२०२३ मध्ये तब्बल ९ राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडणार असून, या निवडणुकांकडे लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. कर्नाटक, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगाणा, नागालँड, त्रिपुरा, मेघालय, जम्मू काश्मीर या राज्यांमध्ये निवडणुका होणार आहेत. कर्नाटक, मध्य प्रदेश आणि त्रिपुरामध्ये भाजप सत्तेत आहे. राजस्थान, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेस सत्तेत आहे. मेघालयमध्ये नॅशनलिस्ट डेमोक्रॅटक प्रोग्रेसिव्ह पक्ष सत्तेत आहे, तर तेलंगाणामध्ये केसीआर यांच्या पक्षाची सत्ता आहे. त्यांनी नुकतेच त्यांच्या पक्षाचे नाव टीआरएसवरुन बीआरएस केले आहे. जम्मू काश्मीरमध्ये विभाजनानंतर निवडणुका व्हायच्या आहेत.
कर्नाटकच्या विधानसभेची मुदत २४ मे रोजी संपणार आहे. त्यामुळे या राज्यात निवडणुका एप्रिल मे दरम्यान लागू शकतात. मिझोरम, छत्तीसगड, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगाणा या राज्यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ मध्ये संपणार आहे. त्यापूर्वी निवडणुका जाहीर होऊ शकतात. मिझोरमच्या विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबरला संपणार आहे. त्यामुळे त्यापूर्वी निवडणूक होऊ शकते. छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या विधानसभांचा कार्यकाळ ३ जानेवारी २०२४ आणि ६ जानेवारी २०२४ ला संपणार आहे. राजस्थान आणि तेलंगाणा राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ १४ आणि १६ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळे या पाच राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये निवडणूक होण्याची शक्यता आहे. २०२३ मध्ये थंडीचे प्रमाण कमी झाल्यानंतर विधानसभा निवडणूक जाहीर होऊ शकते.
कर्नाटक आणि मध्यप्रदेशची सत्ता राखण्याचे भाजपपुढे आव्हान
२०२३ मध्ये पहिल्यांदा कर्नाटकमध्ये निवडणुका होणार असून, भाजपपुढे कर्नाटकमधील सत्ता राखण्याचे आवाहन आहे. बोम्मई यांच्यापुढे कर्नाटकच्या डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धारामय्या आणि जेडीएसच्या कुमारस्वामी यांचे आव्हान आहे.
मध्य प्रदेशात काय होणार?
मध्य प्रदेशमध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला सत्ता मिळाली होती. कॉंग्रेसमधील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने त्यांचे सरकार पडले होते. शिवराज सिंह चौहान अनेक वर्षांपासून मुख्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. राहुल गांधी यांनी मध्य प्रदेशमध्ये कॉंग्रेसची सत्ता येणार असल्याचे लिहून देतो, असे म्हणत भाजपला आव्हान दिले आहे.
राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसपुढे आव्हान
राजस्थानमध्ये आणि छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसची सत्ता आहे. दोन्ही राज्यांमधील सत्ता परत मिळवण्याचे आव्हान कॉंग्रेसपुढे असेल. छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल आणि राजस्थानमध्ये अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यावर सत्ता टिकवण्याचे आव्हान आहे.