योगमार्ग – राजयोग

0
277

योगसाधना – २४२

स्वाध्याय – १०

डॉ. सीताकांत घाणेकर

‘‘स्वाध्याय’’ म्हणजेच ‘स्व’चा अभ्यास करता करता योगसाधकाला ज्ञान होते की ‘स्व’ म्हणजे ‘आत्मा’ आहे. परमात्म्याबरोबर तो शरीरात राहतो. शरीर हे फक्त उच्च ध्येय गाठण्यासाठी एक साधन आहे. ते शरीर व्यवस्थित चालावे म्हणून त्यात वेगवेगळी इंद्रिये व संस्था आहेत. तसेच प्रत्येक मानवाने जीवनविकासाकडे वाटचाल करावी म्हणून मन त्याच्याबरोबर आहे. पण मन माकडासारखे विचलीत होते त्यावर नियंत्रण करण्याासाठी बुद्धी आहे. हे सर्व घटक चालवण्यासाठी प्राणरूपी शक्ती आत्मा घेऊन येतो आणि त्या शक्तीचा सर्व शरीरात संचार झाला की हे सर्व घटक कार्यरत होतात.
या सर्व घटकांचे योग्य महत्त्व आहेच. पण अत्यंत महत्त्वाची आहे बुद्धी- सद्सद्विवेक बुद्धी! ती बुद्धी दैवी बनवण्यासाठी जरुरी आहे ‘स्वाध्याय’!
वेद, उपनिषद, गीता, योगशास्त्र यांचा थोडा थोडा अभ्यास केला की आत्म्याबद्दल थोडी थोडी अंधुक अशी कल्पना येते. पण आमच्यासारख्या सामान्य व्यक्तींना आत्म्याचे उच्च तत्त्वज्ञान लक्षात येत नाही. म्हणून अनेक ज्ञानी प्रेषित, सद्गुरूंकडून या ज्ञानाची प्राप्ती करायला हवी.
हल्लीच्या काळातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे – स्वामी विवेकानंद! ते अगदी साध्या, सोप्या, सरळ भाषेत आत्मा, देवत्व यांबद्दल सांगतात. एवढेच नव्हे तर त्या आंतरिक देवत्वाचे प्रकटीकरण कसे करावे याबद्दल सुंदर मार्गदर्शन करतात-
* ‘‘प्रत्येक जीव एक अव्यक्त ब्रह्म आहे.’’
बाह्य आणि आंतरिक प्रकृतीला नियंत्रित करून आपले हे अव्यक्त ब्रह्मरूप व्यक्त करणे हेच जीवनाचे परम ध्येय.
कर्म-भक्ती-मन-संयम किंवा ज्ञान यातील कुठलाही एक, एकापेक्षा जास्त किंवा सर्व उपाय करून हे ध्येय साध्य करा व मुक्त व्हा.
वास्तविक धर्म तो हाच. सिद्धांत, वाद, कर्मकांड, धर्मग्रंथ, मंदिर, आकृती या सर्व गोष्टी गौण आहेत.
– इथे चार उपाय म्हणजे चार योगमार्ग – कर्मयोग – भक्तीयोग – राजयोग – ज्ञानयोग.
स्वामीजींच्या या थोड्याशा पंक्तींवर व शब्दांवर विचार, चिंतन, सुसंवाद केला की लक्षात येते की प्रत्येक स्वाध्यायीने आपले ध्येय समजायला हवे. त्याबरोबरच भगवंताने दिलेल्या सर्व घटकांचा तसा उपयोग करायला हवा. त्यासाठीच शरिररूपी रथ आहे.
आता रथाला एकच घोडा बांधायचा की एकापेक्षा जास्त किंवा चार बांधायचे हे प्रत्येक व्यक्तीने ठरवायचे आहे. पण सामान्य ज्ञान सांगते की जितके घोडे जास्त असतील तेवढी ‘हॉर्स पॉवर-अश्‍वशक्ती’ वाढेल व व्यक्ती आपल्या ठरावीक ध्येयाकडे लवकर पोहोचेल. यात अभिप्रेत गर्भितार्थ म्हणजे चारही योगमार्गांचा अभ्यास केला व त्याप्रमाणे आचरण केले तर आपण ध्येयापर्यंत लगेच पोहोचू आणि ही गोष्ट प्रत्येकाने ठरवायची आहे- ध्येय एका जन्मात गाठायचे की अनेक जन्मांत गाठायचे?.. ही गोष्ट स्वतःच्या ज्ञानावर व कर्तव्यशक्तीवर आधारित आहे.
स्वामी विवेकानंदांची बुद्धी प्रगल्भ होती. त्यांना माहीत होते की मानवाचे ध्येय काय, जे तथाकथित विद्वानांनादेखील अनेकवेळा माहीत नसते. म्हणून त्यांच्याजवळ विचार असतात पण आचार घडत नाहीत. त्यांच्या प्रत्येक योगमार्गावरील प्रवचनांमधून अनेकवेळा या ध्येयाचा स्वामीजी उल्लेख करतात. या सर्व ज्ञानपूर्ण साहित्यात एक अत्यंत सुंदर पत्र आहे जे त्यांनी अमेरिकेतील त्यांची शिष्या मार्गारेट नोबल यांना लिहिलेले आहे…
प्रिय कुमारी नोबल,
(पत्राचा स्कॅन केलेला फोटो मी पाठवीन. ते पत्रं जसंच्या तसं छापणे)

… स्वामी विवेकानंदांच्या पत्रातील अनेक शब्द वजनदार आहेत. प्रत्येक सूज्ञ स्वाध्यायीने, योगसाधकाने या शब्दांवर विचार करून चर्चा करायला हवी. त्यातील काही शब्द असे आहेत…
– ध्येय. त्याच्या ठिकाणी वास करणार्‍या ईश्‍वरत्वाचा उपदेश. ईश्‍वरत्व प्रकट कसे करावे यासंबंधीचा मार्ग दाखवणे. अंधविश्‍वासाची शृंखला, पददलितांची दया, पददलितांना तुडविणार्‍यांविषयी दया.
– सर्व दुःखांचे कारण म्हणजे अज्ञानाच.
– जगाला प्रकाश कोण देईल- जो आत्मत्याग करील तो.
– हा प्राचीन दंडक यापुढे युगानुयुगे चालत राहणार.
– सर्वांत पराक्रमी आणि सर्वश्रेष्ठ लोकांना – ‘बहुजनहिताय बहुजनसुखाय’ आत्मबलिदान करावेच लागेल.
– अंतःकरणात अनंत प्रेम आणि दया असलेले शेकडो बुद्ध आज हवे आहेत.
– जगातले धर्म निर्जीव विडंबनाच्या रुपाने बनले आहेत.
– जगाला कशाची गरज असेल – ती चारित्र्याचीच.
– निःस्वार्थ प्रेमाने जीवने प्रज्वलीत झालेल्या लोकांची आवश्यकता.
– प्रेम ज्याच्या हृदयात असेल त्याचा प्रत्येक शब्द वज्राप्रमाणे बलशाली होईल.
– जळजळीत शब्दांची आणि त्याहूनही जास्त जळजळीत कर्माची आवश्यकता.
– महान आत्म्यांनो उठा. जग दुःखाने होरपळत आहे. तुम्हास झोप कशी येते?
– हाका मारून निद्रिस्त देवताना जागृत करू या.
अंतस्थ ईश्‍वराचे प्रत्युत्तर येईपर्यंत हाका मारुया.
– जीवनात यापेक्षा श्रेष्ठ कर्म कोणते?
– जागे व्हा – जागे व्हा.
स्वामीजींची ही वाक्ये वाचली की प्रत्येक सज्ञान व्यक्तीची झोप उडाली पाहिजे. त्यांचे रक्त सळसळून त्याने जागे होऊन कार्याला लागले पाहिजे. त्यासाठीच हवे मूल्याधिष्ठित, ध्येयाधिष्ठित शिक्षण. प्रत्येक व्यक्तीने यावर चिंतन करायला हवे. पण जास्त प्रामाणिकपणे विविध क्षेत्रातील व्यक्तींनी करायला हवे- सामाजिक – शैक्षणिक -धार्मिक – राजकीय… त्यासाठीच हवा स्वाध्याय. निदान योगसाधकांनी तरी जागे होऊन स्वामी विवेकानंदांच्या हाकेला प्रतिसाद देऊन कार्याला लागुया.
भगवंताच्या शुभाशीर्वादांचा वर्षाव सदा होतच राहील.