रजोनिवृत्तीच्या काळात स्त्रीचे आरोग्य

0
317
  • डॉ. मनाली म. पवार
    (सांतइनेज पणजी)

आयुर्वेदात अतिचिंता हे रसक्षयाचे एक मुख्य कारण सांगितले आहे. म्हणूनच मनाची प्रसन्नतासुद्धा रसधातू संपन्न ठेवण्यासाठी, अग्नीला संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाची असते. त्यासाठी संगीत ऐकणे, योगासने करणे, अनुलोम-विलोमसारखा प्राणायाम यांचाही रोजच्या दिनक्रमात समावेश करणे उत्तम ठरते.

रजोनिवृत्ती म्हणजेच मेनोपॉज हा काही आजार नाही हे स्त्रीने व तिच्या आसपासच्या लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. स्त्री-शरीराची अटळ आणि पूर्णतः नैसर्गिक अशी अवस्था आहे. रजोनिवृत्ती म्हणजे स्त्रियांची मासिक पाळी कायमची बंद होणे. सर्वसाधारणपणे वयाच्या ४५ ते ५०व्या वर्षी स्त्रीला रजोनिवृत्ती येऊ शकते. शेवटची पाळी कधी येणार हे आधी सांगता येत नाही. एखाद्या स्त्रीला एक वर्षापर्यंत मासिक पाळी आलीच नाही, तर तिची रजोनिवृत्ती आली, असे निदान करता येते. पाळी बंद होण्याच्या आधीच काही वर्षांपासून स्त्रियांच्या शरीरात त्या दृष्टीने काही बदल घडायला सुरुवात होते. या काळाला ‘पेरिमेनोपॉजल पिरियड’ म्हणतात. हा काळ साधारणपणे तीन ते चार वर्षांचा असू शकतो. मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती हा निसर्ग-चक्राचाच एक भाग आहे. त्यामुळे जीवनाच्या या पर्वाला आत्मविश्‍वासाने आणि सकारात्मकतेने स्वीकारणे आवश्यक असते.
कोणताही बदल स्वीकारणे हे तितकेसे सोपे नसते. पण निसर्गचक्राला आपण आव्हान देऊ शकत नाही. पण या रजोनिवृत्तीच्या काळात जे शारीरिक किंवा मानसिक त्रास होतात ते नक्की कमी किंवा सुसह्य करू शकतो.

रजोनिवृत्तीच्या वेळी स्त्रीच्या शरीरामध्ये अनेक लक्षणे आढळून येतात. याच्या काही वर्षे आधीपासूनच मासिक पाळी लांबणे, लवकर येणे, नेहमीपेक्षा अगदी कमी किंवा नेहमीपेक्षा जास्त रक्तस्राव होणे.. असे प्रकार होऊ शकतात. दोन-तीन महिन्यात पाळी व्यवस्थित येऊन मध्ये दोन-तीन महिने बंद होणे आणि काही महिने पुन्हा पहिल्यासारखी नियमित होणे असेही होऊ शकते.
हॉट फ्लॅशेस- हे रजोनिवृत्तीमध्ये वारंवार दिसून येणारे लक्षण आहे. सहसा पाळीच्या एक आठवडा आधी हे लक्षण दिसून येते. एकाएकी स्त्रीला खूप गरम वाटू लागते. विशेषतः चेहरा, मान, हात एकदम लाल दिसू लागतात. हे फक्त तीन ते चार मिनिटे घडते. त्यानंतर घाम येतो. हात-पाय गार पडतात व किंचित थंडी वाजायला लागते.

  • इस्ट्रोजन या संप्रेरकाच्या कमतरतेमुळे योनीमार्ग कोरडा पडतो. त्यामुळे शरीरसंबंधाच्या वेळी वेदना होतात. तसेच मूत्रमार्ग कोरडा झाल्याने वारंवार मूत्रप्रवृत्ती होते.
  • विसराळूपणा वाढतो. स्मरणशक्ती कमी होते.
  • पचनशक्ती कमी होते. सतत पोट गच्च भरल्यासारखे वाटते.
  • पोटाचा घेर वाढतो.
  • त्वचा कोरडी होऊन त्वचेला खाज येते. त्वचेला सुरकुत्या पडतात.
  • नखं, हाडं ठिसूळ होतात.
  • झोप कमी लागते किंवा लागत नाही.
  • एका क्षणाला आनंद तर दुसर्‍या क्षणाला निराशा वाटते.

