रवीन्द्रनाथ टागोर ः नोबेल विजेते पहिले आशियाई महाकवी

0
147
  • शंभू भाऊ बांदेकर, साळगाव

आपल्या साहित्याने, कार्याने व अजोड कर्तृत्वाने भारत देशाला यशोशिखरावर नेणार्‍या, नोबोल पुरस्कारविजेत्या गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन.

गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर हे एक वंदनीय अष्टपैलू व्यक्तिमत्त्व. एक उत्तम शिक्षक, एक उत्तम लेखक, समाजभान असलेला, सर्वसामान्य जनतेच्या दुःखांना वाणीने व लेखणीने सर्वदूर पसरविणारा उत्तम समाजसेवक म्हणून जसे त्यांचे व्यक्तित्व असामान्य होते, त्याचप्रमाणे प्रथम महात्मा गांधीजींच्या सत्य व अहिंसा मार्गाने देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत व नंतर लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्यलढ्यात योगदान देणारा अत्यंत रमणीय अशा निसर्गसान्निध्यात ‘शांतिनिकेतन’ची स्थापना करून जगाला आदर्श घालून देणारा आणि वयाच्या साठीनंतर चित्रकलेत रंगून एक उत्तम चित्रकार म्हणून आपला ठसा उमटविणारा हा महापुरुष केवळ बंगाल प्रांतालाच नव्हे, तर देशाला अन् विदेशालाही अनुकरणीय वाटला यातच या व्यक्तित्वाचे मोठेपण आहे. असे असले तरी त्यांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाला जागतिक कीर्तीचा नोबेल पुरस्कार मिळाला आणि हा आपल्या देशाचा महाकवी अगदी सातासमुद्रापार जाऊन पोचला. मुख्य म्हणजे हा पुरस्कार मिळविलेले ते केवळ फक्त भारतीय नव्हे, तर पहिले आशियाई महाकवी ठरले. गुरुदेव टागोरांचा मोठेपणा असा की त्यांचे ‘शांतिनिकेतन’ पाहण्यासाठी जसे आमच्या देशातील विविध भागांतून साहित्यिक, समाजकारणी, राजकारणी आवर्जून भेटी देत, त्याचप्रमाणे या महाकवीच्या भेटीसाठी, त्यांच्या ‘गीतांजली’सह इतर साहित्याचा अभ्यास करण्यासाठी जगाच्या अनेक भागांतून कवी, नाटककार, तत्त्वज्ञ उत्सुक बनले होते.

गुरुदेव टागोर हे आपल्या देशाचे महाकवी तर आहेतच, पण त्यांचे वाङ्‌मय फक्त काव्यापुरते मर्यादित नाही; जसे त्यांनी आपल्या कवितांनी जगाचे लक्ष वेधून घेतले, तसेच नाटक, कथा, कादंबरी आणि ललित गद्य या वाङ्‌मय प्रकारातले त्यांचे साहित्यही जगाला अचंबित करून सोडणारे होते. तसेच एक चित्रकार म्हणूनही त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा ठसा उमटविला होता. शिक्षणतज्ज्ञ, समाजसुधारक आणि देशभक्त या तीन महत्त्वाच्या आयामांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व खुलून दिसत असे.

