रस्ते अपघातांवर नियंत्रणासाठी उपाययोजना करणार ः श्रीपाद

0
242

राज्यातील रस्ता अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असून अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी विविध सुरक्षा उपाययोजना हाती घेण्याचे ठरविण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आयुषमंत्री तथा उत्तर गोवा रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी काल दिली.
उत्तर गोवा रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री नाईक बोलत होते. जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे. जिल्ह्याचे खासदार या समितीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यापूर्वी जिल्हाधिकारी समितीचे अध्यक्षपद भूषवीत होते. जिल्हाधिकार्‍यांची समितीच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

राज्यात गत २०१९ या वर्षात रस्ता अपघातात २९७ जणांची मृत्यू झाला आहे. या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या काळात १७८ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील रस्ता अपघातांतील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यावर भर दिला जाणार आहे. रस्त्याच्या बाजूचे बेकायदा मोठे जाहिरात फलक, मोकाट गुरे, वाहतूक व्यवस्था सुधारणे आदी विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी सर्व खात्याची मदत घेतली जाणार आहे. राज्यातील खराब झालेल्या रस्त्याच्या स्थितीवर विचारविनिमय करण्यात आला आहे. पावसाळ्यात रस्ते खराब होऊ नये म्हणून सूचना करण्यात येणार आहेत, असेही मंत्री नाईक यांनी सांगितले.

रस्त्यावरील मोकाट गुरांची समस्या सोडविण्यासाठी राज्यातील ग्रामपंचायती आणि गोशाळा यांच्यात सामंजस्य करार करण्याचे ठरविण्यात आले आहे. पंचायत, नगरपालिकांना रस्ता सुरक्षा उपाय योजना राबविण्यासाठी निधी उपलब्ध करण्यावर चर्चा करण्यात आली आहे. पणजी येथील कदंब बसस्थानकावर सुरक्षा उपाय योजना हाती घेण्यास प्राधान्य देण्यावर चर्चा करण्यात आली आहे. बस वाहतुकीत सुसूत्रता आणून बसगाड्यांची सविस्तर माहिती देण्यासाठी आवश्यक उपाययोजना हाती घेण्यावर चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती रोलंड मार्टीन यांनी दिली.