समाजसेवक श्रीधर उर्फ शिरीष पै काणे यांना शनिवारी रात्री 9.30 वा. भरवेगाने येणाऱ्या कारने धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला. शिरीष काणे हे आपल्या नावेली येथील घरातून मित्रासोबत बाहेर रस्ता पार करीत असताना त्यांना काणकोणहून मडगावच्या दिशेने निघालेल्या एर्टिगा कारची जोरदार धडक बसली. यात तो हे दुभाजकावर पडले. त्यांच्या डोक्याला मार लागून ते बेसुद्ध झाले. यावेळी उपस्थितांनी रुग्णवाहिका बोलावली. त्यांना जिल्हा इस्पितळात नेऊन त्यांच्यावर उपचार सुरू केले. पण त्यांची स्थिती अतिशय गंभीर बनल्याने त्यांना बांबोळी गोवा वैद्यकीय इस्पितळात नेण्यात आले. तेथे उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी कारचालक समीर हुबळीकर मास्तीमळ, काणकोण याला अटक केली आहे. काल रविवारी सायंकाळी 4.30 वा. मडगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
काल कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, तसेच आमदार दिगंबर कामत यांनी भेट देऊन अंत्यदर्शन घेतले. शिरीष पै काणे यांच्या निधनाने आपल्याला अत्यंत दु:ख झाल्याचे आमदार कामत यांनी सांगितले.