युगकार्याच्या वाटेवर …

0
228

– प्रा. रमेश सप्रे

‘माणूस व्हा. आपल्या विचारांच्या, कल्पनांच्या छोट्याशा डबक्यातून बाहेर पडा. भारतमातेला किमान एक सहस्त्र माणसांचं बलिदान हवंय. यज्ञातल्या पशूंचं बलिदान नकोय. माणसांचं हवंय. कितीजण तुमच्यापैकी तयार आहेत याला. आधी माणूस बना माणूस!’

प्रवास हा आदर्श शिक्षक असतो. याचा अनुभव नरेंद्रनं म्हणजेच स्वामी विवेकानंदांनी भारताची परिक्रमा करताना घेतला होताच. आता मोठ्या प्रवासाला निघायचं होतं. या संदर्भात एक प्रसंग सांगितला जातो. आख्यायिकाही असेल. पण दोन महान व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांवर त्यामुळे चांगला प्रकाश पडतो.
नरेंद्र शारदामातांकडे परदेशाला जाण्याची परवानगी मागण्यासाठी गेला. त्यावेळी माताजी स्वयंपाकघरात होत्या. त्या माऊलीचा सारा दिवस आपल्या मानसपुत्रांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यातच जात असे. रामकृष्णांचा त्यांना आशीर्वादच नव्हता का? ते म्हणाले होते, ‘तुला स्वतःचं असं मूल नसेल. पण जगातली अनेक माणसं तुझी मुलं बनतील. तुला मॉं म्हणून हाक मारतील.
नरेंद्रनं सारदामातांजवळ जाऊन म्हटलं, ‘परदेशी जावं असं म्हणतोय’. यावर काहीही उत्तर न देता सारदामॉंनी त्याला तिथंच असलेली सुरी (नाइफ) द्यायला सांगितली. नरेंद्रनं ती दिली. ती हातात घेऊन त्याच्याकडे पाहात स्निग्ध नजरेनं सारदामॉं म्हणाल्या, ‘जा, नोरेन तुझ्याकडून सर्वांचं कल्याण होणार आहे. अवश्य जा.’ यावर न राहवून नरेंद्रनं विचारलं, ‘मॉं, त्या सुरी देण्याचा तुझ्या या होकाराशी संबंध होता का?’ मॉं उद्गारल्या, ‘नक्कीच, लोक दुसर्‍याला सुरी देताना तिची मूळ आपल्या हातात ठेवतात नि पातं दुसर्‍याच्या हातात देतात. तू पातं स्वतःच्या हातात ठेवून मूठ माझ्याकडे दिलीस. असं का केलंस?’ यावर नरेंद्र भावुक होऊन म्हणाला, ‘मॉं, तुला इजा होऊ नये, तुझ्या हाताला सुरीच्या पात्यामुळे जखम होऊ नये म्हणून मी तसं केलं.’ यावर धन्यतेनं पाणावलेल्या डोळ्यांनी सारदा मॉं म्हणाल्या, ‘म्हणूनच, नोरेन, तुझ्याकडून असंख्य लोकांचं कल्याण होणार आहे. तू परदेशात जाच.’
अगदी साधा, घरगुती प्रसंग पण किती हृदयस्पर्शी! असो.
आता प्रत्यक्ष परदेशाचा प्रवास. तोही किती भावपूर्ण, चिंतनीय स्मृतींनी भरलेला. स्वामीजींचं मन एखाद्या बालकासारखं निरागस होतं. कशाचाही प्रभाव त्यांच्या मनावर पडत असे. अगदी लहानसहान गोष्टींचा ठसा त्यांच्या स्मृतीवर कायमचा उठत असे. पण त्याचवेळी स्वामीजींचा मेंदू अतिशय तल्लख होता – बुद्धी स्वयंप्रकाशित होती. त्यामुळे आजुबाजूची दृश्यं, वस्तू, व्यक्ती यांच्या क्रिया-प्रतिक्रियांचा परिणाम घडून त्यांची बुद्धी अधिक संवेदनक्षम नि तीक्ष्ण बनत होती.
थोडक्यात गुरुदेव, नि हो कालीमाता, त्यांची जणू पूर्वतयारीच करून घेत होती.
