रक्तदाबाविषयी थोडेसे…

0
48
  • डॉ. आरती दिनकर
    होमिओपॅथी तज्ञ, समुपदेशक, पणजी

रक्ताचा पुरवठा शरीरात खेळवायचा तर एका ठरावीक वेगाने ते रक्त रक्तवाहिन्यांतून खेळणे आवश्यक असते. जास्त रक्तदाब म्हणजे हृदयाला ताण व कमी रक्तदाब म्हणजे शरीरात रक्ताचा पुरवठा कमी होणे.

एक ४७ वर्षीय गृहस्थ मोहन- त्यांना चक्कर येणं, डोकं गरगरणं, डोकं दुखणं, हृदय धडधडणं आणि अपचन या तक्रारी घेऊन आले तेव्हा त्यांचा रक्तदाब १६९/९२ मिळाला. त्यांचे वजनही वाढलेले होते. विचारपूस केली तेव्हा असे लक्षात आले की त्यांना रोज व्यायाम करणे किंवा चालणे जमत नसे. शिवाय आहारातही तेलकट-तुपकट पदार्थ खाण्यात येत असत. म्हणजे काय तर थोडक्यात रक्तदाबाला आमंत्रणच दिलं होतं. नशिबाने त्यांना डायबिडीज नव्हता.

उपाय म्हणून त्यांना रोज एक तास चालण्यास सांगितले तसेच तळलेले पदार्थ, मीठ आणि जास्त उर्जेचे पदार्थ कमी खाण्यास सांगितले. किंबहुना हे पदार्थ खाल्ले नाही तरी चालेल असे सांगितले. उदा.- बटर, चीज. शिवाय ऋतुमानानुसार हिरव्या भाज्या आणि फळे खाण्यास सांगितले. व्यायाम आग्रहाने करण्यास सुचविले आणि बरोबरीने होमिओपॅथीची योग्य औषधे दिली. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे लवकरच त्यांना गुण आला आणि त्यांचा रक्तदाब नॉर्मल आला.
बरेचदा व्यक्तीला रक्तदाब आहे हेच माहिती नसतं तर काही जणांना कमी रक्तदाब असण्याचे लक्षण असते. नॉर्मल रक्तदाब हा १२०/८० असा असतो.

आजच्या आधुनिक तांत्रिक युगात मानसिक ताणतणाव, घरातील व शारीरिक व मानसिक व्याधी वाढलेल्या आढळतात. यातूनच नवीन नवीन रोगलक्षणे जन्म घेत आहेत. आपल्या नेहमीच्या दैनंदिनीत स्वतःच्या आरोग्याकडे बघायला कुणालाच फारसा वेळ नाही.

  • रक्त जेव्हा वाहिन्यांतून वाहत असते तेव्हा त्याचा दाब रक्तवाहिन्यांच्या भिंतींवर पडत असतो. हा दाब नियंत्रित होण्यास पुढील कारणे महत्त्वाची आहेत १) हृदयाच्या ठोक्याचा जोर २) रक्तवाहिन्यांत असलेले रक्ताचे प्रमाण ३) रक्तवाहिनीचा लवचिकपणा. कोणत्याही कारणामुळे रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी झाल्यास किंवा नलिकांचा व्यास कमी झाला अथवा रक्त पुढे ढकलण्याची हृदयाची शक्ती कमी-अधिक झाली की रक्ताच्या दाबात फरक होतो. म्हणजेच रक्ताचा पुरवठा शरीरात खेळवायचा तर एका ठरावीक वेगाने ते रक्त रक्तवाहिन्यांतून खेळणे आवश्यक असते. जास्त रक्तदाब म्हणजे हृदयाला ताण व कमी रक्तदाब म्हणजे शरीरात रक्ताचा पुरवठा कमी होणे. रक्तदाबाचा चढ-उतार निरनिराळ्या रोगांमध्ये झालेला आढळून येतो. हेच रक्तदाबाचे संतुलन राखण्यासाठी होमिओपॅथीची औषधे योग्य तर्‍हेने कार्य करतात. हृदय पूर्ण आकुंचन पावते तेव्हा या रक्ताचा जो दाब रक्तवाहिन्यांवर पडतो त्यास ‘सिस्टोलिक’ रक्तदाब म्हणतात. हृदयाचे आकुंचन पूर्ण झाल्यावर हृदय पूर्वस्थितीत येण्यास प्रसरण पावते, त्यामुळे रक्तवाहिन्यांतील रक्ताचा जो दाब असतो त्याला ‘डायस्टोलीक’ रक्तदाब म्हणतात. सिस्टॉलिक- १२० तर डायस्टॉलिक- ८० असा सर्वसाधारणपणे असतो. रक्तदाब वयानुसार कमी-जास्त होऊ शकतो. होमिओपॅथीच्या तत्त्वानुसार त्या रुग्णाला कशामुळे रक्तदाब वाढला आहे अथवा कमी झाला आहे किंवा कोणते कारण रक्तदाब वाढविण्यास व कमी होण्यास कारणीभूत आहे याचे मूळ कारण शोधूनच त्यानुसार होमिओपॅथीच्या औषधाची योजना केली जाते. रक्तदाब वाढणे किंवा कमी होणे हा काही स्वतंत्र रोग नाही तर ते रोगाचे लक्षण आहे. मूत्रपिंडाच्या रोगात, मधुमेहात व हृदयविकारातही रक्तदाब वाढलेला असतो म्हणून रक्तदाब वाढलेला असल्यास वरीलपैकी रोग झाले आहेत किंवा नाहीत याबद्दल खात्री करून मगच औषधयोजना करावी लागते . रक्तदाब जास्त झाला तर डोकं गरगरणे, कानात आवाज येणे, डोके दुखणे, लवकर संतापणे, चक्कर येणे, अंतर्गत रक्तस्राव होणे, अपचन, हृदय धडधडणे, आणि शेवटी हृदयविकाराचा झटका येणे असे परिणाम दिसून येतात तर रक्तदाब कमी झाला म्हणजे थकवा येणे, टिकाऊ स्वरूपाची शक्ती नसणे, जास्त काम केले तर ते न झेपल्यामुळे थोड्या श्रमाने नाडी जलद चालणे, हवामानाचा झालेला फरक न सोसणं, सतत झोप येणे, कुठल्याही गोष्टीत उत्साह नसणे अशी लक्षणे आढळतात. रक्तदाबाचे हे दोन प्रकार अगदी भिन्न स्वरूपाचे आहेत, त्यांचे होणारे परिणामही भिन्न स्वरूपाचे आहेत. याशिवाय अनेक रोगातील रक्तदाब हे लक्षण असल्यामुळे निरनिराळ्या गुंतागुंती आढळतात. त्यामुळे रोगाचे स्वरूपही बदलते. प्रसंगी रोग वाढीस लागतो.