प्रत्येक स्त्रीची शारीरिक व मानसिक जडणघडण वेगवेगळी असते. त्यामुळे ही सगळी लक्षणे प्रत्येक स्त्रीमध्ये कमी-अधिक प्रमाणात जाणवतात.
आयुर्वेद शास्त्राप्रमाणे स्त्रीशरीरात रसधातूला खूप महत्त्व असते. रसधातू हा संपूर्ण शरीराचे प्रसादन करणारा असतो. सर्व शरिरावयवांना तृप्त करण्याची जबाबदारी रसधातूवर असते आणि रसधातूचा उपधातू ‘रज’. रस जितका चांगला, जितका संपन्न, तितकी मासिक पाळी व्यवस्थित व नियमित असते. मात्र, वयानुरूप शरीरात वात वाढायला लागला की त्यामुळे रसधातूची संपन्नता कमी होत जाते आणि त्यातूनच रजोनिवृत्तीची सुरुवात होते.
वयानुरूप रजोनिवृत्ती येणे स्वाभाविक असते, हे समजते. वयानुरूप रसधातूची संपन्नता कमी होणेही स्वाभाविक आहे. पण जर रसधातू प्रमाणापेक्षा कमी झाला- रसक्षय म्हणता येईल इतक्या अवस्थेपर्यंत पोचला तर रजोनिवृत्तीच्या कालात स्त्रीला अनेक प्रकारचे त्रास होऊ शकतात. म्हणून आयुर्वेदशास्त्रात रसक्षयाची जी लक्षणे सांगितली आहेत तीच रजोनिवृत्तीच्या काळात दिसतात.
रसे रौक्ष्यं श्रमः शोषो ग्लानि शब्दासहिष्णुता|

  • शरीरात कोरडेपणा वाढतो म्हणजे त्वचा, केस, डोळे, योनी वगैरे ठिकाणी कोरडेपणा जाणवू लागतो.
  • फारसे श्रम झाले नाहीत तरी खूप थकवा जाणवतो.
  • मुख, घसा, जिभेला शोष पडतो.
  • शरीराला ग्लानी येते. उत्साह वाटत नाही.
  • आवाज सहन होईनासा होतो.
  • अकारण धडधड होते.
  • मन अस्वस्थ होते, शून्यता अनुभूत होते.
    याखेरीज एकाएकी वजन वाढते किंवा कमी होते… हेही रसधातूशी संबंधित असल्याने रजोनिवृत्तीच्या दरम्यान वजन वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. तसेच पाळी अनियमित होणे, घाम फुटणे, गरम वाटणे- थंड वाटणे असे अनेक त्रास होतात.

खरेतर ही अवस्था नैसर्गिक असल्याने त्रास होतोच असे नाही. होत असलेल्या बदलांना जर शारीरिकदृष्ट्या मदत मिळू शकली आणि मानसिकरीत्या स्वीकारण्याची तयारी ठेवली तर रजोनिवृत्तीच्या त्रासापासून दूर राहता येणे शक्य आहे. त्यासाठी सुरुवातीपासूनच ‘रसधातू’ची काळजी घ्यायला हवी. रसधातूबरोबरच वाढणारा वात जमेल तेवढा संतुलित ठेवण्याचा प्रयत्न करावा. हे सर्व साध्य होण्यासाठी सहज व साधे उपाय…..

