यंदाचा इफ्फी भव्य दिव्य नसेल

0
303

>> सुभाष फळदेसाई यांची माहिती

यंदाचा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) भव्य दिव्य स्वरूपात होणार नाही. दरवर्षी आयोजित केल्या जाणार्‍या या आंतरराष्ट्रीय महोत्सवात खंड पडू नये म्हणून कोविडच्या एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन इफ्फीचे कमी-अधिक प्रमाणात आयोजन केले जाणार आहे. फिल्म फेस्टिबल संचालनालयाकडून इफ्फीचा आराखडा तयार केला जाणार आहे, अशी माहिती गोवा मनोरंजन संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष फळदेसाई यांनी काल दिली.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत यंदाच्या इफ्फीच्या आयोजनाबाबत चर्चा करण्यात आलेली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोरोना महामारीच्या काळात गोव्यात निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती दिली. इफ्फीच्या आयोजनाबाबत आराखडा तयार केला जाणार आहे. इफ्फीचे आयोजन व्हर्चुअल पद्धतीने करण्याबरोबरच काही प्रत्यक्ष कार्यक्रम आयोजन करण्याबाबत चर्चा सुरू आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

या वर्षी इफ्फीचे भव्यदिव्य उद्घाटन तसेच समारोप सोहळा होणार नाही. मास्टर क्लास व इतर कार्यक्रमांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. चित्रपट क्षेत्राला चालना देण्यासाठी कमी प्रमाणात तरी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजन करण्याबाबत मत व्यक्त करण्यात आलेले आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.

आगामी इफ्फीसाठी साधन सुविधा निर्माण करण्याचे काम सुरू आहे. आयनॉक्सच्या नूतनीकरणाचे काम ऑक्टोबरअखेरपर्यंत पूर्ण होणार आहे. आयनॉक्समध्ये चित्रपट प्रदर्शित करण्याची सोय केली जाऊ शकते. केंद्र सरकारच्या फिल्म फेस्टिबल संचालनालयाकडून महोत्सवाचे आयोजन केले जात असून त्यांच्याकडून इफ्फी आयोजनाचा आराखडा तयार केला जाणार आहे, असेही फळदेसाई यांनी सांगितले.