३१ मे १८९३. हा दिवस स्वामीजींच्या प्रवासाचा आरंभदिन होता. ज्या आगबोटीनं स्वामीजी चालले होते तिचं नाव होतं – एस्. एस्. पेनिन्शुला.
या प्रवासाला निघण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट घडली होती. यापूर्वी स्वामीजी विवित्सानंद, विविदिशानंद अशी निरनिराळी नावं घेऊन भारतात फिरत होते. पण एक संस्थानिक खेत्रीचे महाराज स्वामीजींचे निःसीम भक्त होते. ते स्वतः सुविद्य होते. परदेशगमनाचा नि वास्तव्याचा त्यांना अनुभव होता. विशेष म्हणजे त्यांची अशी धारणा होती की स्वामीजींच्या कृपाप्रसादामुळे आपल्याला पुत्र झालेला आहे. यामुळे त्यांनी उत्साहानं स्वामीजींच्या प्रवासासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली. बोटीचं प्रथम श्रेणीचं (वर्गाचं) तिकीट, प्रवासात लागणारे कपडे, इतर वस्तूंनी भरलेले पेटारे, भगव्या रंगाचा रेशमी अंगरखा, त्याच रंगाचा फेटा नि पुरेसे पैसे स्वामीजींकडे दिले. आधीच विरक्त वृत्तीच्या, संन्यस्त अवस्थेत संचार करणार्‍या स्वामीजींना त्या सार्‍या वस्तू सांभाळणं फारच जिकिरीचं काम होतं. बर्‍याचशा वस्तू त्या प्रवासात चोरीलाही गेल्या. पण या सर्वांपेक्षा खेत्रीच्या राजेसाहेबांनी आणखी एक गोष्ट दिली जी स्वामीजींना जन्मभर नि जन्मानंतरही चिकटली.
आजवरची सारी घेतलेली नावं टाकून यापुढे एकच नाव घ्यायचं – स्वामी विवेकानंद! ही ती गोष्ट. स्वामीजींकडे विवेक होताच त्यामुळे ते आनंद स्वतः अनुभवत होते नि इतरांवर त्या आनंदानुभवाचं प्रक्षेपण करत होते. मुक्त हस्ते वितरण करत होते.
प्रवास तर सुरू झाला. अमेरिकेला पोहचेपर्यंत या प्रवासामुळं नि त्यातल्या प्रत्यक्ष अनुभवामुळं स्वामीजी किती संपन्न झाले याचं वर्णन त्यांच्या सर्वच चरित्रकारांनी केलंय.
आपण काही क्षणचित्रं पाहू या.
* बोटीच्या डेकवर उभं राहून क्षितिजापार दृष्टी लावून पाहताना किंवा कठड्यावर ओणवे होऊन बोटीच्या गतीमुळे फेसाळलेल्या पाण्याला पाहताना स्वामीजींना दूर, अस्पष्ट होत जाणारा भारतमातेचा किनारा पाहून काय वाटलं असेल? कोणत्या विचारांची त्यांच्या मनात दाटी झाली असेल?
– त्यांना डोळ्यासमोर दिसत असतील वराहनगर मठात राहणारे, भारतभर परिभ्रमण करणारे गुरुबंधू.
– आजुबाजूच्या सर्वांवर अपार प्रेम करून त्यांची सर्व प्रकारची मनोभावे सेवा करणार्‍या सारदामॉं,
– आईवडलांचे उदात्त संस्कार, मित्रमंडळींचं प्रेम, चांगल्या शिक्षकांनी उघडलेली ज्ञानाची कवाडे यांच्या स्मृती.
– बालकासारखे निरागस हसणारे, वारंवार भावावेशात (समाधी अवस्थेत) जाणारे पूज्य गुरुदेव,
– भारत परिक्रमेत अनेक ज्ञानी व्यक्तींनी मुक्त हस्ते दिलेलं ज्ञान व जीवनानुभव,
– वाचन व चिंतन केलेले असंख्य ग्रंथ व त्यांचे प्राचीन काळापासूनचे ग्रंथकार,
– भारतमातेच्या प्रत्येक भागातील संस्कृतीची वैशिष्ट्यं – (राजपूत, मराठा, द्रवीड इ.)