आणखी एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करावीशी वाटते ती म्हणजे सर्व मानवांचे ‘एक गोत्र’ हे सूत्र प्रमाण मानून त्यांनी ‘आंतरभारती’ची संकल्पना मांडली आणि गुरुदेव टागोरांनी आपला प्रवास ‘विश्‍वमानव’ या तत्त्वाशी निगडित केला. संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर त्यांचे ‘हे विश्‍वची माझे घर’ या जागतिक तत्त्वाला कवटाळणारे हे सूत्र होते आणि म्हणूनच त्यांच्या अष्टावधानी जीवनकार्याचा आलेख मांडताना ते एक जीवनोत्सुक, अत्यंत सुविचारी आणि समृद्ध असे व्यक्तिमत्त्व होते असे प्रतिपादन करून जाणकारांनी रवीन्द्रनाथ टागोर हा देशकाळाच्या सीमा ओलांडणारा संकुचिततेच्या सर्व प्रकारच्या कड्या तोडून पुढे जाणारा एक ‘विश्‍वमानव’ होता, असे त्यांचे सार्थ वर्णन केलेले आहे. त्यांच्या जीवनकार्याचा अभ्यास केल्यानंतर हे किती यथार्थ वर्णन आहे, याचा आपल्याला प्रत्यय येतो. गुरुदेव टागोरांनी फार मोठे जीवनाचे सार अगदी सामान्य माणसालाही सहजतेने अवगत व्हावे, अशा भाषेत मांडले आहे. ते म्हणत, ‘दुःखातही सुखात जगता आले पाहिजे. आपण भोगत असलेल्या किंवा आपणाला सतावत असलेल्या दुःखापेक्षा आपल्या सभोवताली जास्त दुःखी असलेली कितीतरी माणसे असतात. त्यांना दिलासा देऊन आपण त्यांचे दुःख तर हलके करू शकतोच पण आपलेही दुःख हलके करण्याची किमया त्यात असते. आपण शांत चित्ताने या गोष्टींचा विचार केला तर त्याचा प्रत्यय आपणास नक्कीच येऊ शकेल. तसेच श्रमांबरोबर वाचन, मनन व चिंतन या तिन्ही गोष्टींना जीवनात वेळ दिला पाहिजे. त्यामुळे शारीरिक ताणतणाव व मानसिक ताणतणाव नक्की कमी होऊ शकतात, असे त्यांचे सांगणे असे. त्यांच्या घरातील वातावरण संस्कारशील आणि कला-साहित्याला महत्त्व देणारे होते. तसेच वातावरण इतरांकडे असावे, म्हणून ते प्रयत्नशील असत. ब्राह्मो समाजाचे संस्थापक राजा राममोहन राय यांच्या विचारांनी भारलेले त्यांचे वडील देवेन्द्रनाथ हे साध्या राहणीचे, स्वच्छ विचारांचे व विनम्र स्वभावाचे पुरस्कर्ते होते. या सार्‍यांचा परिणाम बालपणी रवीन्द्रनाथांच्या जीवनावर झाला व त्यातूनच त्यांचे मनात भरणारे, आनंद देणारे व्यक्तिमत्त्व घडत गेले.
पूर्वीच्या ‘गुरुकुल’प्रमाणे त्यांनी शांतिनिकेतन’ची रचना अमलात आणली होती. प्रचलित शिक्षणाच्या आणि शिक्षकांच्या चौकटीला मुले कशी कंटाळतात हे त्यांना अनुभवाने माहीत होते. म्हणून शांतिनिकेतनमध्ये त्यांनी बंदिस्त शाळेला पूर्ण फाटा दिला होता. निसर्गाच्या सान्निध्यात मुलांनी शिकावे, राहावे व खर्‍या जीवनाचा आनंद लुटावा हेच खरे शिक्षण असे ते मानीत व त्याचा आविष्कार त्यांनी शांतिनिकेतनच्या माध्यमातून घडविला व शिक्षणक्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष वेधून घेतले.

रवीन्द्रनाथ टागोरांच्या एकूण साहित्याबद्दल सांगायचे म्हणजे त्यांनी आपल्या जीवनकाळात एकूण १८१ ग्रंथ लिहिले. त्यांपैकी ५० ग्रंथ हे कविता आणि गीतसंग्रह या विभागात मोडतात. ४२ नाटके त्यांनी लिहिली, तर ११ कादंबर्‍या लिहिल्या. त्यांच्या नावावर एकूण ३७ लेखसंग्रह आहेत. ३ चरित्रमय व आत्मकथनपर ग्रंथ आहेत. तर उर्वरित ग्रंथ म्हणजे त्यांनी शांतिनिकेतन या त्यांनी स्थापन केलेल्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी लिहिलेली आदर्शवत अशी पाठ्यपुस्तके आहेत. याशिवाय त्यांनी शंभरपेक्षा जास्त लघुकथा व शेकडो पत्रे लिहिली.

आपल्या साहित्याने, कार्याने व अजोड कर्तृत्वाने भारत देशाला यशोशिखरावर नेणार्‍या, नोबेल पुरस्कारविजेत्या गुरुदेव रवीन्द्रनाथ टागोर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन!