येत्या २५ वर्षांत भारत विकसित देश होईल

0
35

>> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्‍वास

येत्या २५ वर्षात म्हणजेच २०४७ सालापर्यंत भारत एक विकसित देश म्हणून ओळखला जाईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये व्यक्त केला. बंगळुरूमध्ये आयोजित ग्लोबल इनव्हेस्टर्स मीटमध्ये ते बोलत होते. हे लक्ष्य गाठण्यासाठी देशातील गुंतवणूक महत्वाची असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. भारतातील गुंतवणूक ही जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील गुंतवणूक ठरणार असून स्वच्छ आणि सुरक्षित भविष्यासाठी ही गुंतवणूक असेल असे मोदी यांनी सांगितले.

भारताचे स्टार्टअप इकोसिस्टम जगात अमेरिका आणि चीननंतर जगात तिसर्‍या स्थानी आहे. औद्योगिक क्रांतीत भारतीयांची महत्वाची भूमिका आहे असे सांगून औद्योगिक क्रांतीत भारतीय तरुणांची भूमिका आणि टॅलेंट पाहून जगही आश्चर्यचकीत झाल्याचे सांगितले. भारतात गेल्या ८ वर्षात ८० हजारहून अधिक स्टार्टअप्स तयार झाले आहेत. कोरोनानंतरची परिस्थिती पाहता भारताची ही कामगिरी नक्कीच महत्वपूर्ण असल्याचे मोदी म्हणाले.