदीप साळगावकर, पेन्ह द फ्रान्सचे सरपंच स्वप्निल चोडणकर, जि. पं. सदस्य गुपेश नाईक, पर्वरी युवा वेल्फेअर ट्रस्टचे सरचिटणीस सुरज बोरकर तसेच तिन्ही पंचायतींचे पंच सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्याबद्दल पोलिसांनी टिकलो याच्यावर गुन्हा नोंदविला आहे.