  • सुरुवातीपासूनच पाळी व्यवस्थित येण्याकडे लक्ष द्यावे.
  • आहारात रसपोषक पदार्थ उदा. दूध, साळीच्या लाह्या, खजूर, मध, फळांचे रस वगैरेंचा समावेश असावा.
  • साजूक तूप पुरेशा प्रमाणात सेवन करावे.
  • हाडे मजबूत राहण्यासाठी दूध, डिंकाचे लाडू, खारीक, बदाम, खसखस, आळिवाचे लाडू यांचे नियमित सेवन करावे.
  • नियमित अभ्यंग करावा.
  • स्त्रिविशिष्ट अवयवांची काळजी घ्यावी. त्यासाठी योनिपिचू, योनिधूप, योनिधावन करावे.
  • रसधातू, शुक्रधातू तसेच एकंदरच स्त्रीप्रजननसंस्था निरोगी व कार्यक्षम राहण्यासाठी शतावरी कल्प, धात्री रसायन, अशोकारीष्ट, लोध्रास्व, कुमारी आसव यांसारखी औषधे वैद्यांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
  • वाताचे, अग्नीचे संतुलन होण्यासाठी नियमित व्यायाम, योगासने व प्राणायाम करणे, सर्वसामान्यांना दैनंदिन आचरणासाठी व आरोग्यावर लक्ष ठेवून सूर्यनमस्कारासारख्या क्रिया कराव्यात.
  • रस, अग्नी हे शरीरातील अतिशय संवेदनशील घटक असल्याने त्यांच्यावर मानसिकतेचा मोठ्या प्रमाणावर प्रभाव असतो. दुःख झाले की भूक लागत नाही किंवा खूप मानसिक ताण आला तर चेहरा काळवंडतो, डोळ्यांखाली काळी वर्तुळं तयार होतात.
    आयुर्वेदात अतिचिंता हे रसक्षयाचे एक मुख्य कारण सांगितले आहे. म्हणूनच मनाची प्रसन्नतासुद्धा रसधातू संपन्न ठेवण्यासाठी, अग्नीला संतुलित ठेवण्यासाठी महत्त्वाची असते. त्यासाठी संगीत ऐकणे, योगासने करणे, अनुलोम-विलोमसारखा प्राणायाम यांचाही रोजच्या दिनक्रमात समावेश करणे उत्तम ठरते.
    रजोनिवृत्तीच्या काळात आवर्जून करावयाच्या गोष्टी ……
  • आहारात दूध, खारीक, साजूक तूप यांचा पुरेशा प्रमाणात समावेश
  • दुधातून रोज शतावरी कल्प घेणे
  • अंगाला अभ्यंग करणे, योनीत औषधी तेलाचा पिचू ठेवणे
  • रजोनिवृत्तीची लक्षणे दिसू लागताच तज्ज्ञ डॉक्टरांच्या साहाय्याने ३-४ उत्तरबस्ती करून घेणे.
  • सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मेनोपॉज म्हणजेच रजोनिवृत्ती हा शरीरातील स्वाभाविक बदल याचा मानसिकदृष्ट्या स्वीकार करणे.

आयुर्वेदानुसार पन्नाशीनंतर रजोनिवृत्ती येणे अपेक्षित आहे. पण सध्याच्या जीवनपद्धतीत पाळीच्या दिवसात बरेचसे नियम पाळणे शक्य होत नाही. तसेच प्रकृतीनुसार आहार-विहार होत नाही आणि म्हणून रजोनिवृत्तीचे वय बरेच अलीकडे आलेले दिसते पण फार लवकर रजोनिवृत्ती येणे स्त्रीच्या आरोग्यास, तारुण्यास, सौंदर्यास बाधक ठरू शकते. वयाच्या पस्तिशी- छत्तिशीलाच रजोनिवृत्तीची लक्षणे दिसायला लागली तर तो विकार समजायला हवा व दूर करण्यासाठी प्रयत्नही करायला हवेत. सुरुवातीपासूनच काळजी घेतली तर रजोनिवृत्तीचा काळ कधी सुरू झाला व रजोनिवृत्ती कधी आली हे कळणारही नाही. अधिकाधिक स्त्रियांनी अशा प्रकारे आहार-विहारादी उपक्रमांचा आपल्या जीवनात अवलंब करा व स्त्रीआरोग्यची पातळी उंच करा.