– प्रचंड उष्णतेत उघड्या अंगानं शेतात, रस्त्यावर काबाडकष्ट करणारे असंख्य शेतकरी-कामकरी अशी एक ना दोन अनेकानेक चित्रं त्यांच्या मनाच्या पडद्यावरून सरकत होती. स्वामीजी भावविव्हल होत होते. मातृभूमीची ओढ क्षणोक्षणी वाढत होती. पहिले काही दिवस बोटीवरचे इतर प्रवासी म्हणजे हलणार्‍या सावल्याभावल्यांसारखेच भासत होते त्यांना. इतर सहप्रवाशांनाही या भगव्या वस्त्रातील तेजस्वी साधुमहाराजांबद्दल भययुक्त आदर वाटत होता. त्यांच्याकडे पाहून, त्यांच्या स्वभाव-सवयींचं निरीक्षण-परीक्षण करून स्वामीजींच्या मनावर एक संस्कार मात्र खोल उमटला – विविधतेतली एकता-सांस्कृतिक एकात्मता – बोटीवरील इतर देशांच्या लोकांचं वर्तन अर्थातच भिन्न होतं. पण तरीही ‘मानव सारा एक’ यावर श्रद्धा बसावी असा अनुभव स्वामीजींच्या अंतर्मनानं निश्चित नोंदवला होता.
जणू त्यांच्या काही दिवसातच होणार्‍या युगप्रवर्तक भाषणाचा तो (पूर्व) प्रतिध्वनी होता. बोटीच्या प्रवासाला सुमारे एक महिना लागणार होता. वाटेत बोट अनेक देशांच्या सागरकिनार्‍यांना लागणार होती. काही ठिकाणी काही दिवस थांबणार होती. स्वामीजींनी संधी साधून त्या त्या देशाप्रदेशातील सामान्य लोकांचं राहणीमान, सांस्कृतिक वैशिष्ट्य, निसर्गदृश्य याचा अनुभव घेतला. त्यातली त्यांची निरीक्षणं मोठी मननीय आहेत. विशेष म्हणजे यातील बर्‍याचशा गोष्टी त्यांनी पत्रातून आपल्या भारतातील मित्रमंडळींना कळवल्या होत्या.
* कोलंबोला (श्रीलंका) बोट थांबल्यावर स्वामीजींनी तिथले बौद्धमठ पाहिले. शांत वाटलं त्यांना.
* मलाया बेटावरील चाचेगिरी करणार्‍या (सी पायरेटस्) क्रूर मंडळींचे अड्डे पाहिले.
* हॉंगकॉंग बंदरात चिनी जीवनाचा परिचय झाला. त्या बंदरातल्या अनेक बोटी, त्या तरंगणार्‍या बोटीवरचे संसार, विशेषतः सार्‍या प्रकारचे कष्ट करणार्‍या चिनी माताभगिनी,
* कँटनमधील बौद्ध विहारात स्वामीजींचे एक ज्ञानी, साक्षात्कारी साधू म्हणून स्वागत झाले.
* जपानला पोचल्यावर योकोहामा, ओसाका, कियोटो, टोकियो ही शहरं पाहिली. त्यांची सुंदर रचना, आकर्षक घरं, पाईन वृक्षांच्या रांगा, याच्या जोडीला सुसज्ज सैन्य, औद्योगिक कारखाने, संपन्न व्यापार अन् अतिशय कष्ट करणारे जपानी लोक या सार्‍यांचा खोल प्रभाव स्वामीजींच्या मनावर पडला. ते लोक आपल्या देशाकडे, ‘उदात्त व महान गोष्टींची स्वप्नभूमी’ म्हणून पाहतात. यांचा सखोल परिणाम स्वामीजींच्या मनावर झाला.
मद्रासमधील एका शिष्याला पाठवलेल्या पत्रात स्वामीजींच्या मनात उचंबळणार्‍या विचारांची गाज ऐकू येते – ‘माणूस व्हा. आपल्या विचारांच्या, कल्पनांच्या छोट्याशा डबक्यातून बाहेर पडा. भारतमातेला किमान एक सहस्त्र माणसांचं बलिदान हवंय. यज्ञातल्या पशूंचं बलिदान नकोय. माणसांचं हवंय. कितीजण तुमच्यापैकी तयार आहेत याला. आधी माणूस बना माणूस!’