यापुढे आठवड्यातून तीन दिवस लसीकरण

0
18

>> सोमवारपासून अंमलबजावणी

>> ज्येष्ठांच्या लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न

>> हर घर दस्तक मोहीम राबवणार

कोरोना महामारीच्या चौथ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाला गती देण्यासाठी आठवड्यातून तीन दिवस लसीकरणाची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला असून, यापुढे दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी आरोग्य खात्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लस दिली जाणार आहे. तसेच, ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन कामगारांच्या कोविड लसीकरणाला गती देण्यासाठी दर मंगळवारी आणि शनिवारी ‘हर घर दस्तक’ मोहीम राबविण्यात येणार आहे. दरम्यान, सद्य:स्थितीत राज्यात केवळ दर बुधवारीच लसीकरण केले जात आहे.

ज्या नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत आणि आवश्यक कालावधी पूर्ण केलेला आहे, त्यांना कोविडचा बूस्टर डोस दिला जात आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपर्यंत राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये दरदिवशी कोविड प्रतिबंधक लसीकरण राबवली जात होती. १८ वर्षांवरील १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर दरदिवशी राबवली जाणारी लसीकरण मोहीम बंद करून आठवड्यातून केवळ एकच दिवस लसीकरणाची व्यवस्था आरोग्य खात्याने केली होती. त्यानुसार सध्या राज्यात केवळ एकच दिवस कोविड लसीकरण सुरू आहे. आता या व्यवस्थेत बदल करून आठवड्यातून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार असे तीन दिवस कोविड प्रतिबंधक लस देण्याची व्यवस्था केली जात आहे. येत्या सोमवार दि. ३० मेपासून याची कार्यवाही होणार आहे.

राज्यात आत्तापर्यत ४०.९५ टक्के लाभार्थींनी बूस्टर डोस घेतला आहे. राज्यात बूस्टर डोसच्या लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभलेला नाही. बूस्टर डोससाठी १ लाख २४ हजार ३६२ लाभार्थी पात्र आहेत. त्यातील ५० हजार ९३१ जणांना बूस्टर डोस घेतला आहे. राज्यात कोविड लसीचे दोन्ही डोस १०० टक्के नागरिकांना देण्यात आलेले आहेत. १२ ते १४ वयोगटातील सुमारे ६५.१० टक्के मुलांना कोविड लसीचा पहिला डोस आणि ४४.७१ टक्के मुलांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. १५ ते १८ वयोगटातील सुमारे ९३.२७ टक्के मुलांना लसीचा पहिला डोस आणि ७९.३९ टक्के मुलांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे.

सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १००च्या पार
राज्यात चोवीस तासांत नवीन १८ कोरोनाबाधित आढळून आले असून, राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या १०१ झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांत ७२४ स्वॅबचे नमुने तपासण्यात आले, त्यातील १८ जणांचे नमुने बाधित आढळून आले. चोवीस तासांत आणखी १५ जण कोरोनामुक्त झाले असून, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.४० टक्के एवढे आहे. दरम्यान, राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ३८३२ एवढी आहे.

हर घर दस्तक
मोहिमेखाली घरोघरी भेटी

हर घर दस्तक मोहिमेखाली आरोग्य खात्याचे अधिकारी प्रत्येक घराला भेट देऊन ६० वर्षे आणि त्यावरील वयाच्या नागरिकांनी कोविडचा बूस्टर डोस घेतला की नाही, याची विचारणा करतील. तसेच कोविडचे दोन्ही डोस घेतलेल्या आणि आवश्यक कालावधी पूर्ण केलेल्या नागरिकांना बूस्टर डोस घेण्याची विनंती करतील. तसेच राज्यात लस उत्सवाचे आयोजन सुध्दा केले जाणार आहे, अशी माहिती आरोग्य खात्याच्या सूत्रांनी दिली.